Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
शी : सार्वधातुक व आर्धधातुक प्रत्यय पुढे असता ज्या अर्थी ई चा गुण होतो त्या अर्थी शये, शयीय ही रूपे ज्या शे या अंगाची होतात ते अंग साधे नव्हे, मूळचे अभ्यस्त आहे, हे सांगावयाला नकोच. प्रश्न एवढाच की अभ्यास कोणत्या प्रकारचा आहे, यङ् चा आहे की यङ्लुक चा आहे की लिट् चा आहे, की चवथ्या एखाद्या निराळ्याच प्रकारचा आहे? प्रश्न सोडविण्यास एक गमक आहे. शी ची शेरते, अशेरत, शेरताम्, शयीरन् व शिश्यिरे अशी रूपे लट्, लङ्, लोट, लिङ् व लिट् या पाच लकारांत येतात. या पाची रूपांतर येतो हा कोठला? याचा उगम काय? र् नसता तर शयते, अशयत, शयताम् अशी रूपे झाली असती. लिङ् चे शयीरन् व लिट् चे शिश्यिरे ही दोन रूपे सर्वच आत्मनेपदी धातूंच्या रूपांसारखी असल्यामुळे, त्यापासून र् चा उगम कळण्यास मार्ग नाही; परंतु संस्कृतात शी हा धातू असा एक आहे की ज्याच्या लट्, लङ् व लोट, या तीन लकारांत र् आढळतो. संस्कृत भाषेतील इतर कोणत्याही धातूच्या लटांत, लङांत किंवा लोटांत र् भेटत नाही आणि या एकट्याच धातूच्या रूपात आढळतो याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच की या धातूला प्रथमपुरुषानेकवचनी लागणाऱ्या प्रत्ययांतील रुडागम अत्यंत जुनाटांतला जुनाट आगम आहे व अशा अत्यंत जुनाट काळी शी धातू होता व त्याची शेरते शिश्यिरे वगैरे रूपे वैदिक भाषेंत अवशेष म्हणून राहिली. अते, अत, अताम्, अन् यांच्या ऐवजी येणारे रते, रत, रताम्, रन्क हे प्रत्यय आहेत. अर्थात र चा अर्थ बहुवचन आहे यात संशय नाही. ते एकवचन आणि अते व रते बहुवचन दाखवितात. पैकी लटांतून लङांतून लुङांतुन व लोटांतुन हा रुडगम लोप पावला. परंतु लिटांत व लिङांत आत्मनेपदीं हा रडागम ज्याअर्थी आहे त्याअर्थी लिट् व लिङ् हे लकार जुनाटांत जुनाट आहेत हे उघड आहे. पाणिनी सांगतो की वैदिक भाषेत लिट् वर्तमानकाळही दाखवितो यात काही नवल नाही. पूर्ववैदिकभाषात लिट् वर्तमानकाळच दाखवीत असे. इरे हा प्रत्यय वैदिक भाषेंत वर्तमानकाळी लागल्याचे उदाहरण म्हणजे विश्रृण्विरे या रूपाचे. श्नु हे विकरण सार्वधातुकाचे दर्शक आहे. ते श्रु धातुला लागून इरे हा प्रत्यय लागलेला आहे. विश्रुण्विरे म्हणजे विश्रुण्वन्ति असे दिसते की एकेकाळी एका पूर्ववैदिकभाषेत प्रथमपुरुषानेकवचनी सर्व लकारांतील प्रत्यय रुडिवशिष्ट असत. पुढे भाषांचे जेव्हा मिश्रण झाले व वैदिकभाषा जन्मास आली तेव्हा तीत लिट् लिङ् व शी वगैरे काही थोडे धातु यातच तेवढा रुट् अवशिष्ट राहिला. छंदसि उभयथा, छंदसि बहुलं, छंदसि अनेकचा इत्यादी रडगाणे पाणिनी अशा जुनाट ठिकाणी गातो ते रास्तच आहे. मध्ये च रुट् कोठून येतो, विश्रृण्विरे हे बंड काय आहे इत्यादी आश्चर्यजनक प्रश्न त्या विख्यात वैय्याकरणाच्या डोक्यात आले व ते न सोडविता वस्तुस्थिती जशीची तशी त्याने नमूद करून ठेवली.