Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१७४] श्री. ९ एप्रिल १७२५.
श्रीमत् परमहंस गोसावी बावा स्वामीचे सेवेसी :-
सेवक कान्होजी आंगरे सरखेल साष्टांग दंडवत विनंति येथील कुशल चैत्र बहुल अमावस्या सौम्यवारसपर्यंत जाणून स्वकीय कुशल व आशीर्वादलेखन आज्ञा केली पाहिजे. विशेष. स्वामींनीं चंद्रज्योति, नळें, पाविशीं आज्ञा केली. त्याजवरून चंद्रजोती सुमार २५, नळें, शिंगे सुमार २५ पंचवीस चंद्रजोति व पंचवीस नळे पाठविले आहेत. हेमगर्भ मागाहून पाठवून देऊन. विदित जालें पाहिजे. कृपा निरंतर असों दिली पाहिजे. हे विज्ञप्ति.
[१७५] श्री. ३ एप्रिल १७२७.
श्रीमत् परमहंस बावा स्वामीचे सेवेसी :-
सेवक कान्होजी आंगरे सरखेल साष्टांग दंडवत विनंति विशेष. येथील कुशल चैत्र बहुल सप्तमी सौम्यवासरपावेतों जाणून आशीर्वादलेखन केलें पाहिजे. यानंतरीं स्वामींनीं पत्रें पाठविली ती पावलीं. लिहिले कीं, गोठणेयाहून निघोन घांटावरी धावडशीस आलों. परंतु वाटें उष्ण बहुत, त्या श्रमानें ज्वराची वेथा शरीरीं फार जाली. हे वर्तमान राजश्री यांस कळलियावरी साताराहून फालगून वद्य नवमी, बुधवारी, धावडशीस आले. तों आह्मी तळेयाचे कामावरी होतों. तो एका बाणाचे टपियावरून पायउतारा होऊन आह्मी येतों, तेथे आले. बहुतशी मर्यादेनें, परम निष्ठेने, भेट घेतली. भेटीनंतर स्वकीय कुशल सांगितले. तें आयकोन आपले स्वकीयहि सांगितले. ऐसें परस्परें संतोषाचें भाषण जाले. मग आंगावरी दुशालाची जोडी होती, ते राजश्रीचे आंगावरी प्रसाद घातला. मग तेथून राजश्री व आह्मी आपले वाडियांत आलों. अन्नप्रसाद सिध्द जाला. तो राजश्रीस व सडी बायका होते त्यांस भोजन घातले व राजश्रीच्या बायकांस अन्नप्रसाद, वस्त्रे राजश्रीबरोबर देऊन, सातारियास रवाना केलें. बहुतसे आदरें करून श्रीस संतोषविले. हें वर्तमान कळावे ह्मणून स्वामीने लिहिलें. त्याजवरून सविस्तर कळो आलें. व भेटसमयीं तुरकी घोडा दिल्हा ह्मणून स्वामीनें लिहिले. तरी स्वामीचें तेज सामान्य नाहीं! श्रीभार्गवस्वरूप आहेत. जो कोणी स्वामीस न मानी तोच अविवेकी आहे. जे स्वामीचें स्वरूप समजले आहेत, त्यास ते स्वामीचे मर्यादेस अंतर करीत नाहीं. बहुत काय लिहिणे. स्वामी समर्थ आहेत. कृपा असो दीजे. हे विनंति.