Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
४८. ह्याच्या उलट उपदेश भारतवर्षांतील व उत्तरकोंकणांतील तत्कालीन उपद्व्यापी व प्रवृत्त अश्या लघुतम लोकांचा इतिहास करतो. अल्पसंख्याक प्रवृत्तांचा इतिहास आपल्या मूठ भर अनुयायांच्या कानांत कंठरवानें ओरडतो कीं,एकसमाज करून व एकराष्ट्र बनवून स्वधर्म, स्वराज्य, स्वभाषा इत्यादींची स्थापना करा व यथेच्छ अन्नसंपत्ति मिळवा. प्रस्तुत बखरीचा एक कर्ता जो केशवाचार्य व त्याचा पुरस्कर्ता जो नायकोराव ते दोघे हि ह्या प्रवृत्तिधर्माचे प्रवर्तक होते. त्यांनीं ५२१ ब्राह्मण व ३६५६ सैनिक ऊर्फ क्षत्रिय उत्तरकोंकणांतून म्हाळसापुरीं जमविले म्हणजे एकंदर ४१७७ माणसें म्हणजे सुमार चार हजार माणसें प्रवृत्तिमार्गाचीं मिळविलीं. सा-या उत्तरकोंकणांत शक १३७०त ह्या हून कमीत कमी निदान दसपट तरी लोकसंख्या असावी. म्हणजे दहा माणसें निवृत्तिमार्गी धरिल्यास त्यांत एक माणूस प्रवृत्तिधर्माचें त्या कालीं आढळे असें झालें. ह्या अल्पसंख्याक लोकां पैकीं खरे जातिवंत राजचिकीर्षु फक्त दोन च माणसें होती, पहिला केशवाचार्य व दुसरा नायकोराव. बाकी सर्व सैनिक ऊर्फ क्षत्रिय व ब्राह्मण पोटा करितां यवनाचे सेवक झाले. केशवाचार्यं लिहितो, " खल्लक सैनिक ईनामक सर्व रईत अजम शेख अल्लावदिनाची जालिं." सर्व सैनिक, इनामदार व रयत यवनाच्या बाजूचे झाले. केशवाचार्य पुढे शोक करितो कीं, क्षत्रियांनीं राज्याभिमान सांडिला, शस्त्रें सोडिली, कृषि धरिली, सोमवंशियांनीं कारकोणी व गांवखोती पतकरिली,शिंदे वतनें संभाळून यवनाची सेवा करूं लागले,आचारहीन जाले, गोत्र प्रवर कुळस्वामीण कुळगुरू यास विसरले (पृष्ट ५३). सुग्रास अन्न सोडून राज्यें मिळविण्यांत व नवीन सरकारें स्थापिण्यांत होणारे हाल व उपासमार कोण सोसतो? केशवाचार्य व नायकोराव यांनीं बोलाविलेल्या सभेस भोजना वर यथेच्छ ताव मारण्यास व आचरिला जाण्यास कठीण अश्या महाराष्ट्रधर्माच्या शपथा घेण्यास सर्व भोजनभाऊ जमा झाले. ह्या अन्नलंपटांना केशवाचार्यानें प्रवृत्तिप्रधान महाराष्ट्रधर्म सांगितला. ह्या च महाराष्ट्रधर्माचा पुनरुच्चार दोन शें वर्षांनी पुढें म्हणजे झक १५७० च्या सुमारास श्रीमत्समर्थ रामदासस्वामी यानीं शिवप्रभृति मराठ्यांच्या हितार्थ सह्याद्रिकुहरांत केला. तदनंतर दोन शें वर्षांनीं महादेव गोविंद रानडे व राजारामशास्त्री भागवत ह्यांनीं पंचवीस वर्षां मागें महाराष्ट्रधर्म म्हणजे काय ह्या बाबी संबंधानें लेखांतून व भाषणांतून खल मांडिला. महाराष्ट्रधर्म या शब्दाचा अर्थ महाराष्ट्रांतील देवधर्म म्हणजे religion of महाराष्ट्र असा रानडे व भागवत यांनीं केला. महाराष्ट्रधर्म हा देवधर्मवाचक शब्द नसून कर्तव्यवाचक शब्द आहे, असें प्रत्युत्तर त्या वेळीं प्रस्तुत लेखकानें दिलें. त्या प्रत्युत्तराला पोषक असा पुरावा केशवाचार्याच्या लेखांत सांपडतो. केशवाचार्यानें महाराष्ट्रधर्माचें निरूपण बखरीच्या ५३ पासून ६१ पृष्टा पर्यंतच्या आठ पृष्टांत केलें आहे. महाराष्ट्रधर्मा वर एवढें विस्तृत लिखाण आजपर्यंच्या कोणत्या हि जुन्या ग्रंथांत आलेलें नाहीं. आज पर्यंत समर्थांच्या त्रोटक उल्लेखां वरून महाराष्ट्रधर्माची अल्पस्वल्प कल्पना करतां येत असे. ती अडचण आतां राहिली नाहीं. महाराष्ट्रधर्म या सामासिकशब्दाचा अर्थ केशवाचार्य महाराष्ट्रदेशाचा धर्म असा करीत नाहीं, तर महाराष्ट्रिक लोकांचा ऊर्फ मराठा लोकांचा धर्म असा करतो. नंतर, महाराष्ट्रधर्माचें वर्णन करण्या पूर्वी मराठा कोणाला म्हणावें तें सांगतो. उत्तरकोंकणांत केळव्या पासून साष्टी पर्यंत तुव्हेरी, भोसले, चव्हाण, जाधव, घोरपडे, दाहाबाडे, कावरे, बुधले, कबाड, इत्यादिक शहाण्णव कुळींचे पाटील, देशमुख, वतनदार, ठिकाणदार होते ते सर्व केशवाचार्य महाराष्ट्रांत गणतो. देसाय, पाटेल, चौधरी, वतनदार, इजारदार, महालदार, कुळावी, कुळुंबी, म्हातरे, चवघले, साहाणे, इत्यादींनीं यद्यपि कृषिकर्म पतकरिलें तत्रापि हे हि सर्व माहराष्ट्र. राऊत, शिंदे, कडू, चोरघे, म्हातरे, पाटेल, चौधरी, ठाकूर, परभू ह्या नऊ कुळ्यांनीं जरा उदीम धरिला तरी हे सर्व माहाराष्ट्रांत मोडतात. कौळी, सवे, सावे, चुरी, चौधरी, राऊत, वर्तक, म्हातरे, देशमुख, नायक, भोईर, माळी या कृषिकर्म करणा-या बारा कुळ्या माहाराष्ट्रांत पडतात. कोळाय, शिळाय कुळींचे लोक महाराष्ट्र. पुरो,राणे, दरणे, प्रभू यांनीं कारकूनवृत्ति धरिली ते हि माहाराष्ट्र . देशले, म्हातरे, नायक, रुत, राऊत, चौधरी, पाटेल, वर्तक, पुरो, ठाकूर, साण्हे, कौळी, माळी, सुतार, दरणे, ह्या सर्व कुळ्या माहाराष्ट्रांच्या. शेतकरी, कांसार, तांबट, पोगार, लोहार, गाडबडे, बाहारे, मासी, वैती, कोळी, सोनकोळी, ढोरकोळी, आगरी, खारू, डोखळे आणि नट, भाट, बुरूड, चर्मक इत्यादि वर्णावर्ण अत्यंज, हे सर्व माहाराष्ट्र.