Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

३०. ताम्रपट व शिलालेख यांतील वंशावळीशीं दत्ताची वंशावळ पडताळून पहातां, ती भाकड ठरते. मुसुलमान तवारिखकारांनीं वर्णिलेल्या देवगिरीच्या लढाईच्या वृत्तान्ताशीं भगवान् दत्तानें दिलेला वृत्तान्त पडताळून पहातां, तो बराच विश्वसनीय मानतां येतो. म्हणजे पडताळ्या खेरीज दत्ताच्या शब्दा वर बिनधास्त विश्वसितां येत नाहीं. बखरींच्या प्रामाण्या संबंधानें भगवान् दत्त हा एक साक्षीदार आहे. त्याचें प्रामाण्य ढासळल्या वर, अशी शंका येत्ये कीं केशवाचार्यादि बाकीचे साक्षीदार तरी कितपत विश्वसनीय आहेत ? पडताळ्या खेरीज त्यांच्या साक्षी वर कितपत विश्वास ठेवावयाचा ? साक्षीदार प्रमाणबद्ध व सुसंगत बोलत असला व इतर बाह्य साक्षीदारांच्या जबानीशीं त्याची जबानी जुळत असून ती मानवी शक्यतेच्या टापूंतील असली, म्हणजे साक्षीदार विश्वसनीय व वस्तुकथक समजण्यास फारशी हरकत नसते. पडताळा पहाण्यास इतर साक्षीदार नसले, तर साक्षीदार प्रमाणबद्ध, सुसंगत व कालशक्य बोलत असला म्हणजे त्याला इतिहासकक्षेंत प्रवेश्य समजतात. बखरींत एकंदर सहा प्रकरणें आहेत. पैकीं पहिल्या व चवथ्या पद्य प्रकरणांचा कर्ता जो भगवान् दत्त त्याला बिनचूक विश्वसनीय साक्षीदारांच्या सदरांतून आपण काढून टाकला. बाकी राहिले दुस-या, तिस-या, पांचव्या व साहाव्या प्रकरणांचे कर्ते. त्यांतून तिसरें प्रकरण यद्यपि केशवाचार्यानें अंशतः लिहिलें आहे,तत्रापि त्यांत केशवाचार्या नंतरच्या संस्कारकानें बराच ज्यादा मजकूर जोडला आहे. दुसरें प्रकरण सबंद केशवाचार्याचें आहे आणि तें येथून तेथून सर्व प्रमाणबद्ध व सुसंगत आहे. तिसरें प्रकरण हि असेंच प्रमाणबद्ध व सुसंगत समजण्यास हरकत नाहीं. पांचवें व सहावें हीं दोन्हीं प्रकरणें प्रमाणबद्धता व सुसंगतता ह्या दोन्ही बाबतींत पाप करीत नाहींत. तस्मात् प्रमाणबद्धता, सुसंगतता व मानवी शक्यता ह्या तीन बाबीं संबंधानें हीं चारी प्रकरणें इतिहासकक्षेंत प्रवेश्य समजावीं लागतात. मुसुलमान, पोर्तुगीज, रामनगरकर व पट्टेकर यांच्या संबंधानें जो मजकूर बखरींत आला आहे त्याला मुसुलमान व पोर्तुगीज तवारिखकारांच्या लिहिण्याचा पडताळा हि आहे. करतां बखरींतील मुसुलमानादिकां संबंधीची हकीकत स्थूलमानानें वास्तविक घडलेली धरून चालण्यास हरकत नाहीं. मुसुलमान, पोर्तुगीज, रामनगरकर व पट्टेकर कोंकणांत वावरून गेले, ही बाब तरी विश्वसनीय व इतिहासकक्षेंतील आहे, हें पडताळ्यानें सिद्ध आहे. प्रमाणबद्धता, सुसंगतता व मानवी शक्यता ह्या तीन अंतर्गत पुराव्यांनीं मुसुलमानादिकांचें कोंकणांतील अस्तित्व विश्वसनीयतेच्या टापूंत येतें आणि मुसुलमान व पोर्तुगीज लेखकांच्या बहि:पुराव्यानें तें अस्तित्व वास्तविकत्वा प्रत पोहोचतें. अंतर्गत पुराव्यानें हकीकतीचा इतिहासकक्षेंत फक्त प्रवेश होता व बहि:पुराव्यानें हकीकतींत वर्णिलेल्या व्यक्ति व त्यांचीं कार्ये वास्तविकतेच्या साक्षात् रूपास पोहोचतात. केशवाचार्यादि साक्षीदार अंतर्गत पुरावा प्रमाणबद्ध, सुसंगत व मानवी शक्यतेंतील देतात. तेव्हां त्यांचें लिहिणें म्हणजे लिहिण्यांतील व्यक्ति व त्यांचीं कृत्यें इतिहासकक्षेंत प्रवेश करण्यास पात्र आहेत, हें स्वच्छ ठरतें. ह्या दृष्टीनें बिंबवंशीय राजे, नागरशादि राजे, भोंगळे, नायते राजे, बिंबदेव जाधव, इत्यादि व्यक्ति व त्यांचीं कार्ये इतिहासशक्य आहेत, एवढे कबूल केल्या शिवाय सुटका नाहीं. परंतु ह्या व्यक्ति व त्यांचीं कार्ये वास्तविक घडलीं अश्या सिद्धीच्या कोटीस चढण्यास केवळ अंतर्गत पुरावा पुरा पडत नाहीं, त्याला बहिःपुराव्याची अपेक्षा रहात्ये. ताम्रपट, शिलालेख, मुसुलमानी तवारिखा, प्रवासवृत्तें, काव्यें किंवा अन्य सजातीयविजातीय संस्कृतप्राकृत लेख ह्यां पैकीं कशाचा च पडताळा बिंबवंशीय राजांच्या किंवा नागरशादि राजांच्या बखरींत दिलेल्या कथां संबंधानें किंवा हकीकती संबंधानें उपलब्ध नाहीं. बिंबवंशीयादि राजे उत्तर कोंकणांत होऊन जाणें शक्य आहे. परंतु ते साक्षात् झाले व वावरून गेले, असें ठाम म्हणण्यास बहि:पुराव्याच्या अभावीं सकृद्दर्शनीं मोठी अडचण पडत्ये. काल, स्थल, व्यक्ति व तपशील ह्यांनीं बिनचूक सजवून गेल्या महिन्यांत पुणे शहरांत अमक्याचें राज्य झालें, अशी साक्षात् घडलेल्या इतिहासा सारखी एखादी कादंबरी एखादा कादंबरीकार निर्माण करूं शकेल. कालस्थलादींचा चोख निर्देश करणारे असले कादंबरीकार यूरोपांत सध्यां विद्यमान आहेत. अशी एकादी इतिहाससम कादंबरी कोण लीलेनें पांच शें वर्षां पूर्वीं लिहून ठेविली आणि सर्व धाग्यादो-यांचा नापत्ता होऊन पांच शें वर्षां नंतर ती लेखी कादंबरी कोण्या संशोधकाच्या हातीं पडली, तर ती इतिहाससम कल्पित कादंबरी, केवळ अंतर्गत पुरावा वस्तुप्रामाण्याला पुरा आहे असें समजल्यास, वास्तविक इतिहास म्हणजे साक्षात् घडलेला इतिहास म्हणून मान्यता पावण्याचा संभव च नव्हे तर निश्चय आहे. उलट पक्षीं बहि:पुराव्या खेरीज कोणती च हकीकत खरी मानावयाची नाहीं असा हट्ट धरल्यास, बहि:पुरावा ज्या संबंधानें उपलभ्य व उपलब्ध नाहीं त्या सर्व वास्तविक बाबी कल्पित कादंब-यांच्या सदरांत ढकलल्या जाण्याची निश्चितता आहे. उदाहरणार्थ, अलेक्झांडरची सिंधुनदा वरील स्वारी घ्या. हिचें वर्णन ग्रीक ग्रंथकारांनीं लिहून ठेविलें आहे. हा अंतर्गत पुरावा झाला. परंतु हिंदू ग्रंथकारांनीं हिचा व हिचा कर्ता, जो अलेक्झांडर त्याचा नाममात्रें करून हि उल्लेख सुद्धां केला नाहीं. म्हणजे ह्या स्वारीला बहिःपुरावा नाहीं.