Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ४२.

१७०६ आषाढ वद्य ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे :- बाबाराव नामें गृहस्थ नवाब निजाम अल्लीखान यांजकडून राजश्री पाटीलबावाकडे वकिलातीस आले आहेत. याचें कारण कीं, हैदराबादेपलीकडे सरहदेस कांहीं नवाबाचे प्रगणे आहेत ते इंग्रजांनीं पूर्वी इजारा करून घेतले होते. त्याचा पैका प्रथम दिल्हा, आतां देत नाहींत. हिसेब करितां येक करोड सत्रा लक्ष रु।। इंग्रजांकडून नवाबाचे निघतात. त्यास, इंग्रजांचा सलूक श्रीमंतासी राजश्री पाटील यांचे विद्यमानें जाहला आहे, यांचा इंग्रजाचा स्नेह आहे. ह्मणून याजकडे आपला गृहस्थ जाबसालास पाठविला आहे कीं, याचे हातून कांहीं सामदामानें इंग्रजांकडून ऐवज पदरीं पडला तर उगवून घ्यावा. म्हणून याजकडेस पाठविला आहे. त्यास, राजश्री पाटीलबावांनीं इंद्रसेनासी बोलून आपलीं पत्रें व इंद्रसेनाचीं पत्रें कलकत्त्यास पाठविलीं आहेत. तेथून अद्यापि जाबसाल आला नाहीं. म्हणून बाबाराव रा। पाटीलबावा-पासींच आहेत. त्यास यासी व नवाब निजाम अल्लीखान यासी स्नेहवृद्धि व्हावी म्हणून हत्ती एक व घोडा एक मोत्याची माल व झगा, सिरपेंच, किनखाप साहा व शालजोड्या ६ व तरदाम बंगाली थान ६ व फुलचरी बदामी थान ६ व तीन हजार रु।। नख्त दिल्हे कीं, बऱ्हाणपुरीहून शेला पागोटीं कच्च्या रंगाचीं बऱ्हाणपुरीं घेऊन जावीं. म्हणून कारकुनास आज्ञा. नवाबाकडील मुखत्यार कारभारी यास घोडा येक व किनखाप ४ व शालजोड्या ४ व तरदाम ४ व फुलचरी ४ व मोत्याची कंठी व झगा, शिरपेंच येणेंप्रों सरंजाम आपला कारकून समागमें देऊन रवाना केला. व याची बहीण आनंदीबाई महाराव निंबाळकर यांस दिल्ही होती, ते याचे भेटीस आली होती. तीस या प्रांतीं पन्नास हजार रु।। कर्ज जालें. त्यास ते याची आज्ञा घेऊन माघारा जाऊं लागली. ते समईं पन्नास हजार रुपये सावकाराचे वारून, पंचवीस हजार रुपये मार्गी खर्चास देऊन बिदा केली. ते ग्वालेरीसमीप जाऊन मृत्य पावली. तिच्या नाती दोघी मुली समागमें होत्या व सरंजाम सुखरूप देशी कल्याणराव कवडे याजपाशीं जाऊन पोहचावा ह्मणून येथून कारकून बिदा केला आहे. तो पावता करील. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हे विनंति.