Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

उपनिषत्कालानंतर पाणिनीचा काल आला, अपत्यार्थक प्रत्ययमीमांसा करताना पीलाया वा (४-१-११८) या सूत्राने पीलाया अपत्यं पैलः, पैलेयः या मातृनामजन्य अपत्यनामांचा विशिष्ट सूत्र देऊन पाणिनी उल्लेख करतो. व्द्यचः (४-१-१२१) या सूत्राने दत्ताया अपत्यं दात्तेयः असे अपत्यनाम सिद्ध होते. या दात्तेय नामक लौकिक गोत्रनामावरून म्हणजे अपत्यनामावरून कोकणस्थातील दाते हे आडनाव निघालेले आहे. पैल, पैलेय, दात्तेय ह्या अपत्यनामावरून स्पष्ट होते की, पाणिनिकाली मातृनामावरून अपत्यानामे थोडी बहुत प्रचलित होत असत. पाणिनीय अपत्याधिकारात बहुतेक लौकिक गोत्रप्रवर्तकांची नावे पुरुषांची आहेत; परंतु त्यात पीला, दत्ता वगैरे स्त्रीनामे अपवादादाखल तरी सापडतात. म्हणजे पाणिनिकाली काही कुटुंबे बहुपतिक असावी व त्यात अर्थातच मातृनामावरून अपत्यनाम बनविण्याची चाल अगितकत्वास्तव प्रचलित असावी. पाणिनीनंतर शतवाहनांचा काल येतो. वासिष्ठीपुत्र, गौतमीपुत्र इत्यादी मातृनामजन्य अपत्यनामे शातवाहन राजकुलात प्रचलित असलेली सर्वांच्या ओळखीची आहेत. ही मातृनामजन्य अपत्यनामे गमतीखातर ठेविली असतील हे संभवत नाही. शातवाहनकुल आंध्रजातीय व आंध्र-भृत्य होते आणि आंध्र लोकात बहुपतिकत्वाची चाल एका काळी होती याविषयी वाद नाही. शातवाहनांच्या नंतर मातृनामावरून अपत्यनाम पडल्याचा ठळक असा उल्लेख म्हटला म्हणजे भवभूतीने केलेला जातुकर्णीपुत्राचा. जातुकर्णीपुत्र म्हणजे जातुकर्णी स्त्रीचा पुत्र. जातुकर्णीच्या नव-याच्या नावावरून जातुकर्णीच्या पोटी झालेल्या पुत्राचे नाव पडलेले नसून, स्वतः खुद्द जातुकर्णीच्या नावावरून ते पडलेले आहे, ही बाब लक्ष्य आहे. असो. भवभूतीपर्यंत स्त्रिया क्वचित् अपत्यनामप्रवर्तक असत, एवढे यावरून निश्चित आहे. तात्पर्य, अतिप्राचीन आर्यकालीन मातृनामोत्पन्न अपत्यनामे ठेवण्याची चाल हजारो वर्षे या देशात प्रचलित होती, व ती निखालस निर्मूलित व्हावयास आपला हा सध्याचा काल लागला. ह्यावरून प्राचीन काली मातृप्राधान्य जाऊन कुटुंबात पितृप्राधान्य यावयास किती प्रयास पडले असतील व प्रजापतिसंस्था म्हणजे एकपतित्वाची संस्था प्रचलित व्हावयास किती अडचणी आल्या असतील त्याचा अंदाज होण्यासारखा आहे.