Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
होलाका म्हणून एक संस्था रानटी ऋषिपूर्वजांत असे. या संस्थेत ते रानटी पुरुष लिंग व योनी यांना अनुलक्षून टोळींतील सर्व स्त्रीपुरुषांची व्यंगे उघड स्पष्टपणे पुकारीत हे अनुमान दुस-या चालीवरून निघते. कुणबी वगैरे गावंढ्यांच्या पूर्वजात तरुण कुमारिका एकमेकीच्या उखाळ्यापाखाळ्या काढून अभद्र भाषण करीत, असे अनुमान तिस-या चालीपासून उद्भवते. हाच न्याय शिष्ट व संभावित अशा वैदिक ब्राह्मण-क्षत्रियाच्या रानटी पूर्वजांना लावावयाचा आहे. रानटी ऋषिपूर्वज यज्ञभूमीवर म्हणजे अग्निकुंडाभोवती म्हणजे धगधगीत धुमीच्याभोवती उबा-याला जमत, लिंग व योनी यांचे वाचक शब्द एकमेकांना उद्देशून हरहमेश बोलत आणि नाकाडोळ्यांप्रमाणेच हे दोन्ही अवयव त्या रानटी लोकात उघडे असल्याने तत्संबंधाने गुह्य व गुह्योत्पन्न लज्जा उत्पन्न झालेल्या नसल्यामुळे या अवयवांचे वाचक शब्द उच्चारण्यात कोणताच विपरीतपणा नाही असे समजून आपण सध्याचे लोक ज्यांना अश्लील म्हणतो ते शब्द सहजासहजी उच्चारीत. लिंग व योनी यांचे वाचक असे बीभत्स शब्द सध्याही पृथ्वीवरील कितीतरी रानटी लोकांच्या नित्याच्या बोलण्यात हरघडी येतात, हे समाजशास्त्राच्या अभ्यासकांना नवीन सांगावयास पाहिजे असे नाही फार दूर जावयास नको, सध्या ज्या स्थली बसून मी लिहीत आहे, त्या स्थलाशेजारून भिल्ल, वडार, वंजारी, कुणबी इत्यादी कनिष्ठ दर्जाचे रानटाऊ लोक गाड्या हाकताना, बाजार करताना, लावण्या म्हणताना व शिळोप्याच्या गप्पा गोष्टी करताना मी पाहात व ऐकत आहे. दर वाक्यास एकतरी अश्लील शब्द त्यांच्या बोलण्यात आला नाही, असे फारसे घडत नाही. ब्राह्मणादि उच्च व सभ्य लोकांशी बोलताना अश्लील भाषा तोंडातून काढावयास ते किंचित् भितात, परंतु आपापसात बोलताना त्या बोलण्यात ताळतंत्र फारच थोडा असतो आणि हा असा प्रकार होणे अगदी स्वाभाविक आहे. उपजीविकेकरिता काबाडकष्ट करणे आणि करमणुकीकरिता जननेंद्रियांची आराधना करणे, या दोन विषयांइतका तिसरा विषय रानटी लोकांच्या परिचयाचा नसतो. हाच प्रकार रानटी ऋषिपूर्वजांचा असे. ह्या रानटी ऋषिपूर्वजांच्या बोलण्यांत जननेंद्रियांना अनुलक्षून फार शब्द सहजासहजी येत. हे रानटी ऋषिपूर्वज धुमीभोवती जमत, जननेंद्रियांसंबंधाने ज्या अडचणी येत त्याचसंबंधाने संभाषण करीत, तेथेच गर्भाधानही उरकीत आणि या तिन्ही क्रियांना मिळून ते यज्ञ हा शब्द लावीत. अग्नीत टाकिलेल्या हविर्द्वारा देवांची आराधना करणे हा यज्ञाचा जो अर्थ वैदिक लोक करीत, तो अर्थ रानटी ऋषिपूर्वजांना माहीत नव्हता. यज्ञ म्हणजे आगटीभोवती जमणे, काटक्या व मारलेल्या जनावरांची चरबी टाकून ती आगटी चेतवणे, सोमाची दारू पिणे, जननेंद्रियासंबंधाने बोलणे करणे व मैथुन करणे, या क्रियासंततीला ते रानटी लोक यज्ञ हा शब्द लावीत. मूळ यज्ञ हा शब्द यज़ + न् असा होता, यज् न् हे वाक्य होते. न् किंवा न्त हे अनेकवचनी प्रथमपुरुषवाचक सर्वनाम रानटी ऋषिपूर्वंजांच्या भाषेत असे, क्रियाशब्दाच्या पुढे ते सर्वनामे योजीत. यज् न् या त्यांच्या वाक्याचा अर्थ ते यजतात, असा होता.