Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

जाळून पोळून राखरांगोळी करणा-या व मागे सर्व रान काळेकुट्ट करून टाकणा-या अग्नीला कृष्णवर्मा हे उपपद ऋग्वेदात बहुत स्थली दिलेले आहे. कोलितांचा ऊर्फ कुलिशांचा ऊर्फ जळक्या कोळशांचा श्वापदांना भेवडविण्याच्या कामी उपयोग करण्याची क्लृप्ती यद्यपि वनचर ऋषिपूर्वजांना गावली तत्रापि त्या क्लृप्तीचा उपयोग उन्हाळ्यात रानांना वणवा लागेल तेव्हाच तेवढा करता येण्याजोगा असे, आयती कोलिते मिळण्याचे असले सुप्रसंग फारच क्वचित् व फार झाले तर दोन अडीच महिने मिळण्याचा संभव असल्यामुळे वर्षाच्या बाकीच्या दहा महिन्यांत ऋषिपूर्वज इतर पशूंइतकेच दुबळे असत. ह्या दुबळेपणात शेकडो वर्षे काढल्यावर, वणव्याने पेटलेले ओंडके डोंगरातील गुहांतून जळके राखून ठेवण्याची क्लृप्ती सुचली. ह्याच क्लृप्तीला अनुलक्षून ऋग्वेदात गुहाहितः, गुहायां निहितः ही विशेषणे अग्नीला लावलेली आहेत.गुहाहित म्हणजे गुहांत राखून ठेवलेला अग्नी, डोंगरकपारीतील गुहेच्या बाहेर मैदानात किंवा नदीतीरी किंवा इतरत्र हवा तेथे वाटेल तेव्हा वाटेल त्या ऋतूत उपयोगास आणता येत असे. हीही अडचण अकलेच्या जोरावर रानटी ऋषिपूर्वजांनी कालांतराने काढून टाकली. ऋषिपूर्वजांचा अत्यंत पहिला पूर्वज कोणी अंगिरस या नावाचा पुरुष होऊन गेला. त्याने गुहेत जतन करून ठेवलेल्या अग्नीस गुहेच्या बाहेर आणून लोकांत आणून सोडले म्हणून ऋग्वेदात अनेकदा उल्लेख आलेले आहेत. ते ऋग्वेद वाचणा-यात इतके प्रसिद्ध आहेत की, त्यांचे संदर्भ देऊन कालहरण करीत नाही. जेव्हा ऋषिपूर्वज गुहांतूंन म्हणजे डोंगरातील भुयारातून वसती करून असत व खाली मैदानातून झोपड्या करून राहण्याची कला त्यांच्यात निर्माण झाली नव्हती, तेव्हा सतत उपयोगी पडावा म्हणून ते अग्नीचे रक्षण सहजच गुहातून करीत. पुढे झोपड्यातून राहण्याची कला माहीत झाल्यावर गुहेत अग्नी न ठेविता, ते तो झोपड्यातून ठेवू लागले. ही झोपड्यातून अग्नि ठेवण्याची क्लृप्ती समाजात प्रथम अंगिरसाने काढिली. गुहेत जोपर्यंत अग्नी ठेविला जात असे, तोपर्यंत शत्रूवर फेकण्यासाठी कोलिते आणण्यास वारंवार गुहेकडे जावे लागे आणि प्रसंगी गुहेतील अग्नी वेळेवर हाती येण्यापूर्वी हिंस्त्र पशू व त्याहून हिंस्त्र असे जे दस्यू ते ऋषिपूर्वजांना इजा करून निघून जात. झोपड्यातून अग्नी ठेवण्याची जेव्हा क्लृप्ती निघाली, तेव्हा शत्रूला वाटेल तेव्हा तोंड देण्याचे सामर्थ्य ऋषिपूर्वजांत आले. ह्यापूर्वी शत्रूंवर अग्नीचा उपयोग इतर श्रेष्ठ लोकांनी केलेला ऋषिपूर्वजांनी पाहिलेला होता. रानटी ऋषींहून जास्त सुधारलेले देव म्हणून कोणी लोक असत. यथा वै मनुष्या एवं देवा अग्र आसन् (तै. सं. का. ७ प्र.-४-अनुवाक २). ते दस्यूंचा पाडाव आग टाकून करीत. अयं अग्निः पृतनाषाट् सुवीरो येन देवासो असहन्त दस्यून् (ऋग्वेद सूक्त २६३ नववी ऋचा). हा अग्नी दस्यूंची सैन्ये मारून काढितो, याच्या साहाय्याने देवांनी दस्यूंचा पुरातन काली पाडाव केला, असे वर्णन वैदिक ऋषींनी केलेले आहे.