Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

 २६. अश्या प्रकारें अमदाबादच्या सुलतानांचें बस्तान ठाणेंकोंककणांत बसत चाललें असतां, महमूदशहा बेगडा याच्या कारकीर्दीत शक १४२२ त पोर्तुगालाहून फिरंगी दोन तारवें घेऊन या प्रांतीं आले. एका तारवाचें नांव सिनोर देस्कोर व दुस-याचें बोजिजुझ. कप्तानाचें नांव लोरेस लुइस देताव्र, येतां च कोची बंदर कबज केलें. तेथोन गोवें घेतलें. नंतर शक १४३४ त फिरंगी दवण प्रांतास आले. आमदरफ्ती करूं लागले. नफ्याचें आमिष दाखवून वसईस फेतोरी म्हणजे फ्याक्टरी ऊर्फ आडतबाजार घातला. उदीमा मुळें बहुत हासल होईल या मतलबानें फिरंग्यास वसईस दांडाळ्या तळ्या जवळ जागा मांडवी उभारण्या करितां दिली. तळ्या वर नागेशतीर्थाचीं आयतीं भिंताडें होतीं त्यांची मजबुती करून फिरंग्यांनीं वसती केली. आमदानी करीत चालले. प्रीतीचीं लक्षणें बहुत दाखविलीं. वर्षे तीन पावें तों विश्वास उत्पन्न करून फेतोरीची अधिकोत्तर मजबुती करीत चालले. भांडीं म्हणजे जंगी तोफा सोळा फेतोरी वर आणून ठेविलीं. नंतर गोमताचळाहून म्हणजे गोंव्याहून हळूच आरमार आणिलें. प्रांताच्या मुसलमान सुभेदारास गोड भुलथापा देऊन जहाजावर बसवून मार्गी दगा दिला. तसे च दवणेस उतरले. मारामारी करोन दवण घेतली. नंतर यावत् माहीम बिंबस्थान पावें तों सर्व कोंकणकिनारा काबीज केला. वसईस फेतोरी वर आलमेद कप्तान होता त्यानें हा सर्व डाव रचिला. त्या दिवसा पासोन फिरंग्यांची काबजात झाली. सुलतानाचें व मुसलमानांचें फिरंग्यां पुढें काहीएक चाले ना. पातशहा पराभव पावला. रयत लोकां पैकीं व वाणी उदम्यां पैकीं ज्यास जें पाहिजे तें देवून सर्वत्र आबादीआबाद केलें. धर्म ज्याचा त्यास चालता केला. अशीं २५ वर्षे गेलीं. नंतर खरें स्वरूप दाखविण्यास प्रारंभ केला. दहशत घातली कीं हिंदू किंवा मुसुलमानी धर्मानें जो चालेल त्याला गिरफ्तार करून गोव्यास पाठऊं. त्या भयानें कित्येक परागंदा झाले. कित्येक गोमांतकास धरून नेले. तेव्हां सगळ्यांस फिरंगी ह्या शब्दाचा वाच्यार्थ कळला. प्रांतांत अशी दहशत बसविल्या वर व स्थिरस्थावर केल्या वर फिरंग्यांनीं शेजारच्या रामनगरच्या संस्थानिका कडे दृष्टि फेकिली. प्रतापशा जाधवाची एक राख होती. तिचा पुत्र देवशा. त्याचा पुत्र रामशा. त्या रामशानें पुंडाई करून, सह्याद्रिकिना-याचे १५७ गांव कबजांत घेतले व त्या प्रांताचें नांव राम नगर ठेविलें (शक १२९४ सुमार). त्याचे वंशज रामनगरास राज्य करीत असतां, त्यांच्याशीं फिरंग्यांची घसघस सुरू झाली. फिरंग्यांशीं भांडतां पुरवत नाहीं असा अनुभव येऊन, रामनग-या तहास आला. फिरंग्यांनीं जे गांव घेतले त्यांची चौथाई रामनग-यास मिळावी, असा तह झाला. रामनग-याचा जव्हारचा कोळी उमराव होता. त्यानें ह्या संधीचा फायदा घेऊन फितवा केला व कित्येक गांव मारून काढिले. कोळ्याचें बळ अधिकोत्तर जाणोन, रामनग-या गप्प बसला. तेव्हां पासून कोळी जव्हारीस स्वतंत्र राज्य करूं लागला. रामनगर व जव्हार येथील संस्थानिकां प्रमाणें फिरंग्यांच्या शेजारास पट्टेकर राजा होता. त्याज कडे १६० गांव होते. त्यांपैकीं फिरंग्यांनीं दांडगाईनें व जोरावरीनें प्रथम ७६ गांव होता खालीं घातले. तेव्हां पट्टेकर सल्ल्यास आला. तहानें आणीक ६२ गांव फिरंग्यांस मिळाले आणि फक्त २२ गांव पट्टेकरा कडे राहिले. ते हि बावीस गांव छिनावून घेऊन व सर्व तह धाब्या वर बसवून, फिरंग्यांनीं शेवटीं पट्टेकरास संस्थानभ्रष्ट केलें. शक १४२२ व शक १४३४ हे ह्या बखरींतील काळ पोर्तुगीज बखरकारांनीं व टिपणकारांनीं दिलेल्या काळाशीं ताडून फरक दिसतो. ह्या फरकाचीं कारणें काय असतील तीं खुलासेवार शोधून काढण्यास ज्यास्त तपशीलवार टिपणें मिळण्याची जरूर आहे.