Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

८. मूळाक्षरांची लिपी

परंतु ही कला कालांतराने फार अवजड झाली. जेवढ्या म्हणून वस्तू व कल्पना मनुष्याला अवगत होत्या त्या हजारो वस्तूंची व कल्पनांची हजारो चित्रे काढावी लागत व त्यांचे अर्थ ध्यानात ठेवावे लागत. शिवाय निरनिराळे कलावंत एकाच वस्तूची निरनिराळी चित्रे काढून घोटाळा मजवीत असतील तो निराळाच. सबंद प्राणी काढण्याचे सोडून दिले, तरी प्राण्यांच्या मुंडक्यांची, कानांची, खुरांची, चोचींची व शेपटांची चित्रे काढणे आणि हसणे, लाजणे, खाणे, पळणे इत्यादी क्रियांची चित्रे काढणे फार बेताल भासू लागले. ह्या भानगडीतूनही कल्पक मनुष्याने रस्ता काढला. साक्षात् मुंडकी, कान काढण्याऐवजी उभ्या, आडव्या, तिरप्या वाकड्या, वक्र, खाली, वर, पुढे व मागे, रेघा काढून वस्तू व शब्द दाखविण्याची युक्ती निघाली. रेघोट्यांत आकृतीचा चित्रपणा व वस्तुदर्शनत्व सहजच मागे पडत चालले व त्या फक्त शब्दांच्या व तदद्वारा वस्तूच्या बोधक झाल्या. रेघोट्या शब्द दाखवीत, त्यामुळे त्यांची संख्या शेकडोंनी मोजावी लागे. शब्द फोडून त्यांतील निरनिराळे अवयव विवक्षित रेघांनी दर्शविण्याची क्लृप्ती ही ह्यापुढील पायरी होय. तत्रापि हजार पाचशे खुणा ध्यानात ठेवाव्या लागतच. शेवटी शब्दावयव ज्या साध्या ध्वनीचे बनलेले असतात त्या साध्या ध्वनींच्या दर्शक अशा खुणा अस्तित्वात आल्या, म्हणजे मातृका म्हणून ज्यास संस्कृत शब्द आहे त्यांचा शोध झाला. ह्या मातृकांना म्हणजे मोजक्या विवक्षित खुणांना संस्कृतांत अक्षरे म्हणजे न बदलणा-या कायमच्या खुणा असे अन्वर्थक नांव पडले. मूळाक्षरांचा शोध हा असा पायरीपायरीने व बहुत प्रयासाने लागलेला आहे, एकदम नव्याने कोणी निर्माण केला असा अर्थ नाही. मूलाक्षरे ही अगदी साध्या अत्यंत पृथक्कृत ध्वनीची तेवढी दर्शक आहेत, वस्तू किंवा कल्पना किंवा शब्द यांची दर्शक नाहीत. चित्रावरून अक्षरापर्यंत येता येता, वस्तू व कल्पना यांना अजिबात काट मिळून फक्त साधा पृथक्कृत ध्वनी तेवढा राहिला.