प्रस्तावना

१७. ही कथा राजकीय साधनांची झाली. सामाजिक, धार्मिक, वैय्यापारिक वगैरे साधनांचा अद्याप कांहींच पत्ता लागलेला नाहीं. तीं मुळीं नाहींतच म्हणून पत्ता लागला नाहीं, असा प्रकार नाहीं. प्रकार निराळाच आहे. तत्संबंधीं शोध करण्यास विद्यमान जे दोन तीन शोधक आहेत त्यांना फुरसत झालेली नाहीं. अर्वाचीन राजकीय इतिहासाची मिळालेलीं व मिळण्यासारखीं साधनें शोधण्याच्या, लावण्याच्या, तपासण्याच्या व प्रसिद्ध करण्याच्या खटपटींतच त्यांचा सर्व वेळ जातो. यामुळें इतर साधनांचा शोध करण्यास त्यांना फुरसत मिळत नाहीं. ही अडचण निघून जावयाला एकच मार्ग आहे. जास्त मंडळीनें संशोधकाचें काम अंगीकारलें पाहिजे. पदवीधर व बिनपदवीधर असें बरेच लोक दरवर्षी तयार होत आहेत. त्यांपैकीं काहींच्या मनांत ह्या उद्योगांत दारिद्र्य, हालअपेष्टा व कष्ट सोसून पडण्याचें येईल काय?

१८. येथें कोणी अशी शंका आणील कीं सध्यां जे दोन तीन संशोधक आहेत त्यांच्या खटपटीनें जीं साधनें मिळालीं आहेत त्यांचेच कमींत कमी १४६ खंड व्हावयाचे आहेत आणि तेच छापतां छापतां कित्येक वर्षें जातील; मग आणखी संशोधक ह्याच कामांत पडले तर त्यांनीं जमविलेली सामग्री छापावयाची कोणीं? तर ह्या शंकेला उत्तर आहे सध्या देशात जीं साधनें सुदैवानें विद्यमान आहेत तीं आणखी कित्येक वर्षांनीं मुळींच नाहीशीं होऊन जातील. बरींच साधनें आजपर्यंत नाहींशी झालींच. आता तरी जीं काहीं राहिलीं आहेत तीं वाचविलीं पाहिजेत. हें वाचविण्याचें काम दोघे तिघे गृहस्थ आज दहा पंधरा वर्षे करीत आहेत. परंतु त्यांना अनुभवान्तीं असें कळून आलें आहे कीं त्यांचें सामर्थ्य असलेलीं सर्व साधनें हुडकून काढण्याइतकें नाहीं. त्यांना सहकाराची जरूर आहे. जसजसे मागें मागें जावें तसतसें असें आढळून आलेलें आहे कीं जुनीं जुनीं साधनें एकेकटीं अशीं गांवगन्ना पसरलीं आहेत. त्या एकेकट्याचा परामर्ष घेण्यास सध्यांच्या संशोधकांना सामर्थ्य नाहीं. व फुरसत नाहीं. एतदर्थ नवे संशोधक प्रांतोप्रांतीं हवे आहेत. शंकेच्या पहिल्या भागाचा हा विचार झाला. दुस-या भागासंबंधानें एवढेंच सांगावयाचें कीं सर्वच साधनें एकदम प्रसिद्ध थोडींच करावयाचीं आहेत? शिवाय, जसजसे संशोधक वाढतील तसतसे ते प्रकाशनाचे आपापले मार्ग काढतीलच काढतील. तशांत, छापण्याचें काम अद्याप व्यतिमात्राच्याच बलावर चाललें आहे. आनंदाश्रमासारखी जर छापण्याची स्वतंत्र सोय झाली, तर सर्व साधनें प्रकाशणेंही सुलभ होण्यासारखें आहे. तात्पर्य, सुदैवानें जीं साधनें राहिलीं आहेत, तीं वांचविलींहि पाहिजेत आणि प्रकाशिलींहि पाहिजेत. प्रकाशण्याचा हेतु असा कीं इतिहासाची-स्वदेशाच्या इतिहासाचीं - साधनें सर्वांच्या सहज आटोक्यांत येऊन, अनेकांना इतिहासाच्या निरनिराळ्या शाखांवर लिहिण्यास सोयीचें व्हावें.