Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

पेशवे यांजकडील नारायणजी ढमढेरे पडले. याप्रों लढाईचा शेवट झाला. यावर्षी ब्राह्मणांस तळेगांवी दक्षणा मिळाली नाहीं. ब्राह्मण पुण्यास आले. तुह्मी सेनापति मारिले असें बोलू लागले. तेव्हा हुजूर साता-यास लिहून ब्राह्मणांस ठेवून घेतलें. उत्तर आल्यावर श्रावण शुध्द ७ स (३० जुलै १७३१) दक्षणा दिली. शु॥ ५ मीस (२८ जुलै १७३१) दाभाडे देत होते. ही दक्षणा पुढें पेशवे अखेरपर्यंत ब्राह्मणास दरसाल श्रावणमासी देत होते. त्र्यंबकराव याचे पुत्र व उमाबाई दाभाडी व बाजीराव पेशवे यांशी महाराजांनीं साता-यास बोलाऊन माळवा व गुजराथची हद्द करून देऊन तह ठरविला की, निम्में निम्में ऐवज फौजेस वगैरे खर्च करावा, व निम्में रसद हुजूर यावी. जातीचे खर्चास नेमणूक करून दिली. पेषकसी होईल ती हुजूर यावी. याप्रों तह ठरवून पुत्र यशवंतराव यास पदाची वस्त्रें सेनापति हुद्द्याची दिली. ते व्यसनी बेहुष राहू लागले. सबब त्याचा कारभार गायकवाड यांनी बाईचे विचारें करावां असें केलें. बाजीरावसाहेब दाभाडे यांची लढाई झाल्यावर लागलीच छ १ जिल्काद रोजी (२७ एप्रिल १७३१) चिमाजी अप्पासुध्दां परत आलें. दुसरे वर्तमान सालगुदस्त प्रतिनिधींनीं संभाजीचा पराभव करून पन्हाळ्यास लाविलें. ते पन्हाळ्यास गेल्यावर जिजाबाईचें विचारें पारसनीस बाळप्रभू व चिटणीस चिटको प्रभू याशींह सल्ल्याकरितां शाहू महाराजाकडे पाठविलें. याप्रमाणें महाराजांनी मान्य करून महाराज यांची स्वारी उंबरजेस आली, व संभाजी महाराजही भेटावयास आले. उभयतांच्या भेटी क-हाडानजीक जखीणवाडीस झाल्या, शके १६५२ फाल्गुन शु॥ ३ साधारण संवत्सरे (२८ फेब्रुवारी १७३१) उंबरजेहून साता-यास आले. तहनामा शके १६५३ छ १६ सवाल वरोधीकृत संवत्सरे चैत्र व॥ २ (१३ एप्रिल १७३१) बिपतशील. अहद वारूणमहाल तहत संगम दक्षिणतीर कुलदुतर्फा मुलूख दरोबस्त देखील ठाणी व किल्ले तुह्मास दिले असत कलम १. किल्ले कोपल तुह्माकडे दिला. याचे मोबदला तुह्मीं रत्नागिरी आह्माकडे केली, कलम १. वडगावचे ठाणे पाडून टाकू. कलम १. तुह्मापाशी जे वैर करितील त्यांचें पारपत्य आह्मी करावें, व आह्माशी जे वैर करितील त्यांचे पारपत्य तुह्मी करावें. आह्मी तुह्मी एकविचारें वागून राज्यभिवृध्दि करावी, कलम १. वारणेच्या व कृष्णेच्या संगमापासून दक्षिणतीर तहत निवृत्तिसंगम तुंगभद्रापावेतों दरोबस्त देखील गड, ठाणीं तुह्माकडे दिली असत, कलम १. तुंगभद्रापासून तहत रामेश्वर देखील संस्थान निम्में आह्माकडे ठेऊन निम्में तुह्माकडे करार करून दिले असत, कलम १. कोकणप्रांती साळशिपलीकडे तहत पंचमहालपावेतों दरोबस्त तुह्माकडे दिले असत, कलम १. इकडील चाकर तुह्मी ठेऊ नये, व तुह्माकडील चाकर आह्मी ठेऊ नये, कलम १. मिरजप्रांत विजापूर प्रांतींचीं ठाणीं देखील अथणी, तासगांव वगैरे तुह्मी आमचे स्वाधीन करावीं. कलम १. एकूण नऊ कलमें करार करून तहनामा लिहून दिला असे. सदरहूप्रें॥ आह्मीं चालवूं. याशीं अंतर होणार नाहीं. मोर्तब.