Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

आधुनिक दृष्टीने बोलावयाचे म्हणजे ज्यांची उत्पत्ती कोणापासून म्हणजे कोणत्या विवक्षित स्त्री-पुरुषांपासून झालेली सांगता येण्यास साधन नाही, त्यांना मानसपुत्र म्हणून व्यास म्हणतो इतकेच. तात्पर्य, प्रजापतीच्या पूर्वीची माहिती व्यासाला फारशी नव्हती व ती असण्याचा संभवही नव्हता. पूर्व पुराणांतून, वेदांतून व दंतकथांवरून व्यासांना जी सर्व माहिती मिळाली तिच्यावरून त्यांनी असा कयास बांधला की प्रजापती हे मनुष्यसृष्टीचे आदि होत. प्रजापतीपासून कौरवपांडवांच्या काळापर्यंतची वंशपरंपरा बहुतेक बिनतूट अशी पुराणांवरून, वेदांवरून व दंतकथावरून जी त्यांना उपलब्ध झाली ती त्यांनी प्रामाणिकपणाने जशीच्या तशी, विशेष फेरफार न करता दिलेली आहे, अशी सर्व भारत ग्रंथ पाहून माझी खात्री झालेली आहे. व्यासांच्या प्रामाणिकपणाबद्दल एकच एक मोठ्यांतले मोठे प्रमाण म्हणजे, स्वकालीन नीतिदृष्ट्या गर्ह्य वाटणा-या अशा नाना प्राचीन चाली, कोणाचीही व कशाचीही पर्वा भीडमुर्वत न धरिता, त्यांनी पुरातन इतिहास म्हणून, प्रांजलपणे लिहून ठेवण्यास माघार घेतली नाही, हे होय. सरमिसळ समागम, अतिथीला स्वस्त्रीसमर्पण, पशूसमागम, गुरुपत्नीगमन, बहुपतित्व, अल्पकालीन विवाह अटींचे विवाह इत्यादी नीतिबाह्य चालींचा निर्देशच नव्हे तर तपशीलवार वृत्तान्त स्थलोस्थली जो त्यांनी दिला आहे त्यावरून प्रामाणिक इतिहासकाराचे अवघड काम त्यांनी किती उत्कृष्टपणे पारं पाडिले आहे, ते विशद होते. गर्ह्य व निंद्य म्हणून वरील चालींची हकीकत जर व्यासांनी दाबून टाकली असती, तर जगाच्या इतिहासाची केवढी भयंकर हानी झाली असती तिचा अंदाज समाजशास्त्राचे परिशीलन करणा-या विद्वानास यथायोग्य करता येतो. प्रजापति संस्था निर्माण झाल्यावर त्या संस्थेच्या पूर्वी ज्या विचित्र चाली समाजात रूढ होऊन बसल्या होत्या त्या समाजातून एकाएकी नाहीशा झाल्या नाहीत. त्यापैकी बहुतेक सर्व चाली नाना देश, नाना पोटसमाज यात प्रजापति संस्था निर्माण झाल्यानंतरही प्रचारात होत्या व पुरातनधर्म म्हणून लोकमान्य होत्या. त्यांचा तपशील न देण्याचे जरी व्यासांनी मनात आणले असते, तत्रापि त्यांनी पिढ्यानुपिढ्यांची परंपरागत मनोरचना त्यांच्या आड निःसंशय आली असती. जी भाषा, ज्या संस्था, जी परिस्थिती मनुष्याच्या मनाची रचना करते त्या भाषेला, संस्थांना व परिस्थितीला सोडून मनुष्य एक वाक्यही इतिहास म्हणून उच्चारू शकत नाही, अशी स्थिती मनुष्यमात्राच्या मनोरचनेची असल्याकारणाने गर्ह्य म्हणून अनेक प्राचीन चालींचा वृत्तान्त व्यासांनी जर दाबून टाकण्याचा प्रयत्न केला असता तर एकच निष्पत्ती फळास आली असती. ती ही की, महाभारत म्हणूस जो उत्कृष्ट इतिहास आज आपणास पाहावयास मिळतो तो मुदलातच लिहिला जाणे अशक्य झाले असते.