Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
४९. एवंस्वरूप महाराष्ट्रधर्माचें निरूपण नायकोराव ह्या क्षत्रियानें केशवाचार्य या ब्राह्मणाच्या मुखें म्हालजापुरी जमलेल्या चार हजार ब्राह्मणक्षत्रियादि अठरापगड जातींना निरूपविलें. तें निरूपण ऐकून क्षात्रतेज व राज्याचिकीर्षुत्व कितपत उज्ज्वलित झालें तें शक १३७० नंतरच्या इतिहासा वरून दिसतें च आहे. सुग्रास अन्न खाण्यास चटावलेल्या राज्यपराङमुख लोकांच्या मनावर त्या निरूपणाचा कांहीं एक परिणाम झाला नाहीं. तत्रापि, १३७० नंतर दोन शें वर्षांनी म्हणजे शक १५७० च्या सुमारास शिवाजी नामें करून एका महान् वीर पुरुषाच्या नेतृत्वा खालीं बुभुक्षित अश्या पांच चार शें वरघाटी परस्थ ब्राह्मणमराठ्यांनीं उत्तरकोंकणांत कल्याणप्रांतीं स्वत:चें सरकार ऊर्फ स्वराज्य स्थापिलें. त्या स्थापनेंत उत्तरकोंकणांतील खास रहिवाश्यांचा कितपत हात होता तें सांगणारीं कागदपत्रें अद्याप उजेडांत यावयाचीं आहेत. बखरींतील तिस-या, पांचव्या व सहाव्या प्रकरणां वरून एवढें मात्र म्हणतां येतें कीं उत्तरकोंकणांतील अन्नसंपन्न देसाई, पाटेल, म्हातरे, चौधरी, सोमवंशी, सूर्यवंशी व शेषवंशी मानापमानाच्या चुरशींत चूर होऊन जाऊन राज्यचिकीर्षेच्या विवंचनेशीं पूर्ण फारकत करून बसले होते, इतकें च नव्हे तर आचाराला, धर्माला व गुरूला सोडचिट्टी देऊन बहुतेक मोकळे झाले होते. शक १२७० त तुर्काण झाल्या पासून शक १३७० पर्यंतच्या शंभर वर्षांत ह्यांची जी ही राजकीय व धार्मिक ऊर्फ सामाजिक अवनति झाली तिचा पत्ता हि ह्यांना नव्हता. ह्यांना न दिसणा-या ह्यांच्या दैन्यावस्थेची परीक्षा केशवाचार्य व नायकोराव ह्या दोघा उद्धारकांना मात्र झाली. केशवाचार्य व नायकोराव ह्या उद्धारकांच्या मनांत असें आलें कीं, तिरस्कारबुद्धीनें ह्या लोकांचा नाद अजीबात सोडून दिल्यास हे स्वराज्ययंत्राला जसे पारखे झाले तसे हिंदुत्वाला हि मुकून जातील आणि राज्यनाशा प्रमाणें कुलनाशाला हि गांठतील. करतां, कारुणिकबुद्धीनें केशवाचार्य व नायकोराव ह्यांनीं स्वतःच्या खर्चानें ह्या उदासीनांना एकत्र करून, जेवावयाला घालून व चुचकारून महाराष्ट्रधर्माची ओळख करून दिली. आपण अडीच शें वर्षे स्वराज्य कसें केलें, आपले पूर्वज धाडशी कसे होते व आपले आचार किती उच्च आहेत, आपली पूर्वपीठिका किती उज्ज्वल आहे व आपली सद्यःस्थिति किती शोचनीय झाली आहे, ह्या बाबी एका कैफियतींत ऊर्फ वंशावळींत ऊर्फ कुळकटांत लिहून काढून व त्याच्या शेंकडों नकला करून त्या नकला ह्या दोघा उद्धारकांनीं तेथें जमलेल्या लोकांना फुकट वाटल्या. उद्धारकांनीं काकळुतीनें गळ्यांत बांधिलेल्या नकला उशाशीं गुंडाळून ठेवून हे ऐदी, उदासीन व सुखावलेले लोक जे झोपी गेले ते मुसुलमानाचें राज्य जाऊन पोर्तुगीज लोकांचें राज्य चिमाजी अप्पानें शक १६६१ त वसईंतून भिरकाटून दिलें तव्हां तीन शें वर्षांनीं किंचित् जागे होतात न होतात (अणजूरकरांची पत्रें वगैरे) तों पुन: गाढ निद्रेनें अद्ययावत् पछाडले गेले आणि अन्नसंपन्नतेनें व अन्नसौलभ्यानें पृथ्वीच्या पाठी वरील कोणी हि अल्पसंतोषी लोक मुक्तद्वारी, उदासीन, संन्यस्त व्यक्त्येकनिष्ट राज्यपराङमुख बनतात ह्या सिद्धान्ताचें त्रिकालाबाधित्व प्रस्थापित करते झाले. तुम्हीं क्षत्रिय, स्वतः राज्य करण्याचा तुमचा अधिकार, तुम्हीं परकीय राज्यकर्त्यांची सेवा करणें ऊर्फ सहकार करणें सर्वधा अनुचित, इत्यादि प्रछन्न उपदेश केशवाचार्यानें व नायकोरावानें ह्या कोंगाड्यांस गोड शब्दांनीं केला. परंतु त्या उपदेशा प्रमाणें कां वागावें हें च मुळीं त्या अहृदयांना कळे ना. आपलें कांहीं एक गेलें नसतां व आपली चंगळ चालूं असतां, परकीय राज्यकर्त्यांशीं सशस्त्र किंवा अशस्त्र असा कोणता हि प्रतिकार करण्याचें सबळ कारण ह्या लोकांना दिसे ना. उलट, राज्यकर्त्यांना परकीय म्हणणा-या केशवाचर्याच्या व नायकोरावाच्या खुळचट मूर्खपणाची मात्र त्या शहाण्यांना कींव आली.