Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
माहाराष्ट्र ह्या शब्दाचा अपभ्रंश माराष्ट्र (पृष्ट ६०). महाराष्टे भवा: माहाराष्ट्रा: । माराष्ट्र म्हणजे मराठा. मराठा ह्या शब्दाचे दोन अर्थ, भोसले, चव्हाण, जाधव इत्यादि जे क्षत्रिय ह्यांना महाराष्ट्रिक अशी प्राचीन संज्ञा होती. त्यांना प्रथमारंभीं मराठा हें उपपद अन्यव्यावृत्यर्थ लावीत. महाराष्ट्रिकांनीं वसविलेला जो देश त्याला महाराष्ट्र असें नांव पडलें. नंतर त्या देशांत ब्राह्मणा पासून अंत्यजा पर्यंत जेवढ्या म्हणून हिंदू जाती होत्या त्यांना माराष्ट्र ऊर्फ मराठा ही व्यापक संज्ञा लावण्याचा प्रघात चालू झाला. ह्या व्यापकसंज्ञेनें विशिष्ट जे सर्व लोक त्यांचा जो धर्म तो महाराष्ट्रधर्म म्हणावा. भिन्न वर्ण, भिन्न गोत, भिन्न कर्म, भिन्न आचार, भिन्न पहिराव, भिन्न भूषणें, भिन्न भाषा, भिन्न कुळ्या, इत्यादि नाना उपभेद ह्या मराठ्यांत यद्यपि असले तत्रापि कांहीं धर्म ह्या लोकांत सामान्य आहेत. धर्म चार; (१) देशाचार, (२) कुळाचार, (३) वंशाचार व (४) देवशास्त्राचार, आचारप्रधानो धर्मः । करतां आचाराला केशवाचार्य धर्म म्हणतो. (१) देशधर्म, (२) कुळधर्म,(३) वंशधर्म व (४) देवधर्म. याज्ञवल्क्यादि ऋषींनीं प्रचलित केला जो आचारव्यवहारप्रायश्चित्तादि त्रिविध धर्म तो देशधर्म. कुळांत म्हणजे गोतांत ज्या कुळमान्य चालीरीती त्या कुळधर्म, वंशांत जे प्रचलित धर्म ते वंशधर्म. आणि देवसंबंधक जीं कर्तव्यें तीं देवधर्म. देशधर्म, कुळधर्म, वंशधर्म व देवधर्म ह्या चार धर्मांच्या अनुज्ञे प्रमाणें आपापल्या धर्मी सर्वांनीं वर्तावें. त्यांत महाराष्ट्रधर्माची पहिली खूण म्हणजे, सर्वांत ब्राह्मण श्रेष्ठ, हें मत मान्य असणें, तो सर्वांचा गुरु, देव गुरूरूपें सर्वांस रक्षिता, सुख देता, मुक्तिदेता. हा धर्म सर्व धर्माचा जीव,म्हणून केशवाचार्य सांगतो. ही महाराष्ट्रधर्माची दुसरी खूण. प्रत्यहीं स्नान करणें ही, केशवाचार्याच्या मतें, महाराष्ट्रधर्माची तिसरी खूण. मूळ महाराष्ट्रधर्म म्हणजे (१) स्नान, (२) गुरूपदेश, (३) मंत्रजप प्रत्यहीं करावा, असें केशवाचार्यांचें वाक्य आहे (पृष्ठ ६१, ओळ १/२). स्नान म्हणजे शुचिर्भूतपणा, गुरूपदेश म्हणजे सर्व जातींत श्रेष्ठ जो ब्राह्मण त्यानें उपदिष्ट जो आचारव्यवहारप्रायश्चितादि धर्मसमूह तो. आणि मंत्रजप म्हणजे गुरूपदेशानुरूप श्रद्धायुक्त आचरण. तीर्थगुरु तीर्थाचा, स्थळगुरु स्थळाचा, श्रीगुरु कुळाचा व जगद्गुरु जगताचा म्हणजे सर्व देशाचा. जगद्गुरु तो च शंकराचार्य. शंकराचार्यांनीं धर्मस्थापना केली. दक्षिणेस सेतुबंधरामेश्वर, उत्तरेस काशी, पश्चिमेस द्वारका व पूर्वेस तुळजापुर, यांच्या मधील जो पुण्यदेश तो महाराष्ट्रधर्माचें स्थान. जो जो म्हणून स्वतःस माराष्ट्र म्हणवितो त्यानें हा लक्षणत्रयांकित माराष्ट्रधर्म आचरिला पाहिजे. पैकीं मराठा क्षत्रिय जो आहे त्यानें कुक्कुटशब्दा पासोन उठावें, शौचस्नान संपादावें, देवपूजन नित्यकर्म आचार्ययुक्त करावें, शास्त्रवचनाधारें न्याय निवडावा, पुराणेतिहास प्रत्यहीं आयकावा, व शस्त्र कमरेस बांधून भोजन सारावें, कदापि गाफील न रहावें, असें शास्त्रोक्त धर्मचोदित आचरण जो करील तो क्षत्रिय गर्भादान, पुंसवन, चौल, व्रतबंध, विवाह, महोत्सव, विद्यारंभ, इत्यादि कर्मे वेदोक्त करण्यास सर्वथा योग्य होय. ह्या धर्मा पासून पतित असे बहुत राजे शंकराचार्ये शुद्ध केले (पृष्ट ५८, ओळ १३). कांहीं तसेच अशुद्ध राहिले त्यांस निराळी पद्धती नेमून दिली. विप्रांस वैदिक मंत्र, अशुद्ध क्षत्रियांस पौराणिक मंत्र व शूद्रांस तांत्रिक पद्धत शंकराचार्यांनीं घालून दिली. हें अश्या स्वरूपाचें केशवाचार्यानें महाराष्ट्रधर्माचें विवरण केलें आहे. विवरणा वरून स्पष्ट च होतें कीं महाराष्ट्रधर्म म्हणजे केवळ religion of महाराष्ट्र नव्हे. महाराष्ट्रधर्म म्हणजे देशधर्म + जाति धर्म + कुलधर्म + वंशधर्म + देवधर्म होय. महाराष्ट्रांतील देशधर्म म्हणजे याज्ञवक्ल्यस्मृती वर विज्ञानेश्वरानें केलेल्या टीकेंत सांगितलेले सर्व धर्म. जातिधर्म म्हणजे प्रत्येक जातीचे विशिष्ट धर्म. कुलधर्म म्हणजे प्रत्येक कुलाचे विशिष्ट धर्म, वंशधर्म म्हणजे उपकुलांचे ऊर्फ वंशांचें धर्म. व देवधर्म म्हणजे देशांत, जातींत, कुलांत, वंशांत मान्य असलेल्या देवा संबंधानें व स्वत: व्यक्तिमात्राला इष्ट असलेल्या देवते संबंधानें कर्तव्यें, हे सर्व धर्म मिळून महाराष्ट्रधर्म ऊर्फ माराष्ट्रधर्म होतो. महाराष्ट्रधर्माची मुख्य व एक च एक खूण म्हटली म्हणजे गुरुत्वाच्या नात्यानें सर्व धर्मसंबंधक कर्मांचें ब्राह्मणाच्या म्हणजे तीर्थगुरूच्या किंवा स्थलगुरूच्या किंवा कुलगुरूच्या किंवा जगद्गुरूच्या हस्तें संपादन. ब्राह्मणाच्या हस्तें जो कोणी कोणचें हि धर्मकर्म संपादूं इच्छीत नाहीं तो महाराष्ट्रधर्मी नव्हे. अश्या ब्राह्मणद्वेष्ट्याला त्या कालीं पाखंडी म्हणत व धर्मबाह्य म्हणजे कायद्याच्या व रूढीच्या बाहेरचा पतित समजत.