Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीवरद.
लेखांक १३.
१७०३ ज्येष्ठ शुद्ध ६.
पु।। श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंतिपत्रीं आज्ञा कीं : नबाब नजबखान यांचे जाणें शिंद्याकडे न होय तरी कोण्ही उमदा सरदार त्याजबरोबर फौजे पोत्ख सामान देऊन जरूर रवाना करावा, ह्मणजे तिकडील फौज मिळोन दुहिरी शहानेंइंग्रेजी पलटणें शिकस्त होतील. ह्मणून लिहिलें. त्यास, याअन्वयें लिहिल्याप्रमाणेंच बोलून, महमद बेगदानी ढवळापुरी आहे त्यास पत्र व अनुपगीर गोसावी जयपुरी नजबखानाकडून मामल्याचे ऐवजास वसूल करावयास गेला आहे त्यास पत्रें नजबखानाची कीं, तुह्मी आपले फौजेनसी सरंजामसुद्धां जाऊन राजश्री पाटीलबावास सामील होणें, व पाटीलबावाचे नांवे पत्र कीं, तूर्त दोन्ही पथकें तुह्मांकडे रवाना केलीच आहेत ते येऊन सामील होतील. बादजबरसाल शिखाकडील फौज रिकामी झाली ह्मणजे आह्मीही पातशहासहित बाहेर निघतों. याप्रमाणें तीन पत्रें तयार केली. इतक्यांत कलकत्याहून हालसाहेब इंग्रज आला होता, त्याजकरितां ते पत्रें आह्मांपाशी न देता आपलेपाशींच ठेवून घेतली. आता तो गेलियावर फिरोन हाटकिलें. त्यावरून पुन्हां पत्रें द्यावीसें ठराविलें आहे. पत्रें हातास आलियावर पाटीलबावाबरोबर रवाना करितों. परंतु हे इंग्रजास भितात. फार खुलून बोलत नाहीत. पुढे अंमलात येईल ते मागाहून विनंति लिहूं. कृपा केली पाहिजे. भेट होय तो सुदिन. हे विनंति.