Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

येथे असा प्रश्न उद्भवतो की, दक्षाने ज्या पुरुषांना आपल्या कन्या दिल्या, ते पुरुष एकंदर सात होते, तर त्या सातांना कन्यांचा सारखा विभाग करून कां दिला नाही ? कोणाला दोन दोन, कोणाला चार, कोणाला तेरा, कोणाला सत्तावीस असा विषम विभाग कां केला ? ह्या प्रश्नाला समर्पक व समाधानकारक असे सर्वात उत्तम उत्तर एकच संभवते, ते हे की यूथांतील सोदर बहिणी बहिणी ज्या मुली होत्या त्या सोदरत्वास्तव बद्ध मायेने झालेल्या असल्यामुळे त्यांचा संसार एकाच कुटुंबात झाला असता सर्वांच्या मनाजोगता होईल असा कयास करून दक्षाने ही विषम वाटणी केली. तात्पर्य, सांगावयाचा मुद्दा एवढाच की, यूथातून विभक्त होऊन स्वतंत्र कुटुंबस्थापना जी प्रथम झाली ती सोदर बहिणींच्या हस्ते झाली. यूथातील सर्व अपत्ये यूथातील सर्व स्त्रियांची समजण्याचा जो पूर्वीचा प्रघात होता, तोच प्रघात सोदर बहिणींच्या कुटुंबात काही काळ चालू होता. याला पोषक प्रमाण कृत्तिकांचे. कार्तिकेय जो षडानन तो ह्या सात कृत्तिका बहिणींचा सामायिक मुलगा म्हणून वर्णन केलेले आहे. हे सामायिकत्व पुढे कालांतराने नष्ट होऊन अपत्यांची मालकी त्या बहिणींची वैयक्तिक झाली. यूथावस्थ समाज असताना त्या समाजात बहुपतित्व व बहुपत्नीत्व असे दोन्ही प्रकार स्त्री-पुरुषसंबंधाचे असत. यूथातून सोदर बहिणी विभक्त झाल्यावर त्यांनी जे कुटुंब स्थापिले त्यांत सोदर भगिन्यात्मक बहुपत्नीत्व होते हे सांगावयाला नकोच. हे भगिन्यात्मक बहुपत्नीक कुटुंब मात्रात्मक बहुपतिकही होते; कारण यूथात एकाच समयी बहुपत्नीत्व व बहुपतित्व जसे विद्यमान असे, तसेच यूथातून विभक्त होणा-या सोदर बहिणींच्या स्वतंत्र कुटुंबातही बहुपत्नीकत्व व बहुपतिकत्व असे. यूथात ज्या चाली होत्या त्याच चाली सोदर बहिणींच्या स्वतंत्र कुटुंबात दृष्टीस पडल्यास नवल नाही. पुरातन चाली एकदम नाहीशा होत नाहीत, आस्ते आस्ते नाहीशा होतात, व बहुतकालपर्यंत व कधीकधी तर वर्तमानकाळपर्यंत आपले अवशेष अशांशाने मागे ठेवतात. इतकेच की, ह्या अंशाशाने मागे राहिलेल्या चाली इतर चालींच्या दडपणाखाली गुदमरून गेलेल्या असतात.