Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

६. चित्रांचे व ध्वनींचे पृथक्करण

शब्दसाधनाला फक्त तोंड व कान ही दोन इंद्रिये लागतात. चित्रसाधनाला हात व डोळे ही दोन इंद्रिये लागून शिवाय एखादा चित्रक्षम बाह्य पदार्थ लागतो. शब्दसाधन अंधारात व उजेडात सारखेच उपयोगी पडते, परंतु गैरहजर माणसाला निरुपयोगी असते. जणू काय, चित्रसाधन गैरहजर माणसाच्याच करिता प्राथमिक मनुष्याने निर्माण केले. पहिल्या वस्तूचा कालांतराने स्वतःला किंवा इतरांना पुनः पुनः अनुभव आणून देण्यास चित्रकलेचे हे साधन प्राथमिक मनुष्याला फारच साहाय्यक झाले असावे. इतके की चित्राने तो निरोपही पाठवीत असावा. ह्या कलेचा जसजसा जास्त अनुभव येत चालला तसतशा त्यात सुधारणा होत गेल्या. फळ्यांवर किंव भूर्जपत्रांवर महत्त्वाच्या प्रसंगाची किंवा वीरांची चित्रे काढून ती गोत्रांतील आसपास जवळ दूर राहणा-या मनुष्यांस दाखवीत हिंडणारे वक्ते उत्पन्न झाले व चित्रांच्या अनुषंगाने रसभरित कथा करू लागले, आपल्याकडे निरक्षर लोकांत चित्रकथी हा धंदा अद्यापही करतात. ही चित्रकथकांची संस्था अत्यंत जुनी आहे, इतकी जुनी की वेदादिग्रंथ तिच्या मानाने अत्यंत अर्वाचीन समजावे लागतात. ऋग्वेदांत चित्र हा शब्द येतो व त्याचा अर्थ आश्चर्यवत् पहाणे असा करतात. धातुपाठकार चित्रीकरण व कदाचित् दर्शन असे दोन अर्थ चित्रधातूचे देतो. ऐतिहासिक दृष्ट्या पहाता चित्रीकरण हा अर्थ जुना धरावा असे मत होणे रास्त आहे. चित् हा प्राथमिक अवस्थेतील अत्यंत जुना धातू. त्यापासून संज्ञा ज्या वस्तूची झाली ती वस्तू बाह्य पदार्थावर रेखाटणे या क्रियेला चित्र् हा शब्द लावू लागले. मन् विचार करणे यापासून दुस-याच्या हृपटावर तो विचार काढणे याला मंत्र हा शब्द, किंवा तन् पसरणे पासून दुस-यावर हुकुमत पसरणे या अर्थी तंत्र हा शब्द, याच मासल्याचे आहेत. चित्र, मंत्र, तंत्र हे शब्द चित्, मन् तन् या शब्दांहून अर्वाचीन. येणेप्रमाणे चित्रीकरणाची ही कला वैदिक लोकांच्या पूर्वजांत अती जुनी आहे व विचार प्रगट करण्याचे एक साधन म्हणून मुख्यतः ती प्रथम अस्तित्वांत आली. शब्दसाधन व चित्रसाधन यांमध्ये दुसरा फरक असा आहे की ध्वनीचे अनुकरण शब्दसाधन करते व आकृतीचे अनुकरण चित्र करते. आकृती जशी दिसते तशी मनुष्य डोळयाने ग्रहण करतो. सृष्टीत आकृत्या बहुत मिश्र असतात, साध्या नसतात. तळ्यावरील झाडावर हातात दगड घेऊन उभ्या राहिलेल्या माकडाने चोचीत सर्प धरणारी घार मारिली, ही सर्व मिश्र अवस्था माणूस एकदम पहातो व तिचे मिश्र चित्र प्रथमतः काढतो. नंतर बहुत कालांतराने मिश्र अवस्थेतील एक एक बाब तो पृथक् करावयाला शिकतो.