Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
पळशे ब्राह्मण म्हणजे पलाशी ब्राह्मण. पलाश म्हणजे मगध देश. तो मूळचा देश ज्यांचा ते पलाशी ब्राह्मण म्हणून महाराष्ट्रांत प्रख्या पावले. यद्यपि हे शुक्लयजुर्वेदी होते तत्रापि महाराष्ट्रांतील पुरातन शुक्लयजुर्वेद्यांच्या हून ह्यांचा आचार व चालीरूढी देशभिन्नत्वा मुळें भिन्न होत्या. असे हे पातेणे प्रभू व पळशे ब्राह्मण रामदेवरावाच्या विश्वासाचे एक च एक पात्र झाले. तो तो धंदा करण्यास अपात्र अशा लोकांचा संग्रह करणा-या इतर प्राचीन व अर्वाचीन संभाजी, बाजीराव, वगैरे राजपुरुषांची जी दैन्यावस्था झाली ती च रामदेवरावाची झाली. हें व्यंग ओळखून अल्लाउद्दीनानें रामदेवरावा वर स्वारी केली व दातीं तृण धरून शरण यावें अशा अर्थाचीं पत्रें लिहिलीं. त्यांचा स्वीकार रामदेवरावानें व त्याच्या पातेण्या सरदारांनीं केला नाहीं हें सांगावयाला नको च. अल्लाउद्दीन एकाएकीं अवचित् देवगिरी वर येऊन उभा राहिला. व त्याच्या आगमनाची वार्ता हि रामदेवरावाला नव्हती, वगैरे मुसलमानी तवारिखकारांचे उद्गार बखरींतील माहितीशीं जुळत नाहींत. अल्लाउद्दीन येत आहे, ही खबर रामदेवाला होती. आपल्या प्रभू सरदारां सह शत्रूला तोंड देण्याची रामदेवरावानें तयारी केली. वृद्धविष्णुगोत्री भुरदासप्रभु वानठेकर याला रणवट बांधिला म्हणजे मुख्य सेनाधिकार दिला. भुरदासप्रभूचा पुत्र चित्रप्रभु ह्याज कडे दुय्यम सैन्याधिकार होता. अल्लाउद्दीनानें आपल्या हसन व हुसेन या दोन मुलां सह देवगिरिदगडातळवटीं येऊन, जवळच्या शाखानगरांत तळ दिला व खुद्द शहरास वेढा घालण्याच्या तो तयारीस लागला. दोन्हीं सैन्यांची लढाई जुंपली. सुमध नांवाचा रामदेवरावाचा एक प्रधान होता त्यानें अल्लाच्या हसननामक पुत्रास ठार केलें. हुसेन भावाच्या मदतीस आला त्याचा वध भुरदासपुत्र जो चित्रप्रभु त्यानें केला. तुर्कसैन्यांत एक च बोंब झाली. अल्लाउद्दीन- ज्याला बखरकार महमद म्हणतो, कदाचित् अल्लाचें महमद नांव असावें -त्वेषानें चालून आला. त्याची व भुरदासप्रभूची खणाखणी होऊन भुरदासप्रभू धारातीर्थी पावन झाले. तेव्हां चित्रप्रभू अल्ला वर भयंकर मेघा प्रमाणें लोटला व त्याचें सैन्य त्यानें उधळवून माघारें परतविलें. ह्या हल्ल्या सरशीं अल्लाउद्दीनाला आपल्या गोटाचा आश्रय करावा लागला. म्लेच्छांचा पराभव झाला. परंतु, तेवढ्यानें अल्लानें धीर सोडिला नाहीं. परत फिरलेले लोक पुनः जमा करून व शिलकेंतील लोक बरोबर घेऊन, मारीन किंवा मरेन अश्या निश्चयानें तो युद्धास पुन: सज्ज झाला. ह्या दुस-या लढाईंत रामदेवराव व त्याचे पातेणे सरदार यांचा पराभव झाला. पळापळ सुरू होऊन, रामदेवरावाचा अल्लाउद्दीनानें वध केला. देवगिरीच्या युद्धाचा असा हा वृत्तान्त बखरींत दिला आहे. पैकीं रामदेवरावाच्या वधाचा वृत्तान्त खरा नाहीं. बाकीची हकीकत मुसलमानी हकीकतीशीं बरीच जुळते. पहिल्या चकमकींत हिंदूंस जय आला व दुस-या चकमकींत मुसुलमानांस जय आला, ही बखरींतील हकीकत तवारिखांतील हकीकतीशीं सुसंगत आहे. तीन शें वर्षां नंतर, केवळ ऐकींव माहिती वरून या हून जास्त तपशील भगवान् दत्ताला देतां येणें शक्य नव्हतें. घटका चहूं मध्यें रामदेवाचें राज्य सुलतान अल्लाउद्दीनानें घेतलें म्हणून पांचव्या प्रकरणाचा कर्ता म्हणतो. चार घटकांत राज्य घेतल्याचा हा उल्लेख इतर हि कांहीं मराठी टिपणांतून सांपडतो. त्या वरून दिसतें कीं ही पुढें एक म्हण च पडून गेल्या सारखी झाली. एका लढाईंत आणि चार घटकांत ज्याचें राज्य शत्रूला घेतां आलें त्याच्या बाजूला देशांतील पिढीजात संस्थानिक, सरदार, मुत्सद्दी, वजनदार पुरुष व सामान्य जन ह्यां पैकीं, फारसें कोणी नव्हतें, हें स्पष्ट च झालें. एका खडकीच्या लढाईंत चार च घटकांत बाजीरावाचें राज्य इंग्रजानें जसें घेतलें व बाजीरावाच्या बाजूला संस्थानिक व सरदार वगैरे कोणी हि जसें नव्हतें, तो च प्रकार शक १२१६ त सहा शें वर्षों पूर्वी महाराष्ट्रांत घडून आला.