Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

४६. येथ पर्यंत केलेल्या विवेंचनाचा इत्यर्थ असा कीं भारतवर्षांत फार पुरातन काला पासून दोन स्वभावाचे लोंक वावरत आलेले आहेत. राज्ययंत्र चालवून पोट भरणारे बहिस्थ भुकेबंगाल लोक व अन्नसंपत्ति निर्माण करून सालसपणें कालक्रमणा करणारे अंतस्थ अन्नसंतृप्त लोक. जेव्हां केव्हां पासूनचा भारतवर्षाच्या इतिहास आपणास माहीत आहे, तेव्हां पासून हे दोन वर्ग दृष्टिपथांत येतात. दुस-या वर्गास बहि:स्थ वैदिक लोक विश् ह्या संज्ञेनें ओळखीत. विश् म्हणजे बैठे लोक म्हणजे बिछायत पसरून शेतकी व व्यायाम करणारे लोक. विश् लोक संपत्ति कमाविण्यास लागणा-या करामतीनें मारामा-या करण्यांत पटाईत अशा क्षत्रिय लोकां हून जास्त सुधारलेले असत. विश् लोकांत राजा, राज्य, राष्ट्र, इत्यादि राजकीय अर्थांचा हव्यास अत्यन्त अल्प प्रमाणाचा असे. कदाचित् राजन् ही पदवी विश् लोकांना क्षत्रियांची गांठ पडे तों पर्यंत माहीत हि नसावी. क्षत्रियांना व ब्राह्मणांना मात्र राजा, राज्य, राष्ट्र व प्रजा हे चार अर्थ फार प्राचीन काला पासून माहीत होते. कारण ते पृथ्वीच्या ज्या प्रदेशांत रहात असत त्या प्रदेशांत अन्नाची टंचाई पराकाष्ठेची असे. अन्न दे, प्रजा दे, राजा दे, गाई दे, मेंढ्या दे, अशा मायन्याच्या प्रार्थनांनी चार हि वेद भरलेले आहेत. (Give us our daily bread, ही जशी यूरोपीयन लोकांची निकडीची प्रार्थना त्याच मासल्याची ब्राह्मणक्षत्रियांची भुकेबंगाली प्रार्थना असे. राजा व प्रजा ही संस्था ब्राह्मण क्षत्रियांनीं भारतवर्षांत आणिली. प्रत्येक बाप आपल्या प्रजेचा म्हणजे संततीचा राजा असे. राजा म्हणजे रक्षण करणारा. मूळ राज् या धातूचा किंवा खरें म्हटलें म्हणजे शब्दाचा अर्थ रक्षण करणें असा होता. संतीताचें रक्षण, पाळण व पोषण करणारा जो तो राजा. राजा ह्या शब्दा सारखा च पितृ हा शब्द आहे. पितृ म्हणजे पाळण, रक्षण, पोषण करणारा. राजा व त्याच्या पोटची प्रजा मिळून राष्ट्र होई. पोटच्या संततीस च तेवडी प्रजा हि संज्ञा असे. प्रजेला व्यक्तिदृष्ट्या राष्ट्रीय म्हणत. राज् रक्षण करणें ह्या धातूला ऐश्वर्यवान् होणें, अधिकार चालविणें, इत्यादि अर्थ लक्षणेनें नंतर आले. मूळचा राजन् हा शब्द पितृ ह्या शब्दाचा समानार्थक होता. प्रजा हा शब्द केवळ पोटची संतति ह्या अर्थाचा वाचक होता. Subject म्हणजे खालीं दडपिलेला ह्या अर्थी प्रजा हा शब्द त्या प्राचीन कालीं योजिला जात नसे. विश् जेव्हां भेटले तेव्हां subject ह्या अर्थी दास हा शब्द अस्तित्वांत आला. तों पर्यंत राजा व प्रजा ह्या संस्थेंत दास नव्हते. मूळचें आर्य लोकांचें राष्ट्र म्हणजे राजा व पोटची प्रजा. ह्या आर्यांना अर्य भेटले. अरेः इदं अर्यं. अर्य म्हणजे शत्रू जे विशू लोक त्यांना आर्यांनीं दास हें टोपण नांव दिलें. दास म्हणजे देणारे. दाला सिप् किंवा सन् होऊन दास हा शब्द झाला आहे. दास म्हणजे कर देणारा. विश् जो दास तो राजाला कर देई. संतती जी प्रजा ती कर देत नसे. प्रजा वयांत आली म्हणजे ती राजा ह्या पदवीला पोहोचे. दास जे विश् ते राजा ह्या पदवीला किंवा प्रजा ह्या पदवीला पोहोचत नसत. ते केवळ कर देणारे जित लोक असत. प्रत्येक पितृ राजन् असल्यामुळें अनेक पितृ मिळून जो गण होई त्या गणांतील सर्व पितृ आपणास व्यक्तिशः राजन् म्हणवीत. टोळींतील असे अनेक राजे मिळून गणराज्य होई. गणाचा जो पुढारी त्याला गणराज्, गणपति किंवा गणनायक ही संज्ञा असे. गणराजा जेव्हां आपल्या हातीं सर्व सत्ता बळकावी तेव्हां त्याला एकराज् म्हणत किंवा संक्षेपानें राज् म्हणत. राज् व गणनायक हे दोन शब्द प्राचीन इतिहासदृष्ट्या अत्यन्त महत्वाचे आहेत. रोमन् राजार्थक rex शब्द राज् ह्या धातूला सिप् किंवा सन् होऊन बनला आहे. राज् + स् = राक्स् = रेक्स् . गणनायक = कोणआअग = Konig= King अश्या अपभ्रंशानें किंग, कोनिग हा राजार्थक इंग्लिश व जर्मन शब्द बनला आहे. Konig, King ह्या शब्दाचा मूळ अर्थ heap of the horde, leader of the horde, असा आहे. ह्या व्युत्पत्यां पासून असें निगमन प्राप्त होतें कीं राज् हा शब्द ज्या काळीं वैदिक आर्यांत अधिपति, ईश्वर ह्या अर्थाचा वाचक झाला त्या कालीं वैदिक आर्य व रोमन लोकांचे पूर्वज एकमेकांच्या शेजाराला होते; तसेच, गणराज् , गणनायक, हे शब्द ज्या कालीं गणराज्यसंस्थेच्या अनुषंगानें वैदिक आर्यांत प्रचलित झाले त्या कालीं जर्मनादि लोकांचे पूर्वज वैदिक आर्यांच्या शेजाराला होते. रोमन व नर्मन लोक वैदिक आर्यांच्या शेजाराला होते व आर्यभाषा बोलत होते म्हणून ते आर्यवंशी होते, असें मात्र समजण्यांत अर्थ नाहीं. जर्मन, साक्सन्, रोमन, वगैरे लोक वंशानें आर्य नव्हते. राक्षस् , दानव, यातु, वगैरे अनार्यवंशांतले हे आर्यभाष लोक होते. अशी ही प्राचीन गणराज्यसंस्था घेऊन भारतवर्ष हें नांव ज्या देशास पुढें कालान्तरानें पडलें त्या देशांत आर्यांची धाड शिरली व त्या धाडीनें एकराज्य, वैराज्य, साम्राज्य, माहाराज्य इत्यादि राजकारणाचे नाना प्रयोग केले, आणि प्रयोग करून थकल्या वर व अन्नसंतृप्त झाल्या वर मुक्तद्वारी, तुटक, संन्यस्त, वेदान्ती, समाजपराङमुख व राष्ट्रपराङमुख होऊन बसले. सुदासादि ऋग्वैदिक राजां पासून तो तहत बाजीरावादि चित्पावन राजां पर्यंत हा क्रम थोड्या फार फरकानें ह्या खंडांत चालू आहे. अन्नसंतृप्त, संन्यासप्रवण व व्यक्तिस्वतंत्र लोकांचे थरावर थर ह्या देशांत गेल्या पांच हजार वर्षे क्रमानुक्रमानें बसत आले आहेत. त्यांच्या करवीं राजकीय, देवधार्मिक, वैयापारिक, भाषिक, राज्यमारक किंवा राज्यसाधक असें कोणतें हि सामुदायिक कार्य स्वयंस्फूर्तीनें किंवा परस्फूर्तीनें आजपर्यंत कधी च झालेलें नाही. हीं सर्व कार्ये पोटा करितां राज्ययंत्र पटकविण्याची हांव धरणा-या बहि:स्थ किंवा अंतःस्थ असंतुष्ट अल्प- संख्याक लोकांच्या हातून वेळोवेळ पार पडलेलीं आहेत.