Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

असें बोलोन पत्राचें उत्तर त्यास लिहिले कीं, तुह्मी ह्मणता ते आह्मास कबूल, परंतु सातशे कोस आह्मी चालोन आलों, फौज किती अपार जाहाली आहे. सात कोट रुपये खर्च जाला तो तुह्मी आह्मास द्यावा आणि आपले मुलखास जावें, नाहीं तर जें होणार तें होईल. अशी बोलण्याची त्यांची व यांची रदबदली लागली. कांही रुपये द्यावयास त्यांनी कबूल करावें असा प्रसंग जाहला. माणूस शंभर रदबदली करावयास लागलें. इतकियांत राजश्री गोविंदपंत बुंदेले तमाम कहीवाले लोक दहा हजार फौज घेऊन कही आणावयास बाहेर विसा कोसांवर गेले. मुलूख तमाम हैराण जाहला. दोन्हीं लष्करांत महर्गता जाली. ते समयीं त्याजकडील पठाण वीस हजार फौज घेऊन कहीस गेला. परस्परें दरम्यान कही कहीचा कज्जा मोठा घोरंदर जाहाला. मारामारी जाहली. राजश्री गोविंदपंत बुंदेले हजार स्वारांनिशी एक उजाड जागा गांवाजवळ होती तेथें आराबा पहात उभे राहिले होते. वरकड लोक बरोबर होते ते जिकडील तिकडे फौज गेली होती. तिकडे खटका जाहला. पठाण एक जमावानिशी होते. जेथवर त्यांचा हात पोहोंचला तेथवर कत्तल करीत गेले. तमाम कही व फौज पळों लागली. पंतमशारनिल्हे ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी बातमी आली. तेव्हा बुंदेले समोर होऊन पठाण हाटकिले. परंतु समान स्वार एक हजार अगदी थोडे. बाकी फौज चोहोंकडे उधळोन गेली. कोणी यापाशीं आला नाहीं. पठाण निकड करून चालून आले. निरुपाय गोष्ट जाहली. ते समयीं तलवार एक प्रहरपर्यंत जाहली. शेवटी एक सहस्त्र सैन्य यापाशीं राहिलें तें व गोविंदपंत बुंदेले वैकुंठवासी जाहले. रणभूमीचे ठायीं देह पडला. उद्धट पराक्रम करून प्राण सोडिला. पठाण यांणी शिरच्छेद केला हे अशुभ वर्तमान खेदकारक श्रीमंत भाऊसाहेबीं ऐकिलें. सलूकाचा तह जाहाला होता, तो बिघाड होऊन दोनी फौजा प्रज्वलित जाहाल्या. श्रीमंत भाऊसाहेब आपण तोफखान्याजवळ येऊन तीनशें जरबा थोर तोर व इभ्रामखान गाडदी यास घेऊन लष्कराबाहेर निघाले. पठाण याची फौज तयार जाली नवती. अचानक साफी करोन जाऊन पोहोचले. आराबियाची देवड जरूर लाविली. पठाणफौजेतील दाहा हजार पठाण पायउतार होऊन बाहेर पडोन धीरवीर आले. सुजायतदौला व अबदलअल्ली वगैरे फौज तयार होऊन पळो लागले. जैसा मृत्युभयें प्राण पळतां काळ पाठीशीं आहे, तैसे तोफांचे गोळे जिकडे जो जाईल तिकडे मागेंच आहेत. या जंगेत पांच हजार मोहरे त्याजकडील मृत्यु पावले. त्यामध्ये चार हजार पुरजे पुरजे होऊन राहिले. ऐसा भयाभंग जाहाला. कित्येक शिपाई लोक व आणीक गरीब बाजारी लोक व जनावरसुध्दां अस्तिगतप्राण जाहले. तममा फौज सात कोस पळाली. ते दिवशीं त्याजकडील जिवलग योद्धे चांगले माणूस कामास आले. सात कोसांवर जाऊन सुजायतदौला व अबदलअल्ली परस्परें धुंदीस आले. उभयतांची लडाई सफेजंगी होऊं लागली.