Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
४७. अपरंपार अशी अन्नसंपत्ति, साही ऋतूंत अत्यल्प कपडालत्या वर शीतोष्णनिवारण होईल अशी हवा, कित्येक शतकें पुरून उरेल अशी जागा, वगैरे साधनांची सुलभ अनुकूलता असल्या मुळें, ह्या देशांत जे जे लोक स्थायिक रहिवाशी होतात ते ते बाहुल्यानें मुक्तद्वारी, संन्यस्त, व्यक्तिनिष्ठ, समाजपराङमुख व राष्ट्रपराङमुख बनतात, ही कहाणी गेल्या दहा रकान्यांत सांगितली. अन्ना करितां दाही दिशा हिंडणा-या व चो-यामा-या, खून, कत्तली, जबरदस्ती, दंगे व लढाया ह्यांत चूर झालेल्या गेल्या तीन हजार वर्षांतील मध्यआशियांतल्या मोंगलादि बिनसुधारलेल्या उनाड लोकां कडे तिरस्कारानें दुर्लक्ष करून, अलीकडील चार शें वर्षांतील सुसंस्कृत म्हणविणा-या युरोपीयन लोकांना हे मुक्तद्वारी, संन्यस्त, व्यक्तिनिष्ठ व राष्ट्रपराङमुख लोक असा प्रश्न करीत कीं, सरकारें बनवून कर उकळीत न बसतां, सालसपणें, निमुटपणें, व शांततेनें ह्या देशांत इतरां प्रमाणें अन्न खात राहिलात तर काय बिघडेल ! एकसमाज करून, राज्ययंत्रें बनवून, राष्ट्रें निर्मून, शास्त्रें रचून, शस्त्रास्त्रे घडवून, एक जूट होऊन, स्वदेशांतील लक्षावधि मोल मजुरांची व भिकार भणंगांची उपासमार करून व परदेशांतील अन्न लुटून शेवटीं पोटाची खळी भरण्या पलीकडे कोणतें शतकृत्य साधता ? आमच्या देशांत आम्हांला ज्या प्रमाणें सरकार ही संस्था जरूरीची भासत नाहीं त्या प्रमाणें तुमच्या कडील शेंकडा नव्वद लोकांना हि समाजाच्या अंतर्बाह्य जिकडेतिकडे घुसणारी सरकार ही संस्था मना पासून नको आहे. तेव्हां, कांहीं उपद्वयापी अल्पसंख्याक लोकांनीं स्वतःची चैन भागविण्या करितां स्थापिलेल्या व सर्व पृथ्वीला पीडा करणा-या सरकार ह्या कृत्रिम व अनवश्यक संस्थेला तुम्हीं आम्हीं. सर्व मिळून मातींत गाडून टाकूं या. सर्व पृथ्वी भर फर्लांगा फर्लांगा वर एकेका कुटुंबाला कोकणांतल्याप्रमाणें एकेक घरवाडा देऊन जुलुमाचीं व पापाचीं जन्मस्थानें जीं शहरें त्यांचा प्रथम नायनाट करूं. ज्याला ज्या देशांत रहावेंसें वाटेल त्यानें त्या देशांत जाऊन जागा असेल तेथें बिनहरकत रहावें. भय काय तें चोराचिलटांचे, पृथ्वीच्या पाठी वरील अर्ध रानटी उनाड लोकांचें किंवा बडे जमीनदार,जंगी पेढीवाले व धंदेवाईक मुत्सद्दी यांचें. पैकीं चौराचिलटांचा मागमूस फर्लांगा फर्लांगा वर घरें झाल्यानें मुदलांत च रहात नाहीं, असा दक्षिण कोकणांतील अनुभव आहे. तो च अनुभव सर्व पृथ्वी भर येईल व चोराचिलटांच्या निवारणार्थ महार व कुत्रीं ह्यांचें देखील सरकार निर्मिण्याची अवश्यकता रहाणार नाहीं. अर्धरानटी लोकांचा एक मोठा जमाव आफ्रिकेच्या मध्य भागांत आहे. आणि दुसरा मोठा जमाव मध्य आशियांत आहे. ह्या दोन्हीं अर्धरानटी जमावांना पाठी मागून रेटून पुढें हुसकून देण्यास त्यांच्या हून रानटी व भुकेबंगाल लोक आतां राहिले नाहींत. करतां, हे हि समाज आपापल्या मूळभूमींत स्थिर होण्याचा संभव आहे. तेव्हां त्यांचा प्रतिकार करण्या साठीं सरहद्दी वरून सैन्य ठेवणा-या सरकारांची आतां अवश्यकता राहिली नाहीं. सबब, दंडधारी सरकारांना येथून पुढें कायमची रजा देणें युक्त नव्हे काय ? बडे जमीनदार, जंगी पेढीवाले आणि धंदेवाईक मुत्सद्दी यांनी सर्व पृथ्वी भर मोंगलादि अर्धरानटी लोकां प्रमाणें धुमाकूळ घालण्या करितां व आपली अनिवार द्रव्यतृष्णा भागविण्या करितां जुलमीं व घातकीं सरकारें चालविलीं आहेत. त्यांचा हा परोपघातक स्वार्थी धंदा बंद पाडण्याची वेळ होऊन गेलीं नाहीं काय ? भारतवर्षांतील व उत्तरकोंकणातील उदासीन व निवृत्त अश्या बहुतम लोकांचा शकाच्या सोळाव्या व सतराव्या शतकांताल इतिहास जर कांहीं विचारीत व शिकवीत असला तर हे प्रश्न विचारीत व शिकवीत आहे.