Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
ज्यांच्या वर स्वारी केली त्यांच्या ग्रंथांत स्वारी करणा-याचें नांव देखील नसावें, हें खरोखरच आश्चर्य होय. ही स्वारी मुदलांत च झाली तरी नसावी किंवा ती इतकी क्षुल्लक असावी कीं तिचा स्पर्श हि हिंदुस्थानाला झाला नसावा. दुसरें उदाहरण महमुदाच्या सोमनाथा वरील स्वारीचें. मुसुलमान तवारिखकार हिचें वर्णन करतात; परंतु हिंदू ग्रंथकार हिचा उल्लेख हि करीत नाहींत. बहिःप्रमाणा वर एकमेव अद्वितीय जोर दिला, म्हणजे ही असली आपत्ति उत्पन्न होते. बहि प्रमाणाची मातब्बरी मुळींच काढून टाकली, तर इतिहाससम कल्पित कादंब-यांचा वास्तविक इतिहासांत समावेश होतो. ह्या दुहेरी पेंचांतून निसटण्यास एक लंगडी युक्ति आहे. वस्तुसिध्यर्थ बहि:प्रमाण आवश्यक न मानतां, फक्त पोषक मानावें. साक्षीदार सुसंगत व मानव शक्यतेचीं विधानें करणारा असला म्हणजे त्याची साक्ष प्रमाण समजावी, मग त्या साक्षीला बहि:प्रमाण उपलब्ध असो नसो. असलें तर उत्तम च पाषेक होईल, नसलें तर नितांत मारक मात्र होणार नाहीं. ही दृष्टि प्रस्तुत बखरीच्या दुस-या, तिस-या, पांचव्या व सहाव्या प्रकरणांना लावितां, असें म्हणावें लागतें कीं त्यांत वर्णिलेले राजवंश व कुटुंबवंश माहीम प्रांतांत खरोखर च होऊन गेले. बखरींतील मजकुराच्या वस्तुप्रामाण्याची कसोट ही अशी सैल केल्यानें, प्रामाण्याची सिद्धि व्हावी तशी निर्भीड व कसोशीची झाली नाहीं, अशी रुखरुख मनाला डाचत शिल्लक रहाते. प्रामाण्य मर्जी प्रमाणें असें सैल करीत गेल्यास, वाटेल तें गबाळ वास्तविक इतिहास म्हणून खपलें जाईल व शास्त्रीय चिकित्सेला बट्टा लागेल. करतां, प्रामाण्याचा सैलपणा खपवून चालण्या कडे मन झुकूं न देतां, प्रस्तुत बखरींतील मजकुराला बहिःप्रमाणांचें पाठबळ मिळे तों पर्यंत तो मजकूर वास्तविक इतिहासाच्या सदरांत समाविशिण्याची घाई करणें योग्य होणार नाहीं. बिंबवंशीय राजे, नागरशादि राजे, भोंगळे, नायते राजे, बिंबदेव जाधव, इत्यादींचा उल्लेख आतां पर्यंत उपलब्ध झालेल्या बहिर्लेखांत कोठें हि आलेला नाहीं. तेव्हां, प्रस्तुत छापलेली ही बखर कल्पित कादंबरी म्हणून झिटकारून देण्यास कोणती हरकत आहे ? हरकती दोन आहेत. पहिली हरकत अशी कीं रूप, ढंग व हावभाव पहातां प्रस्तुत बखरीचा रंग कल्पित कथेचा दिसत नाहीं, वास्तविक इतिहासाचा दिसतो. दुसरी हरकत अशी कीं बहिःप्रमाणें म्हणून ज्यांना म्हणतात तीं ह्या बखरींतील मजकुरा संबंधानें अद्याप वरवर देखील उकरलीं, चापसलीं व हाताळलीं गेलीं नाहींत. पांचपंचवीस शिलालेख व ताम्रपट, अमदाबादच्या सुलतानांच्या कांहीं तवारिखा व पोर्तुगीजांचीं कांहीं टिपणें ह्यां पलीकडे बखरींत ज्या काळाचा व स्थळाचा इतिहास दिला आहे किंवा अनुमेय आहे तत्संबंधानें एक हि साधन अद्याप प्रकाशांत आणलेलें नाहीं. शिलाहार, अमदाबादेचे सुलतान व पोर्तुगीज ह्यांच्या संबंधानें बखरींत जो मजकूर दिला आहे त्याला ताम्रपट, तवारिख व टिपणें यांचा बहिःप्रमाणां दाखल पडताळा आहे. हे तीन लोक माहीम प्रांतांत वावरून गेले एतद्विषयक संशय नाहीं. बिंबवंशीय राजे, भोंगळे, नायते राजे व नागरशादि राजे ह्यांच्या संबंधानें तेवढा बहि:पुरावा नाही. शक १०६० नंतर तीन शें वर्षांत हे राजे माहीम प्रांतांत होऊन गेले असें बखरीचें म्हणणें आहे. माहीम प्रांत व त्यांतील हे राजे इतके कोनाकोप-यांतील आहेत कीं उपलब्ध झालेल्या तुटपुंज्या बहि:प्रमाणांत त्यांचा उल्लेख न आढळल्यास तेवढ्यानें संशयाच्या डोहांत गटंगळ्या खात बसण्याचें कारण नाहीं. प्रस्तुत बखरीच्या प्रकाशनानें पृथ्वी वरील एका चिमुकल्या टापूंतील राजकीय हालचाली पहिल्यांदा च उजेडांत येत आहेत. त्यांचा पडताळा शोधून काढिला पाहिजे. तत्कालीन इमारती, तलाव, देवळें, नाणीं, ताम्रपट, शिलालेख, इत्यादींचे अवशेष जे जमीनींत गाडून गेले असण्याचा संभव आहे ते खणत्या लावून उकरून काढिले पाहिजेत. तसेंच तत्कालीन पोवाडे, गाणीं, कागदपत्रें हुडकलीं पाहिजेत. आणि इतकें हि करून जर बहि:प्रमाणें बाहेर आलीं नाहींत, तर प्रस्तुत बखरींतील हकीकतीला बहिःप्रमाणांची पुष्टि मिळत नाहीं म्हणून हताश झालें पाहिजे. हा खटाटोप जो पर्यंत झाला नाहीं, तो पर्यंत बखरींतील मजकूरा वर मर्यादित विश्वास ठेऊन चालण्या खेरीज गत्यन्तर नाहीं.