Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
प्रथम मिश्र व नंतर साधे, ही परंपरा चित्रीकरणात जशी दिसते तशी ध्वनीकरणांतही दिसते. पशुपक्ष्यादी प्राणी एकेक सुटा ध्वनी करींत नाहीत, अनेकध्वनिसंवलित ध्वनिपरंपरा करतात. ही ध्वनिपरंपरा मनुष्याच्या कानावर पडते व तिचे अनुकरण ध्वनिपरंपरेने मुखद्वारा साधण्याचा प्रयत्न तो प्रथम करतो आणि नंतर त्या मिश्र ध्वनिपरंपरेतील एखाद्या सुट्या ध्वनीची अनुकरणार्थ निवड करतो. मिश्रांतून सुट्याचा उदय होण्याला किती कालावधी लागला असेल याची कल्पनाच करावी. मिश्र चित्रांतून सुट्या चित्रावर यावयाचा काल व मिश्र ध्वनींतून सुट्या ध्वनीच्या अनुकरणावर यावयाचा काल एक होय. मिश्र ध्वनीवरून व मिश्र चित्रावरून सुट्या ध्वनीवर व सुट्या चित्रावर येण्याच्या यातना भोगताना, प्राथमिक मनुष्य फारच गडबडला, गोंधळला, घुटमळला व भांबावला असेल. स्पानिश घोडेस्वार पाहून घोडे आणि स्वार ह्या दोन वस्तू एकच असाव्या हा जसा गोंधळ अमेरिकन इंडियनांचा प्रथमदर्शनी झाला व नंतर कालांतराने घोड्याचे स्वारापासून त्यांनी पृथक्करण केले, किंवा पाण्याचा थेंब पाहून तो अविभाज्य द्रव्य असावा अशी भ्रामक समजूत अनेक युगे चालून नंतर हैड्रोजन व आक्सिजन ह्या दोन द्रव्यांत त्याचे रसज्ञांनी पृथक्करण जसे नुकते परवा केले आणि हे पृथक्करण झाल्यावर जो हिरमुसलेपणा, अचंबा व हर्ष इंडियनांना व रसज्ञांना झाला तोच हिरमुसलेपणा, आचंबा व हर्ष मिश्र चित्रावरून व मिश्र ध्वनीवरून सुट्या चित्रांवर वे सुट्या ध्वनीवर येताना प्राथमिक मनुष्याला झाला.