Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

(२) त्रेतायुगात अन्योन्यस्पर्श म्हणजे हाताने किंवा अंगुलीने परस्परस्पर्श करून संभोगेच्छा दर्शविण्याची चाल टोळीतील समाजास मान्य झाली. ह्या हस्तादिकांच्या स्पर्शनावरून कालांतराने भारतीयांत जी विवाहसंस्था परिणत झाली तीतील विवाहास पाणिपीडन किंवा हस्तग्रहण हे नाव पडलेले आहे. आश्वलायन गृह्यसूत्रातील पहिल्या अध्यायाच्या सातव्या खंडात विवाहविधीची प्रक्रिया सांगितली आहे. तीत, (१) गृभ्णामि ते सौभगत्वाय हस्तं इति अंगुष्ठमेव गृहणीयाद् यदि कामयति पुमांस एव मे पुत्रा जायेरन्निति, (२) अंगुलीरेव स्त्रीकामः, आणि (३) रोमान्ते हस्तं सांगुष्ठ मुभयकामः, असे तीन प्रकार स्पर्शाचे ऊर्फ पाणिपीडनाचे दिले आहेत. म्हणजे मुलगे पाहिजे असल्यास नव-याने नवरीचा अंगठा धरावा, मुलगी पाहिजे असल्यास फक्त अंगुळ्या धराव्या, आणि दोन्ही पाहिजे असतील तर केसापर्यंतचा हात अंगठ्यासह धरावा. आश्वलायन गृह्यसूत्रातील ह्या तिन्ही त-हा त्रेतायुगातील स्पर्शावस्थेतील आहेत. त्रेतायुगात एक रानटी टोळी पुरुषप्रधान असून तिच्यात धरून आणिलेल्या स्त्रीचा अंगठा पकडण्याची चाल होती. दुसरी टोळी स्त्रीप्रधान असून तिच्यात वेठबिगार करून नवरी मिळविणारा नवरा नवरीच्या फक्त अंगुल्या अलगत धरी, आणि तिसरी एक टोळी स्त्रीपुरुषांचे समानत्व मानणारी होती. तीत नवरीचे मनगट नवरा खुशाल धरी. हे तिन्ही समाज एकवटून वैदिक समाज बनला, आणि अर्थात् या तिन्ही चाली वैदिक समाजात प्रचलित असलेला गृह्यसूत्रकार जो शौनक त्याने नमूद करून ठेविल्या. पुरुषप्रधान समाज अंगुष्ठ धरी, सबब अंगुष्ठ धरिले असता मुलगे होतात अशी भावना झाली. स्त्रीप्रधान टोळी अंगुल्या धरी, सबब अंगुल्या धरिल्या असता मुली होतात असा समज फैलावला, आणि तिसरी टोळी, अंगुष्ठ, अंगुली व मनगट धरी, त्यावरून मनगट धरिले असता मुली व मुलगे दोन्ही होतात अशी समजूत रूढ झाली.