Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

२८. बखरीच्या दिव्यानें किंचित् उजेड ज्या आणीक एका बाबी वर पडलासा वाटतो तिज कडे आतां वळूं. अल्लाउद्दीन व रामदेवराव यादव यांच्या मध्यें जें देवगिरीस युद्ध झालें त्याचें वर्णन भगवान् दत्तानें केलें आहे (पृष्टें ८३-८८). भगवान् दत्तानें ही ओवीबद्ध हकीकत सुमारें शक १५०० नंतर लिहिली. म्हणजे देवगिरीच्या लढाईची ही हकीकत लिहून आज शक १८४६ त सुमारें साडेतीन शें वर्षे झालीं. कोणत्या हि मराठी बखरींत देवगिरीच्या ह्या लढाईचा वृत्तान्त दिलेला नाहीं, तो प्रस्तुत बखरींत दिला आहे, हा ह्या बखरीचा विशेष आहे. देवगिरीची लढाई शक १२१० त झाली म्हणून बखरींतील पांचव्या प्रकरणाचा कर्ता लिहितो. भगवान् दत्त चौथ्या प्रकरणांत युद्ध केव्हां झाले तें सांगत नाहीं. तेव्हां शक १२१० हें वर्ष त्याला मान्य होतें किंवा नव्हतें तें स्पष्ट होत नाहीं. शक मान्य असो किंवा नसो, लढाईचा वृत्तान्त साडेतीन शें वर्षा पूर्वी भगवान् दत्तानें लिहिला, म्हणजे युद्धोत्तर सुमारें तीन शें वर्षांनी लिहिला, एवढें खरें आहे. शक १२१६ त राया बिंबानें सालरेमोलेर, नंदनबारें, ह्या मार्गानें गुजराथे वर स्वारी केली असें पांचव्या प्रकरणाचा कर्ता लिहितो. त्या अर्थी देवगिरीची लढाई शक १२१६ त झाली असली पाहिजे, हें उघड आहे. कारण, अल्लाउद्दीनाला माळव्याच्या बाजूनें पायबंद देण्या करितां बिंबदेव गुजराथेंत उतरला होता. शक १२१० त देवगिरीची लढाई होऊन सहा वर्षांनीं म्हणजे शक १२१६त पायबंद देण्याचा प्रकार घडण्यांत कोणती च सयुक्तता दिसत नाहीं. सबब, देवगिरीच्या युद्धाचा शक मूळांत म्हणजे पांचव्या प्रकरणाच्या मूळ प्रतींत शक १२१६ असला पाहिजे. सहाच्या आंकड्या बद्दल चुकीनें नक्कलकारानें पूज्याचें चिन्ह लिहिलें व शक १२१६ बद्दल शक १२१० हा आंकडा नकलेंत नमूद करून ठेविला, असें म्हटल्या शिवाय गत्यंतर नाहीं. आंकड्यांच्या चुक्या नक्कलकारानें ह्या बखरींत अनेक केल्या आहेत, हें प्रस्तुत प्रस्तावनेच्या तिस-या रकान्यांत दाखवून दिलें च आहे. मूळ जुनाट प्रत फार पुसट झाल्या मुळें, नकलकाराच्या हातून आंकड्यांच्या चुक्या होणें अत्यन्त सुलभ झालें होतें. सहाच्या आंकड्याचे दोन्ही बाजूचे फरफाटे पुसून व घासून जाऊन, मधलें गोंडगोळें नकलकाराला शून्या सारखें दिसलें व शून्य म्हणून तें तसें त्यानें लिहून ठेविलें. तात्पर्य, देवगिरीच्या लढाईचा शक १२१६ मूळ प्रतींत होता व तो मुसलमान तवारीखकारांनीं दिलेल्या कालाशीं जुळतो. भगवान् दत्तानें लढाईचा शक यद्यपि दिला नाहीं, तत्रापि तपशिल दिला आहे. रामदेवराव जाधव याचें व ब्राह्मणांचें कांहीं निर्दिष्ट कारणां वरून वितुष्ट वाढलें. महादेव जाधवाच्या कारकीर्दीत हेमाद्रि पंडितानें आपला चतुर्वर्गचिंतामणि नामक धर्मग्रंथ रचिला. त्यावरून दिसतें कीं देशांत व्रतें व उद्यापनें यांचें राज्य ऐन भरभराटींत आलें. भरभराट सहन न होऊन देशांत ब्राह्मणेतरांचीं पाखंडें माजलीं. तीं धुमसत धुमसत रामचंद्रदेवाच्या कारकीर्दीत प्रचंड पेटलीं, मानभावादि जातिसंस्थाद्वेष्टीं पाखंडें रामदेवराव जाधवाच्या अमदानींत विशेष प्रख्यातीस आलीं हें सुप्रसिद्ध आहे. पाखंडांच्या शिकविणीनें कित्येक अत्याचारी लोकांनीं देवालयांतून रुद्रलिंगें उपटून टाकलीं. ह्या अधर्म्य कृत्यांचें खापर ब्राह्मणांनीं राजाच्या माथीं मारिलें. त्याचा राग येऊन रामदेवरावाच्या हातून ब्रह्महत्येचें पातक घडलें. ब्रह्महत्येचा परिणाम काय झाला असेल त्याचा अंदाज होण्या सारखा आहे. बरेच सनातनधर्माभिमानी मराठा क्षत्रिय संस्थानिक व सरदार ब्राह्मणांचा कैवार घेणारे होते. ते रामदेवरावा पासून फुटून निघाले. ब्राह्मण तर राजाच्या विरुद्ध होते च. हरिहरादि देव रामदेवरावा वर कोंपले व वसिष्ठादि गुरूंनीं त्याच्या दरबाराचा त्याग केला. राजा असा अधर्मी व अनाचारी बनल्या मुळें, ज्यांच्या आधारा वर राज्याची इमारत मुख्यत्वें करून उभारलेली होती, ते आधार रामदेवरावाच्या राज्याचे नाहींसे होऊन, शत्रूंच्या भक्ष्यस्थानीं पडण्यास योग्य अशी अवस्था रामदेवास प्राप्त झाली. सामान्य शूद्र, उन्मत्त क्षत्रिय किंवा आचारहीन ब्राह्मण यद्यपि पाखंडपोषक विशेष प्रयास न पडतां बनूं शकले, तत्रापि कुशाग्र बुद्धि व अप्रतिहत शौर्य ह्यांच्या आधारा वर स्थिरावणा-या राज्यसंस्थेचे पोषक ते बनूं शकले नाहींत. महाराष्ट्रांतील पिढीजात क्षत्रियांनीं व ब्राह्मणांनीं सोडून दिलेल्या रामदेवरावानें अशा विपन्न स्थितींत पातेणे प्रभू व पळशे ब्राह्मण यांच्या साहाय्यानें राज्य चालविण्याचा व संरक्षिण्याचा संकल्प केला. पातेणे प्रभू यद्यपि जातीनें क्षत्रिय होते, तत्रापि धंद्यानें प्रत्येनस् व प्रतीहारी म्हणजे पोलीस व रखवालदार होते. उच्च सेनापतित्व करण्याचें कसब त्यांना नवीन होतें.