Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
(५) महाभारतात व हरिवंशात वंशोत्पत्तीसंबंधक जे पुरातन इतिहास-पुरातन इतिहास हा शब्द माझा नाही. व्यासांचा आहे - दिले आहेत त्यांच्यावरून भारतीय समाजाची पुरातन नीतिमत्ता आपल्या सध्याच्या नीतिमत्तेच्या दृष्टीने कोणत्या दर्जाची होती, हे आपणास ब-याच खुलाशाने सांगता आले. हा खुलासा ह्या पुरातन इतिहासांच्या आधाराने आणीकही विस्तृत करता येण्यासारखा आहे. मनुष्य हा वंशाने पाशव आहे व प्राथमिक वन्य मनुष्यांत काही काही बाबतीत पशूंचे आचरण दृष्टीस पडल्यास नवल करावयास नको. आदिपर्वाच्या ६३ व्या अध्यायात पराशरऋषी व सत्यवती ऊर्फ मत्स्यगंधा निषादी यांच्या समागमाचा वृत्तान्त दिला आहे, त्यात पराशराने सत्यवतीशी उघड्यात समागम केल्याचे लिहिले आहे. आपले कृत्य दिसू नये म्हणून परशराने भोवताली योगमायेने अंधार उत्पन्न केला म्हणून कवीने पराशराची पाशववृत्ती झाकण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु थोडे सूक्ष्म पाहिले असता त्यात विशेषसा राम दिसत नाही; कारण अतिप्राचीन आर्यलोकांत दिवसाढवळ्या उघड्या हवेत स्त्रीपुरुष समागम होण्यात काही नीतिभंग होतो असे वाटत नसल्याचा पुरावा आहे. उतथ्यपुत्र दीर्घतपाने सर्व लोकांसमक्ष स्त्रीसमागम करण्यास आरंभ केला, असे वर्णन आदिपर्वाच्या १०४ व्या अध्यायात आढळते. आदिपर्वाच्या ८३ व्या अध्यायात, गुरुदारेशी रत होणारे आणि पशूंसारखे ज्यांचे आचारविचार आहेत, अशा म्लेंच्छ लोकांचे गुणवर्णन केलेले आढळते. सर्व लोकांसमक्ष उघड्यात स्त्रीसमागम करण्याची चाल हिंदुस्थानात कोठे कोठे अवशिष्ट असलेली अर्वाचीन प्रवाशांनी नमूद करून ठेविली आहे. रणजितसिंग हत्तीच्या अंबारीत सर्वांसमक्ष स्त्रीसमागम करी म्हणून ज्याकूमो लिहितो. पुण्यात बाजीराव रघुनाथ ह्यांची घटकंचुकी सर्वप्रसिद्ध आहे. निवडक स्त्रीपुरुष रंगमहालात जमून स्त्रियांच्या चोळ्या एका घागरीत घालीत व ज्या पुरुषाला ज्या बाईची चोळी सापडे तिशी तो सर्वांदेखत रममाण होई. या पाशव खेळाला घटकंचुकी म्हणत. ही घटकंचुकी कर्नाटकात पाचपन्नास वर्षोंपूर्वी प्रघातात होती. घटकंचुकीत वडील, धाकुटे किंवा नाते हा भेद पाळीत नसत ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. असो.)प्राचीन आर्ष समाजाच्या जोडीला प्राचीन शक, अर्वाचीन टाहीटियन व प्राचीन तामील लोकांना बसविता येईल. हिरोडोटस एस्किथियन (Skythian) म्हणजे शक लोकासंबंधाने लिहितो की, when one of them desires a woman, he suspends his quiver in front of his chariot and tranquility unites with her. (जेव्हा त्यापैकी कोणाला स्त्री-संभोगाची इच्छा होई तेव्हा ते आपला भाता रथाला लटकावून शांतपणे संभोग करीत). हाच इतिहासकार तामील लोकांसंबंधाने नमूद करतो की, They coupled as publicly as beasts. (ते जनावरांच्याइतक्याच उघडपणे संभोग करीत). तात्पर्य, प्राचीन शक किंवा तामील किंवा अर्वाचीन टाहीटियन लोकांची जी वन्यावस्था होती व आहे तीच निकृष्ट दशा प्राचीन आर्य लोकांची असलेली महाभारतावरून दिसते. ही रानटी चाल जसजशी मोडत गेली तसतसा तद्विरुद्ध धर्मही निर्माण होत गेला. मैथुन एकान्तात करावे, म्हणून शांतिपर्वाच्या १९३ व्या अध्यायात व इतर स्मृतिग्रंथांत मुद्दाम सांगितलेले आहे.