Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ तिसा अर्बैन मया व अल्लफ सन ११५८ फसली,
अवल साल छ ७ जमादिलाखर, २४ मे १७४८,
ज्येष्ठ शुध्द ८ शके १६७०.
छ २३ रज्जब (९ जुलै १७४८) श्रीमंत नानासाहेब जनार्दनपंतसुध्दां नेवाईची स्वारी करून पुण्यास परत आले. भाऊसाहेब यास पुत्र झाला, छ १५ साबान (३० जुलै १७४८). छ २९ साबान (१३ आगष्ट १७४८) नानासाहेब यांस यशवंतराव ह्मणून पुत्र झाला होता. छ ११ रमजान रोजी (२५ आगष्ट १७४८) साता-यास जाऊन छ १ सवाल रोजीं (१४ सप्टंबर १७४८) परत पुण्यास आले. छ ३ साबान (१८ जुलै १७४८) गडगडा किल्ला शंकराजी केशव हसबनीस यांनी घेतल्याचें समजलें. छ १० साबान (२५ जुलै १७४८) हरिश्चंद्रगड कर्णाजी शिंदे यांनी फत्ते केला. सबब सोन्याचें कडें बक्षीस दिलें. छ ७ जिल्हेज रोजी (१८ नोव्हेंबर १७४८) स्वारीस निघाले व छ १० रोजीं (२१ नोव्हेंबर १७४८) परत आले. थेऊरास जाऊन कल्पलतादान देऊन. छ २४ मोहरम (३ जानेवारी १७४९) नानासाहेब साता-यास जाऊन लागलीच छ ११ रबिलावल रोजीं (१८ फेब्रुवारी १७४९) परत आले. मुंजीचे आमंत्रणाकरितां गेले असावे. छ ५ सफर (१४ जानेवारी १७४९) समशेर बहादर याची मागणी घातली, लक्षधीर दौलतराव, संस्थान पेंठ, व पुढें जमादिलावल महिन्यांत लग्न झालें. छ ११ सफर (२० जानेवारी १७४९) नानासाहेब व भाऊसाहेब व जनार्दनपंत स्वारीस निघाले व छ ९ रबिलावली (१६ फेब्रुवारी १७४९) परत आले. छ ३० रबिलावल (९ मार्च १७४९) विश्वासराव यांजी मुंज झाली. छ २९ रबिलाखर (७ एप्रिल १७४९) जयाजी शिंदे व मल्हारजी होळकर यांजकडून करेरा घेतल्याची व दतियाशीं पण केल्याची खबर आली. छ २४ जमादिलावल (१ मे १७४९) देवदेवेश्वर पर्वती याची स्थापना झाली. पर्वताई भवानी पूर्वीचीच पाषाणाची स्थापिली. गणपति व महादेव रुप्याचा व पार्वती सोन्याची व बाण देवदेवेशर छ २९ रबिलाखर (७ एप्रिल १७४९) छ जमादिलावल (६ मे १७४९) पर्यंत वैशाखमासीं स्थापना झाली. शाहू महाराज यांची धाकटी बायको अजारी होती, तिजला महाराजांनी घेऊन जेजुरीस आले. तेथें या साली निवर्तली. दहन माहुलीस नेऊन केलें. श्रीपतराव व केदार हत्ती मेला. चित्त उदास झालें. वृध्दापकाळी पोटी संतान नाहीं. काळविपर्यास आला, ह्मणून वनवास करावा या हेतूनें सातारा व माहुलीचे दरम्यान वाडी होती तेथें राहिले होते. त्या वाडीचें नांव वनवासवाडी पडलें. निजामउन्मुलूख बऱ्हाणपुरी मयत झाले. यास या वेळेस पुत्र होते ते : १ गाजुदीनखान, २ नासरजंग, ३ सलाबतजंग, ४ निजामअल्ली, ५ महमदसरीफ, ६ मोगलअल्ली. यांत प्रथम दोघे एक आईचे. दुसरे चार यांच्या आया निरनिराळया होत्या. निजामउन्मुलूख मरण पावला तेव्हां गाजुदीन दिल्लीस होता, ह्मणून दुसरा पुत्र नासिरजंग तोच तक्ताधिपत्य करूं लागला. यानंतर दोन तीन महिन्यांनी दिल्लीबादशाहानें नासिरजंगास भेटीस बोलाविलें. याप्रमाणें निघून नर्मदेपर्यंत गेला तोंच न येण्याविषयी पुन: पत्र आलें. तत्राप तो उदासचित्त न होतां त्याचा पुतण्या मुजफरजंग याचे व चंदासाहेब याच्या साह्यानें व फ्रान्सिस्कोच्या आश्रयानें दंगा करीत होता हें वर्तमान व दुसरें वर्तमान आणखी कळलें की निजामउन्मुलुखानें आपला हस्तक अनवरुद्दीन कर्नाटकांत पैन घाटीं ठेविला होता तो मेला. नंतर नासरजंगानें रघोजी भोसल्यास पत्र पाठविलें कीं, माझ्या साह्यास आला तर मी कांहीं मुलूख देईन. याखेरीज जे मागील संबंधी लोक होते त्यांसही मी तिकडे येतों, तुह्मीं मला मिळावें. तेव्हां तो कर्नाटकांत चालला. तेव्हां ते लोक त्यास मिळाले. त्यांस मुरारराव घोरपडा असे. त्यास निजामउन्मुलुखानें गुत्तीची जहागिरी दिली होती. ह्मणून त्यास जाणें अवश्य झालें. दुसरा महीदपूरचा राजा व कितीएक नबाब व अनवरउद्दीन याचा दुसरा पुत्र महमदअल्ली असे सर्व स्वत: किंवा लष्कर पाठवून साह्य करीत असत. महमदअल्लीचे स्नेहास्तव मद्रासचे इंग्लिश लोकही नासिरजंगाचे उपयोगीं पडले. मोरोबादादा फडणीस यांचे लग्न झालें. आईचें नांव पार्वतीबाई, बाबूराव फडणवीस याची बायको.