Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

लोकान्तात मैथुन करण्याची चाल कधीतरी अस्तित्वात असल्याबिगर, ते एकान्तात करण्याचा निर्बेध घालण्याची आवश्यकता भासली नसती. आर्ष लोकांत लोकान्तात मैथुन करण्याची चाल असल्याचा सुगावा अयोनिज या शब्दात सापडतो. द्रौपदी; सीता वगैरे अनेक व्यक्तींची उत्पत्ती अयोनिज झाल्याची वर्णने आहेत. अयोनिज या शब्दाचा अर्थ काय ? अयोनिज म्हणजे स्त्री-योनीपासून न झालेले अपत्य असा उत्ताना अर्थ करतात, परंतु असा अर्थ करणे समंजस नाही, स्त्रीयोनिव्यतिरिक्त प्रजा होणे ज्या अर्थी अशक्य आहे त्या अर्थी हा उत्तानार्थ खरा अर्थ नव्हे, हे स्पष्टच होते. अयोनिज या शब्दाचा खरा अर्थ खालीलप्रमाणे आहे. योनि या शब्दाचा अर्थ गृह असा मुळात आहे व वेदांत या अर्थाने हा शब्द योजिलेला आढळतो. आरोहंतु जनयो योनि अग्रे (तैत्तिरीय आरण्यक प्रपाठक ६, अनुवाक १). स्त्रिया आधी घरात शिरोत, असा अर्थ आहे. योनिज म्हणजे घरात जन्मलेले मूल व अयोनिज म्हणजे घरात न जन्मलेले म्हणजे घराबाहेर जन्मलेले. घराबाहेर जन्मलेले म्हणजे कोठे जन्मलेले ? तर यज्ञमंडपात जन्मलेले. ऋषी वामदेव्यव्रत करीत आणि ही व्रते यज्ञभूमीवर करीत असताना कोण्याही स्त्रीने संभोगेच्छा दर्शविली असता ती तेथल्या तेथे पूर्ण करीत. वामदेव्यव्रताचे मंत्र छांदोग्योपनिषदात दिले आहेत. असल्या ह्या व्रताच्या वेळी जे मूल जन्मास घातले गेले त्या मुलास अयोनिज मूल म्हणजे घराबाहेर जन्मास घातलेले मूल म्हणत. यज्ञभूमीवर उघड्यात संभोग केल्याची उदाहरणे महाभारतात आहेत. तात्पर्य, आर्ष लोकांत उघड्यात समागम करण्याची चाल एके काळी होती व तिचा अवशेष म्हणून यज्ञभूमीवर वामदेव्यादी व्रते करताना समागम करण्याची चाल शिल्लक राहिलेली दिसते.