Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
गोपायति हे क्रियापद भ्वादिगणात आले आहे. धूप:, विच्छ: व पण: किंवा पन: या शब्दांपासून धृपायति, विच्छायति, पणायति व पनायति ही क्रियापदे भ्वादिगणात शिरली आहेत. णिङ् लागून काम पासून कामयते झालेले आहे. ऋतींङ् पासून ऋतीयते निघाले आहे. हे नामधातू असून पाणिनीने यांना भ्वादिगणात का गोविले? तर त्याने स्वत: जी परिभाषा व शास्त्ररचना केली तीत अन्योन्य दोषांचा परिहार होऊन हे धातू इतरत्र कोठे नीट बसतना, सबब भ्वादिगणात त्यांची स्थापना करून आणि शास्त्र व परिभाषा यांना जुळेलसे वर्गीकरण या धातूंचे करून सर्वत्र ठाकठिक केली. इतिहासदृष्ट्या हे नामधातू आहेत हे आपणास स्वच्छ दिसत आहे. सबब शास्त्रकाराच्या ठाकठिकेला एकीकडे ठेवून, या धातूंची नामधातूंत गणना करण्यास आपणास कोणतीच हरकत नाही.
भ्वादिगणात पूर्ववैदिक यङ्लुक् ची, यङ्चीं व सनन्ताची संक्षिप्त किंवा सबंध रूपे कसकशी आली त्याचे विवेचन येथपर्यंत केले. आता भ्वादिगणात येणाऱ्या दुसऱ्याच प्रकारच्या एका आदेशाचा ऊहापोह करतो. सृ धातृबद्दल धाव् किंवा धौ आदेश पाणिनीने सांगितला आहे. गम् चे गच्छ् होणे किंवा मृज्चे मार्ज् होणे किंवा ष्ठिव् चे ष्ठीव् होणे या होण्यात प्रकृतीचा विकृतीशी काही ना काही तरी दाट संबंध असलेला दृष्टीस पडतो, अगदी अजिबात ताटातूट झालेली आढळत नाही. परंतु सृ चे धौ होण्यात प्रकृती जी सृ तिची विकृती जो धौ तिच्याशी बादरायण संबंधही राहिलेला नाही. शीघ्रगती दाखवावयाची असेल तेव्हा सृ च्या बदला घौ ह्न धाव् हा आदेश येतो म्हणजे सृ चा सबंध नाश होतो. हा प्रकार काय आहे? सार्वधातूकांतून सृ अजिबात नाहीसाही झालेला नाही ह्न सरति हे रूप सार्वधातुकात भ्वादिगणांतर्गत आहे शिवाय जुहोत्यादि अभ्यस्त गणात ससर्ति असे रूप आहेच. मग धौ हा आदेश पाणिनी काय म्हणून सांगतो? सृ चे यङ्लुक् सर्सर्ति, सरौसर्ति, सर्सरीति इत्यादी होते. शीघ्रगती व भृशार्थ दाखवावयाचा असेल तेव्हा ही यङ्लुक् ची रूपे योजीत असत. मग, सृ च्या बदली धौ हा आदेश पाणिनी काय म्हणून सांगतो? याला उत्तर एवढेच की, सरति हे यङ्लुक च्या सर्सर् रूपाचा संक्षेप असून, पाणिनीय भाषेत अतिपरिचयाने त्याचा भृशार्थ नाहीसा होऊन, ते फक्त साध्या गतीचे दर्शक झाले, तेव्हा शीघ्रगती दर्शविण्याकरिता धाव् या धातूचा भाषेत सरसहा उपयोग होऊ लागला. आर्धधातुकांत सृ हेच अंग राहिले, परंतु सार्वधातुकात शीघ्रगती दाखविण्यास सृ ऐवजीं धाव् चा उपयोग अनन्यत्वे करून झाला. हा जो बोलण्यात प्रघात पडला तो पाणिनी नमूद करतो. धाव् रूप सृ पासून वाटेल ती जादू केली तत्रापि निघणे अशक्य आहे. अशी जेथे जेथे कुंठित स्थिती येत्ये तेथे तेथे पाणिनी आदेश सांगतो. पाणिनीने आदेश सांगितला म्हणजे समजावे की भाषेचे काहीतरी गुह्य येथे लिकत आहे. अन्त्य स्वराच्या व उपान्त्य ऱ्हस्व स्वराच्या स्थानी गुणादेश होतो हे पाणिनीने सांगितल्याबरोबर पूर्ववैदिक भाषातील अभ्यस्त धातूंचे हे भ्वादिगणातील धातूसंक्षेप आहेत हे गुह्य बाहेर पडते. गम्, यम्, ऋ यांच्या स्थानी गच्छ्, यच्छ्, ऋच्छ् हे आदेश पाणिनीने सांगितल्याबरोबर संशोधक जागा होऊन पूर्ववैदिक भाषातील सनन्त धातूकडे धांव घेतो व त्या सनन्त धातूंचे गच्छ इत्यादी अपभ्रंश आहेत हे गुह्य उजेडात आणतो. दा स्थानी यच्छ्, दृश् स्थानी पश्य् व सृ स्थानी धौ आदेश पाणिनीने सांगितल्याबरोबर व्यवहारात त्याकाळी कोणते धातू लोप पावून त्यांच्या स्थानी कोणते धातू प्रस्थापित झाले आहेत ते मनोरंजक रहस्य संशोधकापुढे घेतलेले सोंग टाकून देऊन स्वस्वरूपाने उभे रहाते.