Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

इतिहासाचार्य राजवाडे यांच्या थोरवीसंबंधी मी लिहिण्याची जरुरी नाही. ते काम इतिहासतज्ज्ञ करतीलच. राजवाडे यांनी हिंदुस्तानच्या इतिहासशास्त्राची, भाषाशास्त्राची, समाजरचनाशास्त्राची जी अपूर्व व मूलभूत क्रांतिगर्भ रचना करून ठेवली तिचे नीट ज्ञान व अभ्यास अद्याप योग्यपणे झालेले नाही. हे खरे की खोटे हे अजमावयाचे असल्यास महाराष्ट्रातील किंवा हिंदुस्थानातील अत्यंत उच्च विद्यापीठात अत्यंत उच्चस्थानीय पाठक किंवा आचार्य जे काय शिकवतात ते पाहिल्यास कळून येईल. इंग्रजी राज्यात तसे होत होते तेव्हा त्याला इलाज नव्हता; पण आता ?

एक आठवण सांगतो. एका इंग्रजी मिशन-यांच्या शाळेत काही दिवस मी मास्तरकी केली होती. त्या वेळी मॅट्रिकच्या इतिहासवर्गात शिवाजीच्या स्वराज्यस्थापनेचा इतिहाससारांश राजवाडे यांच्या प्रतिपादनानुरूपाने मी सांगितला. टेक्स्ट बुक बाजूला सारले. ते सर्व प्रिन्सिपलबाईंनी शेजारच्या वर्गातून आडून ऐकले. ती इंग्रज होती. तिचा तिळपापड झाला. मला ताबडतोब बोलावून माझी मास्तरकी पगार न देता तत्काळ बरखास्त करण्यात आली. हा प्रकार १९२० साली घडला.

आता तोच धडा मी परत सांगितला तर नोकरी जाणार नाही. राजवाडे यांचे इतिहासचित्रण आमच्या शिक्षणतज्ज्ञांना कितपत माहीत आहे किंवा मान्य आहे याची मला शंका वाटते. राजवाडे यांचे सर्वच सिद्धान्त किंवा मांडणी आहे तशीच मान्य करून इतिहासशिक्षण करावे असे माझे म्हणणे नाही. माझा स्वतःचाही मार्क्सवादी भूमिकेवरून त्यांच्याशी सैद्धान्तिक मतभेद आहे हे खरे; तरीपण इतिहास आध्यात्मिक द्वन्द्व विरोधानुसार मांडावा की विशिष्ट इतिहासजनित भौतिक द्वन्द्वातून मांडवा या बाबतीतील मुख्य शास्त्रांबद्दलचे मतभेद सोडले तर राजवाडे यांच्या पद्धतीने व त्यांची सामग्री घेऊनच इतिहास लिहावा लागेल असे माझे मत आहे. हिंदुस्थानविषयक इतिहासाची मार्क्सवादी शास्त्रशुद्ध मांडणी करणा-याला तर राजवाडेकृत लिखाणाचा भरपूर आधार घेतल्याशिवाय पर्याय नाही. म्हणूनच कदाचिन् बुझर्वामान्य विद्वानांना राजवाडेअनुसारित इतिहासाची शिकवणी करण्याची भीती वाटत असावी. इतिहास-विकास सिद्धान्ताच्या मांडणीला भरपूर मालमसाला मिळू शकतो.

आणखी एक उल्लेख करणे आवश्यक आहे. राजवाडे यांच्या पहिल्या प्रकरणाचे इंग्रजी भाषांतर मी केले. त्याचा काही भाग माझ्या 'सोशॅलिस्ट' पत्राच्या मासिक आवृत्तीमध्ये जून १९२३ पासून छापण्यास सुरुवात केली होती. त्यात फक्त दोन पाने येऊ शकली ( पान ४१०-४११). नंतर आणखी एक हप्ता जुलै १९२३ च्या अंकात पान ४२३-४२४ वर आला आहे व पुढे चालू म्हणून लिहिले आहे. याच अंकात कव्हर पेजवर Marriages in Ancient India By V. K. Rajwade price four annas अशी इंग्रजीत जाहिरात दिली आहे. यानंतरचे अंक सापडत नाहीत. श्री. राजवाडे यांच्या इंग्रजी भाषांतराचा पहिला लेख छापताना मी एक अगदी त्रोटक नोट इंग्रजीत लिहिली आहे. ती येथे द्यावी असे मला वाटते. या प्रस्तावनेत माझा राजवाडे यांच्या काही निष्कर्षांबाबत मतभेद आहे असे त्याच वेळी मी नमूद करून ठेवले आहे. त्या ओळी येथे देणे कदाचित् अप्रस्तुत दिसेल हे खरे; पण मे-जून १९२३ ची ही माझी नोंद पुढच्या इतिहासाला उपयोगी पडेल असे वाटते. नोट : The veteran researcher Mr. Rajwade is known to every student of history. Those who would take every existing moral rule as descending directly from heavens eternal and true for all eternity to come and who would consider a violation of a moral value as criminalism would find that morality is an 'article' as much subject to the creative and evolutionary will of man as any dead thing as a chisel or a knife. Our deductions from the findings of Mr. Rajwade with whom we differ on many points we reserve. Ed. S.

रुषि नेला मंदिरासी ।। अर्घपाद्य पुजिलें तयासीं ।।
वृत्तांत सांगितला ऋषिसी ॥ मुळा पासुनि आद्यंत ॥ २४१ ॥
तेणें दिधलें नाभिवचन ।। चिंता न करावि जाण ॥
तुझे उदरि क्षेत्रि महादारुण ।। होईल तो त्रिभुवन जिंकिल ॥ २४२ ॥
मात जाणविली रायासी ।। होणार जे गति ऐसी ॥
कवण जाणे ईश्वरचरित्रासीं ।। लिळालाघवि तो ॥ २४३॥
मग प्रसूत जालिं सुंदरा ।। भानामति अवधारा ।।
जन्मला शेषवंशि ते अवसरा ।। भरथखंडी ।। २४४ ॥
विश्वामित्रें कलें नामाक्षर ।। श्रीधर नाम ठेविलें मनोहर ।।
उपदेशिलें बीजाक्षर ।। सीद्धिमंत्र ॥ २४५ ।।
मग तो वाढला कुमर ।। राजया पाडला विचार ॥
मग बोलाविला विश्वामित्र ।। पृछा आदरिली ।। २४६ ।।
महीपाळरायाचि कन्या ॥ विश्वामित्रें सांगितली जाया ।।
मग जाला वों-पुण्या ।। महीपाळनगरी ।। २४७ ।।
यया रिती शेषवंश ॥ परंपरा चालिली सुरस ।।
ते आईका सावकाश ।। चित्त देवोनी ॥ २४८ ।।

श्रीधर         १      गंगाधर     २        महीधर     ३
पुरंधर         ४      नागोधर    ५        वेणुसागर  ६ 
योनताविर्य   ७       महीदर्य    ८        हीरादर     ९
नामोदर      १०      देववीर    ११

महीपाळ नगरी ।। राजा देववीर राज्याधिकारी ।।
शेषवंशि महाक्षेत्री ।। पुण्यशीळ ॥ २४९ ॥
गणेशमंत्र उपाशक ।। गोत्र आस्तिकरुषि देख ।।
कुळदेवता महालक्ष्मी दैवते ॥ सत्य जाण ॥ २५० ॥
तो असतां तया नगरी ।। कथा वर्तलि पुढारी ॥
तें ऐका ऋषिवैखरी ॥ वदली असे ॥ २५१ ।।
त्या महीपाळि वर्तलें अपूर्व ।। राजा देववीर नृपवर्य ।।
वह्याळि खेळतां अस्त सूर्य ।। जाला तेथें ॥ २५२ ॥

उडकी [ उदंचिका, उदंचिका = उडकी, हुडकी. उदच्यते पानीयं यस्याः सा उदंकिका ] उडकी, हुडकी म्ह० उथळ विहीर. ( धा. सा. श.)

उंडगा १ [उदग्रः = उडग्गा = उंडगा (उच्चारसुखार्थ अनुस्वार) ]

-२ [ उत्पथगः = उंडगा ]

उडचणें १ [ अस् १ गतौ, ४ क्षेपणे. उदसनं = उडचणें] पाणी वर फेंकणें. ( धा. सा. श.)

-२ [ अच् १ गतौ. उदंच = उडच, उदंचनं = उडचणें ] उडचणें म्हणजे पाणी वर काढणें-ओढणें. (धा. सा. श.)

उडणें [ अन् २ प्राणने. उदन् (उद्+ अन्) = उडणें ] प्राण उडाला = प्राणः उदानत् प्राण breathed up.

छाती उडणें = छाती वर येणें breathes up so that the chest rises. ( धा. सा. श. )

उडत (ता-ती-तें) [ उदयत् = उडअत = उडत I उडतें ऊन म्ह० उदयत् सूर्योष्णं. (भा. इ. १८३४)

उडवणें १ [उर्वणं = उडवणें. उर्व् हिंसायाम्] त्याला उडवा, त्याचें डोकें उडवा म्ह० त्याचा नाश करा. उड्डी धातूपासून निघालेल्या णिजर्थक उडवणें म्ह० वरती उड्डाण करवणें ह्या धातूहून हा हिंसार्थक उडवणें हा धातू निराळा. हा उडवणें (हिंसार्थक) णिजर्थक मूळांत नाही. (भा. इ. १८३६)

-२ [ वह् १ प्रापणे. उद्वह = उडव. उद्वहनं = उडवणें ] उपरणें उडवीत जाती = उत्तरीर्य उद्वहन् याति. (धा. सा. श.)

-३ [ लू ९ छेदने. उल्लवनं = उडवणें ] तरवारीनें डोकें उडविलें म्ह० कापलें. ( धा. सा. श.)

-४ [ उल्लापयति ] (उडावणें पहा)

उडवाउडव [ वप् १ छेदने. उद्वप (ejection ) = उडव. उद्वपनं = उडवणें ] चार छेदांनीं चार अंश उडवले म्हणजे ejected. (धा. सा. श.)

उडाऊ [डी १ विहायसा गतौ. उड्डायक = उडाऊ] (धा. सा. श.)

उडावणें [ ली ९ श्र्लेषणे. उल्लापयति (णिच् ली) = उड़्डावतो = उडावतो = उडवतो ] बालं उल्लापयति = पोराला उडवतो म्हणजे फसवतो. त्याला उडवायला किती वेळ म्ह० फसवावयाला किती वेळ. (धा. सा. श.)

उतरणें (पलीकडे जाणें ) [ नदीं उत्तरति = नदी उतरणें]

उतरणें (खालीं ) [ अवतरणं = उतरणें ] जिना उतरणें = सोपानं अवतरति- (भा. इ. १८३५)

ते वेळि ते सुंदरा ॥ भानामति अवधारा ।।
ऋषि बोलाविला सामोरा ।। धावोन चरणि लागली ।। २२७ ।।
तयास करितसे विज्ञापना ।। सांगति जाली विवंचना ।।
मांधाता स्वामी आमचा जाणा ।। तो करता असे चित्तीं ।। २२८ ॥
तरि आतां स्वामिने कृपा करावी ।। आमचि वीनति ऐकावी ।।
आम्हा वधुवर्गा प्रित बरवी ।। होये ऐसें करावें ।। २२९ ।।
वचन ऐकुनि ऋषिवर्य ।। बोलता झाला प्रत्योतर्य ।।
जेणें राजा वस्य तुज होये ॥ तो उपाय देतो आतां ॥ २३० ।।
म्हणोन अभिमंत्रिलें जळ ।। कुपिका भरोनियां निर्मळ ।।
देता जाला केवळ ।। भानामतिसी ।। २३१ ।।
ते कुपिका भानामतियें करीकमळीं ॥ म्हणे अभ्यंग करि रायाचे कुरळी
वस्य होईल तत्काळी ।। सत्यमेव ।। २३२ ।।
मग ऋषि गेला तेथोनी ।। तों पतिव्रता पाहे कुपिका अवलोकुनी ।।
पाहातां थेंब पडला धरणी ।। तो शेषा मस्तकि विखुरला ॥ २३३ ॥
तेणें गजबजिला शेष ॥ म्हणे कवण ऐसा पुरुष ।।
मृत्यलोकिं असतां मज निःशेष ।। विंधिले जेणे ।। २३४ ।।
तैसा च उपरमला सहश्रफणी ॥ मृत्यलोकि आला टाकुनी
दृष्टि देखिली कामिनी ।। भानामति ते ॥ २३५ ॥
ते सर्व लावण्याचि मुस ।। कळे बाणलि राजस ।।
मुर्छना आलि शेषास ।। तये वेळीं ।। २३६ ।।
तें देखोनि भानामती ।। करि उचलिला शेषमूर्ति ।।
पुढां धरिता वेढा माजेसी ॥ घातला शेषे ॥ २३७ ॥
मग ते गजबजिलि सुंदरा ॥ न करवे कांहिं अवधारा ॥
शेष रातला ते अवसरा ॥ अमोघ प्रबळ ॥ २३८ ।।
मनि शंकलि कामिनी ।। शेष गेला निघोनी ।।
गर्भ संभवला तिये लागोनी ॥ तये अवसरा ।। २३९ ।।
मग ते आलि मंदिरी ।। विचारि पडिली सुंदरी ।।
तों विश्वामित्र ऋषि ते अवसरी ।। आला तेथें ॥ २४० ॥

गोत्रें कुळदैवता प्रवर ।। शाखा आद्ये करोन निर्धार ।।
सांगितला साचार । निवडुनियां ॥ २१४॥
आलें सर्वाचियां चित्तासीं ।। जें रुषिवाक्ये निर्धांरेसी ।।
तें मानलें सर्वांसी ॥ साक्षयुक्त ॥ २१५ ॥
पुढां बोलिला नृपवर ।। राउळें सांगाबा आपुला निर्धार ।।
बोलतां जाला श्रीदत्तसिंधा वर ॥ प्रत्योत्तर आदरिलें ॥ २१६ ।।
जी आपण सिंदा शेषवंशी । नव गोत्रें आम्हासी ।।
विश्वामित्र आद्यऋषी ।। परंपरेसि आमचे ॥ २१७ ।।
प्रवर शाखा कुळदेवता ॥ सविस्तारें सांगतों आतां ।।
यावत्-पूर्व-उत्पन्नता ॥ शेषवंशाची ॥ २१८ ॥
द्वापारयुगा भीतरी ।। मांधाता राजा ब्रम्हक्षेत्री ॥
शोमवंशि धर्ममूर्ती ॥ पुण्यशिळ जो ॥ २१९ ।।
तयाचि स्त्रि भानामती ॥ जे पतिव्रता महासती ।।
दोघे असतां यकांती ॥ विलासयुक्त ।। २२० ॥
राजा मदनें व्याकुळ ।। जाला असे केवळ ।।
तयेसि बोलाविलें जवळ ।। उपेक्षा पुरवि कांते ।। २२१ ।।
ते बोलिली सुंदरी ।। रजस्वळा जालों असे अवघारी ।।
भोग द्यावा कवणे परी ।। जेणें प्रायेश्चित घड़ ॥ २२२ ॥
जें अमान्य वेदपुराणी ॥ अधर्म बोलिला ऋषिवचनी ।।
उपर दिन असतां गगनी ।। हें केवि घडे ॥ २२३ ।।
ऐकोन राजा कोपला ।। राणिसी अबोला धरिला ।।
ऐसा संवत्सर येक भरला ।। वधुवर्गासी ॥ २२४ ॥
राणी विचारि मानशीं ॥ राजा न बोले तियेसी ।।
पुढा कथा वर्तलि कैसी ॥ ते ऐका श्रोतेजन ॥ २२५ ।।
कवणे येके दिवसीं ।। भानामति असे वाटिकेसी ।।
विश्वामित्र तया मार्गेसी जात असे ।। २२६ ।।

उजेड, उजेडणें [ युतृ जुतृ भासने । उत् + युत् वा उत् + जुत् = उज्युत् उज्जुत् । नाम उद्योत वा उज्जोत । उज्जोत = उज्जोड = उजोड । ओ स्थाने ए होऊन उजेड ] (भा. इ. १८३२ )

उजोड [ उद्योत ] ( उजियड पहा)

उटंगळ [उत्तुंग + ल (स्वार्थक) = उटुंगळ =उटंगळ] उटंगळ म्ह० उंचनिंच.

उटणें १ [उद्वर्तन ] (उटी पहा)

- २ [उपदेहनं, उद्वर्तनं ]

उंटाड [उष्ट्राढ्यः = उंटाड, गृध्राढ्यः=गिधाड, महिषाढ्यः = म्हैसाड, व्याघ्राढ्यः = वाघाड, बाष्काढ्या = भाकाढ (विऊन फार महिने झालेली ).
स्थूराढ्य = थोराड. इ. इ. इ. ] 
येथें आड प्रत्यय संस्कृत आढ्यपासून निघाला आहे. (भा. इ. १८३४)

उटी [उद्वर्तन = उवट्टण = ऊटणें = उटणें; उद्वर्ति = उवट्टी = ऊट्टी = उटी ] (भा. इ. १८३२)

उट्टें १ [ अवत्त ( अव + दा to cut ) = उट्ट (कापलेला अंगाचा भाग ) ] तुझें उट्टें काढतों म्ह० तुझ्या अंगाचा कापलेला भाग काढतों.

-२ [उठ्. प्रतिघाते = उट्टें (प्रतिघात करणें ) ]

-३ [ उपस्थं = उट्टें ( गांड इ.) ] तुझे उट्टें काढतों = तव उपस्थं क्राथयामि

-४ [जुष्टं = युट्ट = उट्टें (eaten etc) ]

उठणें १ [उत्तिष्ठ = उठ्ठ = ऊठ ] (ग्रंथमाला)

-२ [उठ् अपघाते] उठणें (गांव वगैरे) (ग्रंथमाला)

-३ [वंठ (वठि एकचर्यायां ) to be alone = उठणें, वठणें. ] गांव उठला म्ह० माणसाखेरीज एकाकी झाला. ( धा. सा. श.)

उठबशी [ स्था १ स्थाने. उत्तिष्टोपवेशिका = उठबशी ]

उठल (ला) [स्था १ स्थाने. उपस्थित = उवठ्ठिअ = उठ + ल = उठल (ला ) ] ( धा. सा. श.)

उठवणी [युट्ट कमी होणें. युट्टापयति = उठवणें ] उठवणीस येणें म्ह० क्षीण होणें.

उठवणें [ उत्थापन = उठ्ठावण = उठावणँ-णें ] (भा. इ. १८३२)

उठाणू [ उथास्नु = उठाणू ] वर येणारें गळूं वगैरे. (भा. इ. १८३४)

उठाव [ स्था १ स्थाने. उत्थापः = उठाव ] ( धा. सा. श. )

राजवाडे यांच्या आयुष्यातील कालानुक्रम

 जन्म : १२ जुलै १८६४   मृत्यु : ३१ डिसेंबर १९२६

 वर्ष    घटना
 इ. स. १८६४ दि. १२ जुलै    राजवाड्यांचा पुणे शहरी जन्म.
 इ.स. १८६७   राजवाड्यांचे वडील काशीनाथ बापजी यांचा मृत्यू
 इ.स. १८७२   राजवाड्यांचा धुळाक्षर शिकण्यास प्रारंभ.
 इ.स.१८७६   राजवाड्यांचा दुय्यम शिक्षणाकरिता बाबा गोखले यांच्या इंग्रजी शाळेत प्रवेश.
 इ.स. १८७६   राजवाड्यांचा भाव्यांच्या इंग्रजी शाळेत प्रवेश.
 इ. स. १८८०   राजवाड्यांचा रेव्हरंड बोमंट यांच्या इंग्रजी शाळेत सातव्या इयत्तेत प्रवेश.
 इ.स. १८८२   राजवाडे मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण.
 इ. स. १८८३   राजवाड्यांचा उच्च शिक्षणास्तव मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजात प्रवेश.
 इ.स. १८८४   राजवाड्यांचे वडीलबंधू श्री. वैजनाथ काशीनाथ राजवाडे यांना डेक्कन कॉलेजात फेलो नेमण्यात आले.
 इ. स. १८८६ ते १८९०   राजवाड्यांचे, उच्च शिक्षणार्थ डेक्कन कॉलेजात वास्तव्य.
 इ. स. १८८७   राजवाड्यांचे वडीलबंधू श्री. वैजनाथ काशीनाथ राजवाडे यांची कराची येथील कॉलेजात प्रोफेसरचे जागेवर नेमणूक.
 इ. स. १८८८   राजवाड्यांचा विवाह रा. गोडबोले यांची मुलगी. मथुबाई, पुणे शहरी, सासरचे नाव अन्नपूर्णाबाई.
 इ. स. १८९०   राजवाड्यांची मुंबई विश्वविद्यालयाची बी. ए.ची जानेवारी परीक्षा उत्तीर्ण.
 इ. स. १८९०   राजवाड्यांच्या अस्सल व विश्वसनीय इतिहास साधने शोधण्याच्या खटपटीस प्रारंभ.
 इ. स. १८९१   राजवाड्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जानेवारी शिक्षकाची नोकरी पत्करणे.
 इ. स. १८९२   राजवाड्यांच्या कुटुंबाचा मृत्यु.
 इ.स. १८९३    राजवाड्यांचा न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षकाचे जागेचा राजीनामा.
 इ. स. १८९४   कोल्हापूर येथे कै. अण्णा विजापूरकर यांनी समर्थ वर्तमानपत्र काढण्यास प्रारंभ. या पत्रात राजवाड्यांचे लेख प्रसिद्ध होत असत.
    ग्रंथमाला मासिक पुस्तक कै. अण्णा विजापूरकर यांनी प्रसिध्द करण्यास प्रारंभ केला. म. इ. साधने खंड २-३-५-६ व ८ या मासिकात प्रसिद्ध झाले.
    राजवाड्यांनी भाषांतर मासिक प्रसिद्ध करण्यास प्रारंभ केला. हे मासिक इ. स. १८९७ च्या ऑगस्टपर्यंत सुरू राहून बंद पडले. राजवाडयांच्या प्लेटोच्या रिपब्लिक (प्लेटोचे सुराज्य) चे भाषांतर राजवाडयांनी सुरू केलेल्या भाषांतर मासिकात प्रसिद्ध होण्यास प्रारंभ.
 इ. स. १८९५   राजवाड्यांची व कै. श्रीमंत सर सयाजीराव महाराज गायकवाड यांची भेट व भाषांतर मासिकाच्या प्रति दरसाल विकत घेण्याचा श्रीमंतांचा हुकूम.
 इ.स. १८९७ ते १८९९   राजवाड्यांच्या मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन. या खंडाच्या प्रकाशनाविषयी राजवाड्यांनी या खंडाच्या प्रस्तावनेत खालीलप्रमाणे खुलासा केला आहे. हा खंड तीनदा छापला. शेवटचा खंड मोदवृत्त छापखान्यांत इ. स. १८९९ मध्ये छापला.
 इ.स. १९००   राजवाड्यांच्या मातुश्रींचा मृत्यु.
 इ स. १९००   म. इ. साधनें खंड २ दोन
    म. इ. साधनें खंड ४ चार
    म. इ. साधनें खंड ३ तीन
 इ. स. १९०१   महाराष्ट्र सरस्वती मंदिर मासिकाचे प्रकाशनास प्रारंभ.
 इ. स. १९०२   मराठयांच्या इतिहासाची साधने खंड ५ पांच
 इ.स. १९०३   राजवाड्यांचा निजाम हैदराबाद संस्थानातील बीड, पैठण, जोगाइचे आंबे इत्यादी स्थळी प्रवास.
    म. इ. साधने खंड ८ आठ
    राजवाड्यांची श्री. नानासाहेब देव व भास्कर वामन भट यांच्याशी सातारा येथे प्रथम भेट व राजवाड्यांकडून नानासाहेब देवांस जुन्या दासबोधाची हस्तलिखित प्रत व गिरिधरांच्या कवितांच्या हस्तलिखित बाडांची प्राप्ती.
 इ.स.१९०३ ते १९०५   राजवाड्यांचा तंजावर व आसपासच्या प्रांतात प्रवास. म. इ. साधने खंड ६ प्रस्तावना.
 इ.स.१९०४   मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सात ७
    राजवाड्यांचा मिरज व आसपासचे प्रदेशात प्रवास
    निबंधरचना. राजवाड्यांचे स्वहस्ते केलेले टिपण.
    राजवाड्यांचे धुळे शहरी प्रथम आगमन.
 इ. स. १९०५   मराठयांच्या इ. साधने खंड (६) सहा.
    श्री रामदास आणि रामदासी ग्रंथमाला सुरू करण्यांत इ.स. १९०५ येऊन श्रीसमर्थांच्या ग्रंथराज दासबोधाचें (श्री कल्याणस्वामी लिखित) सत्कार्योत्तेजक सभा धुळे यांचेकडून प्रकाशन.
 इ. स. १९०५   राजवाड्यांची चाळीसगाव तालुक्यातील उद्ध्वस्त पाटण शहरास ज्योतिषी भास्कराचार्यांच्या शिलालेखाचे वाचनार्थ धुळेकर ऋणानुबंधी मित्रांसमवेत भेट.
 इ. स. १९०५   राजवाड्यांच्या इतिहास संशोधन मंडळ स्थापन करण्याच्या कल्पनेचा उगम. (म. इ. सा.खंड ६ च्या प्रस्तावनेत राजवाड्यांनी पान ९७ वर ही कल्पना नमूद केली आहे.
 इ.स. १९०६   पुण्यास भरलेल्या शारदोपासक संमेलनाचे राजवाडे अध्यक्ष (राजवाड्यांनी स्वहस्ते केलेले टिपण).
 इ.स. १९०६   प्रभात मासिक कै. गोविंद काशीनाथ चांदोरकर यांनी प्रसिध्द करण्यास प्रारंभ  केला.
 इ.स. १९०६   राजवाड्यांस दरसाल रुपये १२५ सवाशे कै. श्रीमंत बाळासाहेब मिरजकर यांनी देण्यास प्रारंभ केला.
 इ.स. १९०६   विश्ववृत्त मासिक अण्णा विजापूरकर यांचेकडून प्रसिध्द करण्यास प्रारंभ.
 इ. स. १९०७   राजवाड्यांचे साता-यास वास्तव्य. (राजवाड्यांचे स्वहस्ते केलेले टिपण)
 इ.स. १९०७   समर्थ विद्यालयाची तळेगांव दाभाडे येथे स्थापना.
 इ.स. १९०८ सप्टेंबर ते १९०९   सातारा, मिरज येथे वास्तव्य. (राजवाड्यांचे स्वहस्ते केलेले टिपण)
 इ.स. १९०८   राजवाड्यांचा तळेगाव दाभाडें येथे वास्तव्य करण्यास प्रारंभ.
 इ.स. १९०९   मराठयांच्या इ. सा. खंड १० दहा.
 इ.स.१९०९   व्याकरण (राजवाड्यांचे स्वहस्ते केलेले टिपण)
    राजवाडे ज्ञानेशरीचे प्रकाशन - प्रकाशक सत्कार्यो- इ. स. १९०९ जून त्रयोदशी १३त्तेजक सभा धुळे. बीड शहरातील (निजाम हैदराबाद संस्थान) पाटांगण देवस्थानाचे मठाधिपति मथुरानाथ गोसावी यांनी ही पोथी राजवाड्यांस दिली.
 इ. स. १९१०   राजवाड्यांची चुलती लक्ष्मीबाई यांचा मृत्यु.
    इतिहास (राजवाड्यांचे स्वहस्ते केलेले टिपण)
 इ. स. १९१०   राजवाडे व त्यांचे पुणेकर ऋणानुबंधी यांचेकडून पुण्याच्या भारत-इतिहास-संशोधक मंडळाची स्थापना.
 इ.स. १९१२   मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १६ सोळा.
 इ. स. १९१२   मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १२ बारा.
 इ.स. १९१२   मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १५ पंधरा.
    विजयादशमी सुबंतविचार ग्रंथाचे प्रकाशन.
 इ. स. १९१३   मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १७ सतरा.
 इ. स. १९१४   मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १९ एकोणीस.
 इ. स. १९१४]   मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १८ अठरा.
 इ. स. १९१५   मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २० वीस.
 इ. स. १९१५   श्रीरामदास आणि रामदासी मासिकाचा प्रारंभ. पहिल्या अंकाचे प्रकाशन. सत्कार्योत्तेजक सभा धुळे.
 इ.स. १९१६   इतिहास आणि ऐतिहासिक मासिकाच्या प्रकाशनास प्रारंभ. प्रकाशक सत्कार्योत्तेजक सभा धुळे. या मासिकाच्या चवथ्या वर्षाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. त्यानंतर अंक ३३, ३४, ३५, ३६ प्रसिध्द व्हावयाचे राहिले होते. त्याऐवजी संस्कृत भाषेचा उलगडा हा ग्रंथ देण्यात आला.
 इ. स. १९१५   कार्तिक राजवाड्यांचा बैतूल व मुळताई प्रांताकडे प्रवास
 इ. स. १९१७   राजवाड्यांचा नष्ट झालेल्या पुरातन तगर शहराच्या शोधार्थ बदामी, बल्लारी वगैरे शहरांकडे प्रवास. पुण्याच्या भारत-इतिहास-संशोधक मंडळाशीं केलेले संबंध.
 इ. स. १९१८   मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २१ एकवीस.
 इ.स.१९२०   संस्कृत भाषेचा उलगडा या ग्रंथाचे प्रकाशन.
 इ. स. १९२२   राधामाधव विलास चंपू ग्रंथाची प्रसिद्धी.
 इ. स. १९२४   महिकावतीच्या बखरीची प्रसिद्धी.
 इ. स. १९२६   राजवाड्यांनी पुण्यास कै. डॉक्टर केतकर यांच्या बंगल्याशेजारी भाडयाने बंगला घेऊन  वास्तव्य केले होते. तो बंगला सोडून देऊन त्यांचे धातुकोश-रचनार्थ धुळयास आगमन, व नाशकास प्रयाण.
    राजवाड्यांचे नाशिक येथे प्रकृतिस्वास्थ्यास्तव श्री. श्रीधर गोविंद काळे यांचे येथे वास्तव्य व पुण्यास प्रयाण.
    राजवाड्यांचे धातुकोश रचनेस्तव धुळ्यास आगमन व निधनापावेतो धुळ्यास वास्तव्य
 इ. स. १९२६,  ३१ डिसेंबर 
  राजवाड्यांचे धुळे येथे आकस्मिक निधन.

१०० वर्षं जगून खूप कामे करण्याची राजवाडे यांची इच्छा होती. विद्यार्थिदशेतील व्यायामाने प्रकृतीही निकोप होती. पण सततची भ्रमंती व अखंड मनन-चिंतनाचा मनावरील ताण यामुळे त्यांना हाय ब्लड प्रेशरच्या विकाराने ग्रासले तरी तशाही स्थितीत त्यांचे काम चालूच होते. सन १९२६ च्या मार्च महिन्यात टाचणांच्या ट्रंका व स्वयंपाकाची भांडी घेऊन ते धुळे येथे गेले. या गावाशी त्यांचा फार निकटचा व जिव्हाळ्याचा संबंध होता. तेथे गेल्यावरही धातुकोश नीटपणे पुरा करण्याची खटपट चालूच होती. पण जिद्दी मनाला दुबळ्या शरीरापुढे वाकावे लागले व दुर्वासाप्रमाणे कोपिष्ट पण अखंड ज्ञानसाधना करणा-या या ऋषितुल्य संशोधकाचा, वैय्याकरणाचा, समाजशास्त्रज्ञाचा ३१ डिसेंबर १९२६ रोजी अंत झाला.

राजवाडे आणखी जगते तर आर्यांच्या विजयाचा मोठा ग्रंथ निर्माण झाला असता. मराठ्यांच्या इतिहासाचा शोध घेत असताना सा-या आर्य संस्कृतीचा इतिहास शोधण्याची जी ईर्षा त्यांच्यात निर्माण झाली होती तिचा परिपाक या ग्रंथरूपाने मिळू शकला असता. त्याची रूपरेषाही त्यांनी आखली होती. धातुकोश व विवाहसंस्थेचा इतिहास पूर्ण होऊ शकले असते, पण मृत्यूने त्यांचे हे विशाल मनोरथ मध्येच अडविले.

इतिहासाचार्यांचे अपुरे राहिलेले हे कार्य पुरे करण्याची ईर्षा नव्या पिढीत निर्माण झाली तर तीच त्यांना मिळालेली खरीखुरी स्मृति-सुमनांजली ठरेल.

मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांच्या खंडांना त्यांनी ज्या प्रदीर्घ प्रस्तावना लिहिल्या, त्यांत इतिहासविषयक अनेक प्रश्नांचा ऊहापोह राजवाडे यांनी केला आहे. मराठ्यांचा इतिहास शास्त्रीय पद्धतीनेच लिहिला गेला पाहिजे हा त्यांचा आग्रह त्यांत दिसतो. तसेच परिस्थिती व मानव यांच्या झगड्यातून इतिहास घडतो; दैवी संकेत, एकाद्याच व्यक्तीचे कर्तृत्व या गोष्टी ते महत्त्वाच्या मानीत नाहीत तर सामान्य व असामान्य व्यक्तींची चरित्रे मिळून इतिहास घडतो असे राजवाडे मांडतात. इतिहास म्हणजे तत्कालीन समाजाचे भौतिक व आत्मिक चरित्र अशी इतिहासाची व्यापक व्याख्या ते करतात.

कै. राजवाडे यांची कामगिरी निव्वळ इतिहासविषयकच नसून मराठी भाषाशास्त्राच्या दृष्टीनेही त्यांनी फार मोठी कामगिरी बजावलेली आहे. 'राजवाडे धातुकोश' व 'राजवाडे नामादिशब्दव्युत्पत्ती कोष' हे दोन ग्रंथ त्यांच्या सूक्ष्म व मूलगामी बुद्धिमत्तेचे निदर्शक होत. त्याचप्रमाणे ‘सुबन्त विचार' व ' तिङ्कत विचार ' या दामले यांच्या व्याकरणावरील टीका-लेख व 'संस्कृत भाषेचा उलगडा' हा स्वतंत्र ग्रंथ त्यांच्या स्वतंत्र विचारसरणीचे निदर्शक होत. या ग्रंथात व्युत्पत्तींतून मानवाच्या इतिहासाचा अर्थ लावण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न निःसंशयपणे मौलिक स्वरूपाचा आहे.!

महानुभवांच्या ग्रंथांच्या सांकेतिक भाषेचा राजवाडे यांनी केलेला उलगडा ही त्यांची फार मोठी कामगिरी आहे. भाषाभ्यासाला या उगड्याने नवेच दालन खुले झाले. याशिवाय वेळोवेळी विविध विषयांवर निरनिराळ्या मासिकांतून जे लेख व निबंध प्रकाशित केले त्यांची संख्याही फार मोठी आहे. त्यांच्या सर्वस्पशी प्रतिमेने अनेक विषयांवर काही नवीन विचार व सिद्धान्त पुढे मांडले. ते सर्वच अविवाद्य व अचूकच होते असे जरी नसले तरी ते मांडताना प्रमाणे देऊन ते सिद्ध करण्याची अवलंबिलेली पद्धती निर्विवादपणे शास्त्रीयच होती.

विचार, मनन, चिंतन, यांना शब्दरूप देऊन ते लेखांच्या, ग्रंथाच्या रूपाने वारंवार प्रसिद्ध करण्याची तत्परता कै. राजवाडे यांनी दाखविली. हा त्यांच्या चरित्रातील विशेष होय. त्यामुळे त्यांचे विचारधन विपुल ग्रंथसंपत्तीच्या द्वारा भावी पिढ्यांना मिळू शकले. (पुढील पानावर पहा ) 

अशा त-हेने सुरू झालेली राजवाडे यांची इतिहासाची साधने जमा करण्याची साधना अखंड चालू राहिली. यासाठी यात्रिकाच्या चिकाटीने उभा महाराष्ट्र त्यांनी पायाखाली घातला. ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळांना वारंवार भेटी दिल्या. त्या वास्तू बोलत्या झाल्या. अमूल्य माहिती गोळा झाली. तेथील जनजीवन, त्यांची भाषा, चालीरीती, वाङ्मय यांचा समाजशास्त्रीय दृष्टीने अभ्यास करून निष्कर्ष काढले.धोतर, लांब काळा कोट, डोक्याला पागोटे, स्वतःचे अन्न शिजवून खाण्यासाठी मोजक्या भांड्यांची पडशी टाकून एखाद्या ठिकाणी जुनी दप्तरे मिळण्यासारखी आहेत असा सुगावा लागला, की ते ती मिळवण्यासाठी जिवाचे रान करीत एरवीचे फटकळ विसूभाऊ नम्र होत आणि अशा

त-हेने मिनतवा-या करून कागद हस्तगत केले की त्यावर तुटून पडत. अहोरात्र परिश्रम करून त्यांचा संदर्भ लावीत व पदरमोड करून ते प्रसिद्ध करण्याचा खटाटोप करीत. एकाद्या सरदार घराण्यातील किंवा संस्थानिकांकडील वारस असे कागदपत्र देण्यास खळखळ करू लागले की राजवाडे संतापून म्हणत "ज्यांच्या पराक्रमावर आज ऐश्वर्य भोगत आहेत ते संस्थानिक झोपले आहेत, जहागिरदार डुलक्या खात आहेत म्हणून हा खटाटोप आम्हाला करावा लागतो आहे."

धुळीची पुटे बसलेली, भिजून चिखल झालेली ही दप्तरे हस्तगत करण्यात आलेल्या कुठल्याही त-हेच्या अडचणींनी राजवाडे यांच्या तपश्चर्यंत कधीही खंड पडला नाही. थकवा जाण्यापुरती थोडी झोप व स्वतःचे अन्न शिजवून खाण्यापुरती सवड याशिवाय सर्व वेळ वाचन, लेखन, मनन-चिंतनात जाई.
या सर्व तपाचे फळ म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचे प्रसिद्ध केलेले २२ खंड होत. याशिवाय मृत्युसमयी त्याहून अधिक असा अप्रकाशित संग्रह राजवाडे यांच्यापाशी होता. या भ्रमंतीतच त्यांना एकनाथपूर्वंकालीन ज्ञानेश्वरीची प्रत मिळाली. ती त्यांनी संपादित करून प्रसिद्ध तर केलीच, शिवाय " ज्ञानेश्वरीतील मराठी व्याकरण" हा भाषाशास्त्रीय दृष्ट्या मौलिक ग्रंथ लिहून ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांना नवे मार्गदर्शन केले. "राधामाधवविलासचंपू" हा जयराम पिंड्येकृत शहाजी-चरित्रावरील काव्यग्रंथ व "महिकावतीची बखर" हे राजवाडे यांनी संपादित केलेले आणखी दोन ग्रंथ. या दोन्ही ग्रंथांच्या प्रस्तावना म्हणजे महाराष्ट्राची वसाहत, त्याचे समाजजीवन यासंबंधी राजवाडे यांनी जो अभ्यास केला, जे निष्कर्ष काढले त्याचे प्रतिबिंबच होय. तुटपुंजे संशोधन, अपुरी साधने, संशोधक वृत्तीचा अभाव अशा परिस्थितीत राजवाडे यांनी या प्रस्तावनांत महाराष्ट्राच्या वसाहतीसंबंधी केलेले विवेचन विशेषच महत्त्वाचे ठरते. (पुढील पानावर पहा )