Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
ह्या सुमारास विजापूरकरांचा व शहाजहानाचा निजामशाही वाटून घेण्याचा करार झाला, त्यांत शहाजीचें आंग होतें. १५५५ त मुरार जगदेव व शहाजी ह्यांनीं दौलताबादेवर म्हणजे मोंगलावर स्वारी केली; ह्याच स्वारींत कोरेगांवानजीक तुळापुरीं त्यांना सोमवारी सूर्यग्रहण पडलें. ह्या पर्वकालाची तीथ मल्हार रामरावानें शके १५५५ श्रीमुखनाम संवत्सर भाद्रपद वद्य ३० सोमवार म्हणून दिली आहे व ती बरोबर आहे. १६३३ च्या २३ सप्टेंबरी सोमवारीं सूर्यग्रहण हिंदुस्थानांत दिसत होतें. १५५४ च्या फाल्गुनांत दौलताबाद मोहोबतखानाच्या हातीं पडल्यामुळें शहाजी व मुरारपंत यांनीं फत्तेखानाच्या ऐवजीं मोंगलांच्या विरुद्ध खटपट चालविली. ह्याच खटपटींत असतां वर उल्लेख केलेलें ग्रहण तुळापुरास त्यांस पडलें. १५५६ त मोहोबतखान व सुलतान सुजा पातशहाच्या बोलण्यावरून दिल्लीस गेले व दौलताबादचा मुलूख मोकळा पडला. ही संधि साधून शहाजीनें मूर्तजा नांवाचा निजामशाही वंशांतील कोणी मुलगा कोंकणांत श्रीवर्धनास जाऊन राहिला होता त्यास भीमगडीं तख्तावर बसविलें व पुणें, औरंगाबाद, जुन्नर, अहमदनगर, नाशिक वगैरे बालेघाटापर्यंत प्रांत पुनः निजामशाहीच्या अंमलाखालीं आणिले. सिद्दी साया सैफखान भिवंडीस, सिद्दी अंबर जंजि-यास व श्रीनिवासराव जुन्नरास पुंडावा करून स्वतंत्र राहूं लागले होते त्या सर्वांस शहाजीनें मोडून काढिलें व निजामशाही सत्ता पुन्हा सुरळीत चालूं होण्याचीं चिन्हें दिसूं लागलीं (का. पत्रें व यादी ४३८). श्रीनिवासराव ह्याला धरण्याच्या वेळीं शहाजीनें जिजाबाई व शिवाजी ह्यांस शिवनेरीहून काढून गांडापुरानजीक वैजापूर येथें नेऊन ठेविलें होतें. शके १५५५ त दौलताबाद घेतल्यावर निजामशाही बुडाली असें शहाजहान पातशहास वाटत होतें. परंतु एक वर्षाच्या आंत दौलताबादेभोंवतालचा प्रांत शहाजीनें काबीज केला व एका नव्या सुलतानाची भिमगडीं स्थापना केली. ही वार्ता ऐकून खानदौरान व खानजमान ह्या दोन सरदारांस शहाजहानानें दक्षणचा बंदोबस्त करण्यास पाठवून दिलें, व त्यांच्या पाठोपाठ आपणहि येऊन दाखल झाला. १५५७ पासून १५५९ पर्यंत निजामशाहीचा कड घेऊन भांडणा-या शहाजीला व विजापूरच्या बाजूनें लढणा-या रणदुल्लाखानाला खानजमान व खानदौरान ह्यांनीं बराच त्रास दिला. शेवटीं शहाजहानाचा व विजापूरच्या महमद आदिलशहाचा तह ठरला, शहाजीला विजारपूरकरांच्या आश्रयास जावें लागलें व जिच्या प्रीत्यर्थ शहाजीनें पांच वर्षें इतकी मेहनत घेतली ती बहिरी निजामशाही कायमची लुप्त झाली. निजामशाही मुलखापैकीं भीमेच्या दक्षणचा सर्व मुलूख व वसईपासून कल्याणपर्यंतचा कोंकणप्रांत महमद आदिलशहाच्या वाट्यास आला. आणि बाकीचा सर्व बहिरी निजामशाही मुलूख मोंगलांच्या ताब्यांत गेला. मालोजीनें शके १५२६ त दौलताबादच्या दरबारीं जी मनसब व जहागीर पैदा केली ती १५५९ त शहाजीनें मोठ्या मिनतवारीनें व साहसानें घालविली. ही जहागीर गेल्यानें शहाजीचें वजन यत्किंचितहि कमी झालें नाहीं. त्याचें शौर्य, त्याचें धोरण व त्याचें सामर्थ्य विजापूरच्या मुत्सद्यांस माहीत झालें होतें. त्यांनीं त्याच्याकडे पुणें व सुपें हे दोन प्रांत पहिल्याप्रमाणेंच ठेवून दिले व शिवाय दक्षिण कर्नाटकांतील प्रांतांत अंमल करवेल तितका करावा असा त्याला हुकूम केला. भीमेच्या उत्तरेकडील प्रांत मोंगलाकडे गेल्यामुळें शहाजीचें जें नुकसान झालें होतें तें कर्नाटकांतले कांहीं नवीन प्रांत काबीज करून त्यानें भरून काढिलें. ह्या कर्नाटकांतील मोहिमांसंबंधानें कनकगिरीच्यां विजयराघवाचें, अप्पाखानाचें, शहाजीचा वडील मुलगा संभाजी याचें व अफझुलखानाचें वगैरे व्यक्तींचीं नांवें बखरकार देतात, परंतु ह्या उल्लेखांपासून व्यवस्थित विधानांचा उद्गम संभवत नसल्यामुळें व प्रस्तुत स्थळीं विस्तृत इतिहास लिहिण्याचा मनोदय नसून बखरींची परीक्षाच करण्याचा हेतु असल्यामुळे शहाजीच्या १५५९ च्या पुढील कर्नाटकांतील आयुष्यक्रमाचा विचार करण्याचें येथें प्रयोजन नाहीं. १५५९ त विजापूरच्या दरबारी गेल्यापासून तों १५७१ त बाजीराव घोरपड्यानें दगा करी तोपर्यंत बारा वर्षें शहाजी विजापूरी व कर्नाटकांत काय करीत होता ह्याचा बिलकूल पता नाहीं. तसेंच १५७१ पासून १५८४ पर्यंतचा शहाजीचा इतिहास बहुतेक अज्ञातच आहे. सारांश १५५९ पासून १५८४ पर्यंतचा शहाजीचा वृत्तांत यथास्थित बसविण्यास बखरींचा कांहींएक उपयोग नाहीं. विजापूरच्या इतिहासांत थोडीबहुत माहिती सांपडते; परंतु ती इतकी त्रोटक व तुटक आहे कीं खुद्द कर्नाटकांतील अक्कलकोटपासून तंजावरपर्यंतच्या मुलखांतील जुन्या पेढीवाल्यांचीं, संस्थानिकांची, पाळेगारांची व जमीनदारांची दप्तरें नीट तपासून त्यांतील माहितीच्या आधारे ही उणीव भरून काढिली पाहिजे. परंतु हा प्रयत्न फारच खर्चाचा असल्यामुळें व्यक्तिमात्राच्या हातून हें काम झेंपण्यासारखें नाहीं. ह्या संबंधानें भागानगर येथील कुतुबशाहीचा व विजयानगर येथील हिंदुराजांचा व त्यांच्या मांडलिकांचाहि इतिहास नव्यानेंच शोधून काढावयाचा आहे. विजयानगर येथील राजांची नाममालिका ताम्रपटांवरून लागलेली आहे, परंतु त्या राजांच्या कारकीर्दीतील प्रसंगांची माहिती बहुतेक शून्य आहे. सारांश, तालीकोटच्या लढाईपासून म्हणजे १४८६ पासून म्हणजे मालोजीच्या उमेदवारीपासून तों १५५९ पर्यंतची इतिहासाची साधनें अद्याप हडकून काढावयाची आहेत. तीं कमजास्त प्रमाणानें सापडण्यासारखीं आहेत, हें मला सांपडलेल्या सोळाव्या शतकांतील कांहीं लेखांवरून संभवनीय दिसतें.