Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
शत्रूंच्या अंगावर देव आग पाखडीत त्यांना पिटाळून लावीत हे रानटी ऋषिपूर्वज शेकडो वर्षे पाहत होते; परंतु ही आग ते कशी निर्माण करीत व कोठून आणीत ते ऋषिपूर्वजांना कळत नसे. देवांनाही रानटी ऋषिपूर्वजांना अग्नी उत्पन्न करण्याचे गुह्य आपण होऊन परोपकारबुद्धीने कधी सांगितले नाही, सांगितले असते तर देवांचा श्रेष्ठपणा राहिला नसता. कदाचित् देवांनी मानवांना ते गुह्य सांगण्याचा प्रयत्न केला असता, तरी ते रानटी माणसांना कळले असते की काय याचा संशय आहे. उदाहरणार्थ, सध्याचा गनकॉटन घ्या. सध्याचा युरोपियन माणूस गनकॉटन निर्माण करू शके व त्याच्या जोरावर कमतर सुधारलेल्या लोकांचा पाडाव करतो. अरब, अफगाण, हिंदू, चिनी हे लोक युरोपियन माणसाचा हा प्रभाव पाहतात, परंतु गनकॉटन तयार कसा करावा हे या लोकांना माहीत नसते. यद्यपि परोपकारबुद्धीने युरोपियन माणसाने गनकॉटन कसा तयार करतात याची माहिती रानटी हिंदू, मुसलमान किंवा चिनी माणसाला दिली, तत्रापि हिंदू वगैरे कमतर सुधारलेल्या लोकांना गटकॉटन तयार करता येणे निखालस अशक्य असते; कारण गनकॉटन नावाचा अग्नि निर्माण करण्याला जे शास्त्रीय ज्ञान व शास्त्रीय अवजारे व हत्यारे व औते लागतात त्याचे स्वप्नही हिंदू, अरब, अफगाण वगैरे सध्याच्या रानटी द्विपादांना नसते. अर्थात्, गनकॉटन करण्याचे गुह्य यद्यपि व्याख्यानांनी, पुस्तकांनी किंवा साक्षात् कारखान्यातून पढवून या लोकांना सांगितले तथापि तो स्वदेशात स्वतंत्रपणे तयार करण्याची ऐपत या लोकांना नसते. तोच प्रकार रानटी ऋषिपूर्वजांचा असे. देव शत्रूवर आग पाखडीत व त्यांचा पराभव करीत हे ऋषिपूर्वज पाहत, परंतु ही आग कशी तयार करावी, अग्नी वेळ पडेल तेव्हा कसा उत्पन्न करावा, कोणती इंधने उपयोगात आणावी वगैरे वनस्पतिज्ञान, पुढील तजवीज अगाऊ करून ठेवण्याची नैतिक बुद्धी ज्वालाग्राही इंधनाचा साठा करण्यास लागणारी निवा-याची घरे, वगैरे पूर्वतयारी रानटी ऋषिपूर्वजांजवळ नसल्यामुळे, देवांच्या क्लृप्त्या माणसांना पेलता येण्यासारखा नव्हत्या. पुढे वन्य ऋषिपूर्वज गुहा सोडून झोपड्या करून जेव्हा राहण्याच्या पायरीला आले, जळाऊ इंधने कोणती हे अनुभवजन्य शास्त्रज्ञान जेव्हा त्यांना त्यांच्या स्वत:च्या मेहनतीने आले, आणि पुढील संकटांना तोंड देण्याकरिता अगाऊ जय्यत तयारी करून असावे लागते, हे नीतिज्ञान जेव्हा त्यांनी संपादन केले, तेव्हा अगीचे स्वामित्व ऋषिपूर्वजांना येऊन, त्यांची सुधारणेच्या कामात उत्तरोत्तर प्रगती होत गेली. अगदी प्रथम ऋषिपूर्वज अग्नी कसा तयार करीत त्याचे दिग्दर्शन ऋग्वेदात केलेले सापडते. अग्नी हा दहा बहिणींचा पुत्र होय, अशी कव्योक्ती आहे. दश स्वसारो अग्रुवः समीचीः पुमांसं जातमभि संरभंते (ऋग्वेदसूक्त २६३ ऋचा १३).