Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
७. चित्रलिपीचा उदय
सुट्या ध्वनिसाधनाने तीन बाबींचा बोध होतो : (१) बाह्य वस्तु , (२) त्या वस्तूची मनातील कल्पना आणि (३) बाह्य वस्तू व आंतर कल्पना यांचा दर्शक स्वतः शब्द. प्राथमिक मनुष्य चित्राने प्रथम बाह्य वस्तू दाखवू लागला. मग त्या वस्तूला नाव म्हणजे शब्द म्हणजे ध्वनी त्याने दिला असो किंवा नसो. कालांतराने त्याच्या असे लक्षात आले की, चित्र जी वस्तू दर्शविते त्या वस्तूचा जो ध्वनी त्या ध्वनीचेही दर्शक चित्र होऊ शकेल. एथपासून चित्र ध्वनीचे म्हणजे वस्तुदर्शक शब्दाचे दर्शक झाले. घोड्याचे चित्र घोडा या वस्तूचे जसे दर्शक तसेच घोडा या शब्दाचे दर्शक झाले. पुढे असे सुचले की घोड्याचा संबंध सगळा आकार काढण्यापेक्षा नुसता घोड्याचा मुखवटा काढला तरी तेवढा मुखवटाच घोडा शब्दाचा दर्शक होऊ शकेल. ह्या युक्तीने चित्रानी शब्द दर्शविण्याला उघडच जास्त सोईचे झाले. चित्रलेखनाने वस्तूही ध्यानात येई व शब्दही ध्यानात येई. चित्रलेखनात शब्दांचे समास देखील दाखविता येत. तडागांतर्गत मच्छः ह्या शब्दसमासाचा किंवा कल्पनासमासाचा चित्रसमास तळ्याच्या चित्रात माशाचे चित्र काढून दाखविला जाई. एणेप्रमाणे चित्रलेखनाची कला अस्तित्वात आली.