Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
मूळ धातू आपण ब्रू धरला आहे. कारण ब्रूव:, ब्रू : ही रूपे अंगाची काही एक विकृती न होता व अन्त्याला काही एक विकरण न होता ज्याअर्थी बनतात, त्या अर्थी ब्रू हे मूळ अंग व धातू समजणे रास्त आहे. ब्रो, ब्रव व ब्रवी, या तीन रूपात अंगाची विकृती झालेली आहे, सबब ही रूपे यङ्लुकातून आद्य वो चा लोप होऊन आलेलीं समजणे युक्त आहे.
ब्रू पांणिनीच्या आर्धधातुकात चालत नाही. शिवाय लटांत आह, आहतु: इत्यादी पाचच रूपे विकल्पाने ब्रू बदला योजिली जातात. या दोन्ही बाबींचे कारण पुढे सांगू.
अस् : ब्रू प्रमाणे हाही धातू अर्धवट आहे, व्यंग आहे, म्हणजे आर्धधातुकात चालत नाही. याची तीन अंगे आढळतात १) अस्, २) स् ३) ए पैकी अस् हे साधे अंग आहे. एधि हे जुनाट यङ्लक् चे रूप आहे. अस् ची एस्, एस्मि, एस्व:, एस्म: एधि इत्यादी रूपे होत. पैकी एधि हे रूप वैदिक भाषेत शिल्लक राहिले. आयुष्मान् एधि देवदत्त या प्रत्यभिवादनातील एधि रूप मूळचे साधे नाही. भृशार्थ दाखविणारे यङ्लुक चे आहे. ग्रीक, ल्याटिन लिध्वेनियम्. भाषांत एस् असेच अंग आहे. मूळ साधा धातू अस्, त्याचे यङ्लुक एस् झाल्यावर ग्रीक, रो न इत्यादी लोक ते एस् अंग घेऊन पश्चिमदिशेकडे पसरले. स्व: या रूपात अस् तील अल्लोप का व्हावा? अल्लोप होतो म्हणून पाणिनी सांगतो. परंतु का होतो ते कळल्याशिवाय समाधान होत नाही. अस्मि, अस्वक:, अस्म: ही रूपे जशी उच्चारता येतात, तशीच स्मि, स्व:, स्म: ही रूपे उच्चारता येतात. सबब उच्चारसौकर्यार्थ स्व:, स्म: ही अनत् रूपे बनविलेली नाहीत. तसेच, व: किंवा म: किंवा स्थ: किंवा अन्ति किंवा यात् किंवा ईय या प्रत्ययांमागे अस् चा स् व्हावा असा कोणता मंत्र या प्रत्ययात आहे? संति, सीय्, स्यात् प्रमाणेच असंति, असौय, अस्यात् ही रूपे कानाला गोड लागतात. इतकच नव्हे, तर असन्ति हे रूप पूर्ववैदिक भाषात होते व मराठीत त्याचा अपभ्रंश असत हे रूप आहे. मग पाणिनीय संस्कृतातच सन्ति असे अनत् रूप का व्हावे? तर पूर्ववैदिक भाषात अस् व स् असे दोन स्वतंत्र धातू होते आणि पोट भाषांचे सिंधुनदावर व भारतवर्षात जेव्हा मिश्रण झाले तेव्हा दोन्ही भाषांतील रूपे रूपावळीत आली, इतकेच नव्हे तर एस् या अभ्यस्त धातूचेही रूप रूपावलीत शिरले.