Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
असो. अशा त-हेने प्राचीन आर्ष लोकांत दोन प्रकारची कुटुंबे जन्मास आली. एकात अनेक बहिणी एका भावाला पती म्हणून राहू लागल्या व दुस-यात अनेक भाऊ एका बहिणीला पत्नी म्हणून राहू लागले. पहिल्याला बहुपत्नीक अशी संज्ञा सोईखातर देऊ व दुस-याला बहुपतीक अशी संज्ञा देऊ. पैकी दुस-या प्रकारच्या कुटुंबात मुलाचा बाप अमुकच अशी निश्चिती नसल्यामुळे मुलाला नाव आईवरून मिळे, आणि पहिल्या प्रकारच्या कुटुंबात पती एकच असल्यामुळे, मुलाच्या बापाचा निश्चय यद्यपि संशयित नसे, तत्रापि जुनी चाल म्हणून बराच कालपर्यंत आयांच्या नावावरून मुलांचे नामकरण होई. ह्या दुस-या प्रकारात मागे दिलेली आदितेय, वैनतेय, दैतेय इत्यादी नावे पडतात. अदिति, दिति, कद्रू इत्यादी यद्यपि कश्यप प्रजापतीच्या स्त्रिया होत्या, व मुलांच्या बापासंबंधाने यद्यपि कोणत्याही प्रकारची अनिश्चितता नव्हती. तत्रापि पुरातन रूढीला अनुसरून कश्यपबीजाने अदितीच्या पोटी झालेल्या प्रजेला आदितेय किंवा आदित्य असे नाव आईच्या नावावरून पडले, म्हणजे वंश माता जी अदिति तिच्या नावाने प्रख्यात झाला, बाप जो कश्यप त्याच्या नावाने झाला नाही. ह्याचा अर्थ असा की, माता जी अदि ति कुटुंबात प्रधान गणली गेली, पिता जो कश्यप त्याला पूर्ण गौणत्व दिले गेले. पित्याला गौणत्व कां मिळाले त्याला सबळ कारण आहे. प्रजापति संस्था म्हणजे एकपतित्वाची संस्था आर्य लोकांत जी सुरू झाली ती येथून तेथून सा-या आर्य लोकांत एकदम सुरू झाली नाही. आर्य लोकांतील काही थोड्या टोळ्यांमध्ये सुरू झाली. बाकीच्या ब-याच टोळ्यांत बहुपतित्वाची चाल जय्यत प्रचलित होती, व जुनी म्हणून पुराणप्रिय आर्यांनी ती बहुतकालपर्यंत सोडली नाही. आर्य लोकांत बहुजनसंमत अशी जी ही बहुपतिकत्वाची चाल तिच्या अमलात अपत्यनामे मातृनामावरून ठेवण्याखेरीज गत्यंतर नव्हते. त्यामुळे बहुजनसमाजात मातृनामोत्पन्न अपत्यनामांची संख्या इतकी बेसुमार अधिकतर होती की, त्यांच्या बहुसंख्येपुढे पितृनामोत्पन्न अपत्यनामांची डाळ शिजवायला बहुत प्रयास पडले असावेत. प्रयास किती पडले असतील त्याचा अंदाज करावयास काही प्रमाणे देतो. अतिप्राचीन आर्यकाळ व कौरव-पांडवांचा काळ यामध्ये काळाचे बरेच अंतर आहे. तथापि आर्य लोकांतील कित्येक समाजात मातृनामोत्पन्न अपत्यनामांची रेलचेल असलेली भारतेतिहासावरून दृष्टीस येते. कौतेय, पार्थ, राधेय, गांगेय, सौभद्र, माद्रेय, द्रौपदेय इत्यादी पांडव कुळातील व्यक्तींची नावे मातृनामोत्पन्न आहेत. कृष्णाला देवकीनंदन हे नाव वासुदेव या नावाचा अपरपर्याय म्हणून दिलेले वारंवार आढळते. प्रजापतिसंस्था निर्माण होऊन हजारो वर्षे लोटल्यावर झालेल्या पांडवांच्या काळची ही कथा; मग खुद्द प्रजापतिसंस्था म्हणजे एकपतित्वाची संस्था ज्या पुरातन काळी निर्माण झाली त्या काली मातृनामजन्म अपत्यनामे सर्वत्र प्रचलित असल्यास व त्यांच्या पुढे पितृनामजन्य अपत्यनामाचा टिकाव न लागल्यास नवल कसले ? पांडवकालानंतर उपनिषदादी ग्रंथात, गुरुपरंपरेचे ब्राह्मणाचे वंश दिलेले आहेत. त्यात मातृनामजन्य अनेक नामे नमूद करून ठेविली आहेत. ती सर्वांच्या परिचयाची असल्यामुळे, त्यांनी येथे जागा अडवीत नाही. त्यावरून एवढे मात्र स्पष्ट होते की, पांडवांच्या पुढील काळात स्त्रिया गोत्रप्रवर्तक ऊर्फ अपत्यनामप्रवर्तक असत व त्या ब्राह्मणात असत.