Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

युरोपातल्या धर्माचार्याप्रमाणे आपल्या इकडे वल्लभाचार्यांना हा अग्रोपभोगाचा हक्क परवापरवापर्यंत गुजराथेत लोक देत असत आणि सध्या हक्काची बजावणी यद्यापि अक्षरशः होत नसली, तथापि वल्लभपंथीयांची ह्या हक्काला मानसिक अनुमति आहे. युरोपात हा अग्रोपभोगाचा हक्क परवापर्यंत होता हे पाहिले म्हणजे प्राचीन आर्षसमाजात पाचसहा हजार वर्षापलीकडे तो असल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. देवलोक व देवसमाज नष्ट झाल्यावर, स्त्रियांचे अर्पण करण्यास मनुष्यदेहधारी देव राहिले नाहीत. परंतु या अवधीत वीरपूजेचा पगडा आर्षांवर बसून इंद्रादी देवांना व वीरांना आर्ष लोक ईश्वर समजू लागले व या ईश्वरांना स्त्रिया प्रथम अर्पण करू लागले. आर्ष ह्या चालीचा अवशेष अद्यापही आपणा महाराष्ट्रीयांत व इतर भारतीयांत जारीने प्रचलित आहे. विवाहात लाजाहोम म्हणून एक होम करीत असतात. या होमाची सर्व प्रक्रिया वधूची देवांच्या हक्कांतून मुक्त करण्यासंबंधाची आहे. आश्वलायन गृह्यसूत्रांतून ही सर्व प्रक्रिया क्रमवार येथे देतो व समाजशास्त्रदृष्ट्या तिचा अर्थ करून दाखवितो. अर्यमन् , वरुण आणि पूषन् या तीन देवांचा ताबा ऊर्फ पाश वधूवर होता. त्या पाशांतून तिला मुक्त करण्याचा वराने संकल्प केला. तेव्हा प्रथम देवांच्या साक्षात् कैचीतून वधूला काढून आणून वराने तिला एका बळकट शिळेसन्निध आणिले आणि म्हटले की इमं अश्मानं आरोह, अश्मेब त्वं स्थिरा भव, सहस्व पृतनायतः, अभितिष्ठ पृतन्यतः ॥ आश्वलायनगृह्यसूत्र, अ. १, खंड ७, सूत्र ७. ह्या शिळेवर चढ, शिळेप्रमाणे स्थिर हो आणि शत्रूंना हतप्रभ कर व तोंड दे. वराने आपल्या ताब्यातून काढून वधू नेलेली पाहून देव क्रोधायमान झाले व ते वधूवरांवर चालून आले. तेव्हा वधूचा भाऊ जवळ साहाय्यार्थ होता. त्याने मध्यस्थी करुन गोष्ट हाणामारीपर्यंत येऊ दिली नाही. त्याने रदबदली करून वराने पळविलेल्या वधूच्या मोबदला भाजलेल्या लाह्या दंड म्हणून देण्याचे कबूल केले व देवांच्या कचाट्यातून बहिणीची मुक्तता केली. ह्या दंडालाच अवदान म्हणून पारिभाषिक नाव आहे.