Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
जन्माचें सार्थक व्हावे ह्मणून हा प्रसंग जगदीशें परमपुण्येकरून याजिला, मृत्यू योजिला हे मुख्य आहे, याजपेक्षां अधिक पुढे विशेष काय करणें ? घरी अथवा दुर्गी, पर्वती, पाताळी, कोठेहि चुकत नाही. अशा प्रत्ययपूर्वक गोष्टी ऐकोन, लाचार होऊन, उगाच राहिलो. मातोश्रीस गजारूढ करून, श्रीमंत विश्वासराव यांजला घेऊन, आह्मी चालिलो. इतिकयांत इभ्रामखान गाडदी यास वर्तमान कळलें. त्याजवरून तयार होऊन बोलिला कीं, हे कर्म अनुचित करता, रायाची नेमणूक पहिली दरोगी तोफखान्याचे केली होती, आणि हा उपाय करता! परंतु उपयोगास येणार नाहीं, जसे पूर्वी आह्माजवळ होते तसेच असावे, मी जिवंत असता सात पातशाहा एकत्र होऊन चालून आले तरी तीन वेळां फिरवीन, तशांत अबदलअल्लीची बिशात काय आहे ? असें असतां आश्चर्य दर्शवून फौज बेहिंमत करता! असे उपाधियुक्त वाक्य करता जाहला. लाचार! नाइलाज! त्याजपुढे अवघे संकटार्णवी स्तब्ध राहिले. श्रीमंत विश्वासराव यांणी त्याचें बोलणें ऐकून चित्तांत विचार करून, धैर्य धरिले कीं, भाऊसाहेबीं आपला वियोग करून आह्मी वांचावें असे निर्मिले हे आह्मास विहित नाही; सारांश जो मार्ग त्यांचा तोच आमचा, आह्मी धाकटे आहों, आदौ पुढे जाऊन, मोक्षमार्ग सिध्द करून, स्थळ उभयतांचे पाहूं. असे मनांत धरून कोणास न पुसतां, इभ्रामखान गाडदी याजकडे हत्ती डुलवून आणला. देव व वृद्ध ब्राह्मण व वडील यांचे वंदन करून, अंगांतील कवच होतें ते काढून, निश्चयपूर्वक सर्वांस गोष्ट सांगितली कीं, जो प्राणी वाचेल त्याणें आजचे प्रसंगाचें आमचे कौतुक पाहून दक्षणेत तीर्थरूप नानासाहेब यांजवळ सांगावें. असे बोलून, हत्ती पेलवून दारूखान्याजवळ गेले.