Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
येथपर्यंत शहाजीचा इतिहास बखरींतून कितपत सांपडण्यासारखा आहे ह्या गोष्टीची मीमांसा झाली. ह्या मीमांसेपासून इतकें निष्पन्न झालें कीं मलिकंबराच्या पाठीमागें निजामशाहीची पडती बाजू सावरण्यास दौलताबादेस शहाजीखेरीज दुसरा कोणी सरदार समर्थ नव्हता. त्याचा पराभव जेव्हां होई तेव्हां निजामशाही बुडाल्यासारखें दिसे व त्याचा जय होई तेव्हां तरल्यासारखी भासे. म्हणजे शहाजी व निजामशाही ह्या दोन वस्तूंचें १५४८ पासून १५५९ पर्यंत केवळ तादात्म्य झालेलें होतें. अर्थात् ह्या बारा वर्षात शहाजी म्हणजेच निजामशाही होती. शहाजीचें सामर्थ्य शहाजनाच्या मानानें फारच अल्प होतें. व आदिलशाहीच्या मानानेंहि फारसें बरोबरीचें नव्हतें. तरी ह्या दोन्ही पातशहांना दक्षिणेंतील व्यवस्था लावतांना शहाजीचा विचार करावा लागेल हें तत्कालीन इतिहासावरून स्पष्ट आहे. १५५८ त शहाजहानाचा व महमदशहाचा तह झाला त्या वेळीं यद्यपि शहाजीजवळ वरपांगी टीचभरहि जागा राहिली नव्हती, तत्रापि त्याच्याजवळ पंचवीस तीस हजार सैन्य असल्यामुळे शहाजहानाला व महमदशहाला दोघांनाहि त्याची भीति वाटत होती. निजामशाहीतील प्रांतांपैकी महमदशहाच्या वाट्यास आलेल्या प्रांतांतील पुणें व सुपें हे प्रांत वस्तुंतः शहाजीच्या ताब्यांत होते. १५५९ च्या पुढें शहाजीनें मनांत आणिले असतें व आदिलशहांनीं त्याला आश्रय दिला नसता तर आदिलशाही प्रांतांतील कांहीं प्रांत बळकावून बसण्याचें सामर्थ्य त्याच्या आंगी नव्हतें असे नाहीं. परंतु शहाजीचा स्वभाव एकदेशीय व उतावळा नसून, अव्यवस्थित पुंडपणा करण्यापेक्षां कोणत्याहि पादशहाची व्यवस्थित मनसबदारी करणें व अब्रूनें राहणें त्याला पसंत पडलें. शिवाय आदिलशहाच्या दरबारीं शहाजीचें वजन निजामशाही दरबारांतल्या प्रमाणेंच अतोनात होण्याचा निश्चित संभव होता. निजामशाहींत असतां जाधवांच्या मात्सर्याचा विषय भोसले होऊन बसले. आदिलशाहींत गेल्यावर घोरपड्यांच्या व तत्रस्थ काहीं मुसलमान सरदारांच्या द्वेषास शहाजी पात्र झाला. ह्यावरून असे दिसतें कीं जेथें जेथें शहाजी जाई तेथें तेथें त्याचें वजन अतोनात वाढे. हा सर्व प्रभाव त्याच्या जवळील सैन्यबलाचा होय. शिवाजीच्या उदयासंबंधीं विचार करतांना शहाजीच्या ह्या उच्च स्थितीचाहि अंदाज करून घेणें अगत्याचें आहे.
शके १५४९ पासून १५६२ पर्यंत शिवाजी कोठकोठें रहात होता ह्याचा तपशील निश्चयानें सांगतां येत नाहीं. १५४९ पासून १५५२ पर्यंत शिवाजी शिवनेरीस होता. १५५२ पासून १५५५ पर्यंत गांडापूर, वैजापूर, माहुली किल्ला, वगैरे ठिकाणी तो होता. १५५५ पासून १५५९ पर्यंत तो शिवनेरीस होता. १५५९ पासून १५६२ पर्यंत पुण्यास दादोजी कोंडदेवापाशीं होता. पुण्यास असतांना शके १५६२ विक्रम संवत्सरीं वैशाख शुद्ध पंचमीस म्हणजे १६४० च्या १६ एप्रिलास शिवाजीचा लग्रसंबंध शिर्क्यांच्या सईबाईशीं झाला. सदर शिर्क्यांचे ठिकाण पुणें प्रातांत मूळचें आहे. १५६३पासून १५६५ पर्यंत शिवाजी पुन्हा विजापुरास गेला असावा. त्याच वेळीं पातशहाला मुजरा न करणें कसायांची खोड मोडणें, गोब्राह्मणांचा विशेष आदर करणें, वगैरे बालिश परतुं स्तुत्य व उद्दाम कृत्यांच्या योगे शिवाजीचा मूळ स्वभाव दृष्टोत्पत्तीस येऊं लागला. कुरणूस न करितां शिवाजीनें रामराम केला, म्हणून काहीं बखरकार लिहितात. परंतु रामराम करण्याचा प्रघात रामदासांनीं पुढें पडिला, ही गोष्ट लक्षांत घेतली म्हणजे रामरामाच्या ऐवजीं शिवाजीनें जोहार केला असावा असें वाटतें. ह्या संबंधानें मुजरा हा शब्द शिवदिग्विजयाच्या कर्त्यानें वापरला आहे तो योग्य आहे. विजापुरास असतांना शिवाजीचें दुसरें लग्र पादशहाच्या आग्रहावरून सोयराबाईशीं झालें. सभासदी बखरीच्या चवथ्या परिशिष्टांत (पृष्ठ ८७) सईबाई निंबाळकरांची कन्या होती व तिच्याशीं शिवाजीचा विवाह १५५९ त झाला व सोयराबाई शिर्क्यांची मुलगी होती, अशी विधाने ग्रांट डफच्या आधारावर (मुंबई प्रत, पृष्ठ १३३) केलीं आहेत, तीं कालविपर्यासाच्या बाजूनें तरी दुष्ट आहेत ह्यांत सशंय नाहीं.