Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

४. कुटुंबात मातृप्राधान्य जाऊन पितृप्रधान्य यावयाला यद्यपि पराकाष्ठेचे प्रयास पडले, तत्रापि आर्य लोकांत प्रजापतिकाली पितृप्राधान्याची जी एकदा स्थापना काही टोळ्यात झाली तिची उपयुक्तता समाजाच्या ध्यानात उत्तरोत्तर जास्त जास्त येऊन ती संस्था कालांतराने आर्य लोकांत प्रथम शिष्टमान्य, नंतर बहुजनमान्य आणि शेवटी धर्ममान्य होऊन बसली. अशा काळी-म्हणजे पितृप्राधान्य बहुतेक पूर्णपणे स्थापित झाल्याच्या काळी-महाभारतनामक इतिहासाचा कर्ता जो व्यास नामक कोणी पुरुष जो शकपूर्व चौथ्या पाचव्या शतकाच्या सुमारास होऊन गेला असावा, त्याला भारतीय इतिहास रचण्याची आवश्यकता जेव्हा भासली तेव्हा त्याच्यापुढे असा प्रश्न पहिल्या प्रथम येऊन उभा राहिला की, भारतीय इतिहासाचा प्रारंभ कोठून करावा ? अतिप्राचीन सरमिसळ समागमाच्या काळापासून करावा की मातृप्रधान कुटुंबसंस्थेच्या काळापासून करावा, की पितृप्रधान जी प्रजापतिसंस्था तिच्या काळापासून करावा ? प्रथमपक्षी म्हणजे सरमिसळ समागमाच्या काळापासून इतिहासाचा प्रारंभ करावा म्हटले तर कोण कोणाचा कोण हेच ओळखण्याची तत्कालीन समाजसंबंधाने अडचण पडू लागली. सबब तेथून इतिहासाचा प्रारंभ करणे अव्यवहार्य दिसले. द्वितीयपक्षी म्हणजे मातृप्रधान कुटुंबसंस्थेच्या काळापासून इतिहासकथनास प्रारंभ करता आला नसता असे नाही; परंतु मातृप्रधान कुटुंबात यद्यपि भाऊ, बहीण, आई व मामा ही चार नाती स्पष्ट दिसत होती तत्रापि बापाचा पत्ता अद्याप लागला नव्हता, त्यामुळे एकापुढे एक वंश सांगण्याची पंचाईत पडू लागली. तेव्हा, दुसराही पक्ष ह्या इतिहासकाराने सोडून दिला. शिल्लक राहिला तिसरा पक्ष पितृप्रधान कुटुंबसंस्थेचा. ह्या संस्थेच्या काळापासून वंशपरंपरा जिला म्हणतात ती समाजात ठळकपणे उमटलेली दिसत होती. पणजा, आजा, बाप, मुलगा, नातू, पणतू अशी एकाला एक लागून वंशपरंपरा स्पष्ट ओळखता येत असल्यामुळे इतिहासरचनेचे कार्य सुरळीत भासले आणि म्हणूनच व्यासांनी प्रजापतिसंस्थेपासून भारतेतिहासाचा आदि केला आहे. मरीचि, अंगिरस, अत्रि, पुलस्त्य, पुलह, ऋतु, वशिष्ठ हे सहा किंवा सात प्रजापती, व्यासांच्या इतिहासदृष्टीने सर्व सृष्टीचे उत्पादक होत. यांच्यापासून देव, दानव, राक्षस, किन्नर, यक्ष, गंधर्व, अप्सरा, मानव, पशू, पक्षी, वृक्ष, नद्या व पर्वत उत्पन्न झाले असे व्यासांचे मत होते. याच्यापूर्वी काय होते ते व्यासांना माहीत नाही. फक्त याच्या पूर्वी ब्रह्मदेव होता व त्याने मरीच्यादी सहा किंवा सात प्रजापती केवळ मनःसंकल्पाने उत्पन्न केले. ह्या मरीच्यादींना व्यास ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणून म्हणतो.