Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

३१. बखरींतील मजकुराच्या वस्तुप्रामाण्याची विचिकत्सा झाल्या वर, अवांतर गौण आक्षेपांचा परामर्श घेण्यास अवसर सांपडतो. (१) केशवाचार्य ज्या बिंबवंशीय राजांची नामावळी देतो ते बिंबवंशीय राजे वस्तुसृष्टींतील आहेत हें मान्य करून, आक्षेपक असा मारक प्रश्न करतो कीं बिंब हें उपनाम भारतवर्षांतील लोकांत केव्हां तरी प्रचारांत होतें या विधानाला प्रमाण काय? बिंब हें उपनांव जर भारतवर्षांत केव्हां हि प्रचारांत नसेल, तर शक १०६० त तें एका राजवंशाचें वाचक होतें हें म्हणणे लंगडें पडतें आणि त्या राजवंशाचें अस्तित्व हि संशयित होतें. शंकेला उत्तर आहे. बिंब या शब्दाचा उल्लेख कात्यायन आपल्या वार्त्तिकांत करतो व गोत्रप्रत्यय त्या शब्दाला कसे लागतात तें सांगतो. " सुधातुरकङ् च " ह्या पाणिनीय सूत्राला “व्यास-वरुड-निषाद-चांडाल-बिंबानां चेति वक्तव्यम्" अशी पुस्ती कात्यायन देतो. बिंब शब्दाला अक् व इ प्रत्यय लागून बैंबकि असा अपत्यवाचक शब्द निर्माण होतो. बिंब हें गोत्रनाम ऊर्फ आडनांव पाणिनीला माहीत नाहीं, परंतु कात्यायनाच्या वेळे पासून भारतवर्षांत प्रसिद्ध आहे. (२) बिंब ह्या आडनांवा प्रमाणें भौम हें आडनांव हि असें च प्राचीन आहे. पाणिनीय गणपाठांतील शिवादि गणांत जो भूमि शब्द येतो त्या पासून भौम हा अपत्यवाचक शब्द होतो. भौम चा अपभ्रंश मराठी भौम, भौम शब्दाचा आणीक एक मराठी अपभ्रंश बोंब. बोंब शब्दाला स्वार्थक ल प्रत्यय लागून बोंबल (ला-ली-लें) व बोंबल्या हे मराठी शब्द निर्माण होतात. पेण- खोपवली रस्त्या वर जो बोंबल्या विठोबा आहे त्याच्या नांवांत हा बोंबल्या शब्द येतो. बोंबल्या. विठोबा म्हणजे भौम आडनांवाच्या मराठ्यांनीं स्थापिलेला विठोबा. बोंब म्हणजे शंखध्वनि ह्या शब्दाशीं बोंबल्या विठोबा या शब्दांतील बोंबल्या ह्या शब्दाचा कांहीएक संबंध नाहीं. तसाच बोंबील माझ्याशी हि बोंबल्या ह्या शब्दाचा संबंध नाहीं. (३) बिंब व भोम ह्या दोन शब्दां प्रमाणें च बखरींत नागरशा हा जुनाट शब्द येतो. शा हा प्रत्यय शहा या फारशी शब्दाचा अपभ्रंश समजण्या कडे मन:प्रवृत्ति होण्याचा संभव आहे. परंतु नागरशा ह्या विशेषनामांतील शा सब्द फारशी शाहू शब्दा पासून निर्वचिण्यांत स्वारस्य नाहीं. नागरशा ह्या शब्दांतील शा शब्द साह्-षाह् या वैदिक शब्दाचा अपभ्रंश आहे. तुराषाह् ह्या वैदिक सामासिक शब्दांत जो साह हा पोटशब्द येतो त्याचा अपभ्रंश गुजराथींत शा-सा असा होतो. सह बलवान् असणें ह्या धातू पासून साह् हा शब्द साधलेला आहे. साह् चा अपभ्रंश सा-शा. फारसी शाह् शब्द संस्कृत सह धातू पासून निघालेला आहे यांत संशय नाहीं. त्या फारसी शाह् शब्दा पासून नागरशा, मोतीसा, बुलासा, इत्यादि संयुक्त विशेषनामांतील शा-सा शब्द निर्वचिण्यांत स्वारस्य व सुसंगतता नाही. कारण, शक ११६३ त गुजराथेंत तींतील विशेषनामें ठेवण्या इतका फारशी भाषेचा प्रवेश राजे लोकांत झाला नव्हता. नागरशा, प्रतापशा, इत्यादि शब्द जेव्हां क्षत्रियवाचक असतात तेव्हां शा-सा हा शब्द साह् षाह् ह्या वैदिक शब्दाचा अपभ्रंश असतो. परंतु, मोतीसा, बुलासा इत्यादि शब्द जेव्हां क्षत्रियेतरवाचक असतात तेव्हां शा-सा हा शब्द साधु-साहु ह्या शब्दाचा अपभ्रंश समजणें युक्त होतें. जव्हारच्या राजांच्या नांवा पुढें शा, शहा, शाहा, हीं उपपदें येतात. तीं वैदिक साह्-षाह् शब्दा पासून अपभ्रंशिलेलीं जशीं स्पष्ट दिसतात, तसा च फारशी शाह् हा शब्द हि वैदिक साह्-षाह् ह्या शब्दाचा सगोत्र अपभ्रंश आहे. (४) चेऊलचंपावतीस त्या कालीं भोज ह्या आडनांवाचे घराणें राज्य करीत असे. भोज हे यादववंशी क्षत्रिय पाणिनिकाला पासून व तत्पूर्वी पासून प्रसिद्ध आहेत. " भोज क्षत्रिये " असा क्षत्रियवाचक भोज शब्दाचा उल्लेख पाणिनि गणपाठांत करतो. भोज शब्दाला स्वार्थक ल प्रत्यय लागून भोजल शब्द निर्माण होतो व त्याचा अपभ्रंश भोसल (ला-ली-लें) होतो. हा भोसल अपभ्रंश बखरकार देत नाहीं, मूळ भोज हा च शब्द देतो. त्या वरून अनुमानतां येतें कीं शक १०६० पासून शक १३७० पर्यंतच्या अवधींत मूळ भोज हा च शब्द आडनांव म्हणून प्रचलित होता, भोसला हा आडनांव शब्द म्हणावा तितका प्रचारांत आला नव्हता. म्हणजे भोसला हें आडनांव महाराष्ट्रांत व कोंकणांत शक १३७० पर्यंत फारसें प्रचारांत नसावें असा ह्या विधानाचा अर्थ होतो. परंतु, भोसला ह्या शब्दाची दुसरी एक व्युत्पत्ति स्वीकारिली तर भोसला हा शब्द शक १३७० हून बराच जुना ठरवितां येतो. म्हैसूर प्रांतांत दोरसमुद्र येथें शक ९२९ पासून शक १२३२ पर्यंत होय्सळ किंवा पोय्सळ ह्या आडनांवाचे यदुवंशीय क्षत्रिय कुल नांदून गेलें.