Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना
मराठी धातुकोश
शास्त्राची चर्चा करताना किंवा तद्विषयक ग्रंथाची पहाणी करताना, दुरभिमान, मत्सर, असूया इत्यादि भावनांना जागा देणे योग्य नसते, तसेच शास्त्रशुद्ध नसते. पण राजवाडे यांच्या बुद्धितेजाने व ज्ञानसंपन्नतेने जे दिपून गेले ते वरील अनेक मानसिक रोगानी पछाडले गेले होते. त्यांच्या मरणोत्तर त्यानी रचलेल्या मराठी धातुकोशाला मारण्याचा जो काही लोकांनी प्रयत्न केला त्याची आठवण ठेवणे जरूर आहे. पाणिनीने वाटल्यास संस्कृतचा धातुपाठ लिहावा. ज्ञानकोशाची रचना करताना डॉ. केतकरांचे व त्यांच्या सहायकांच्या नाकी नव आले व शेवटी ते दारिद्रात मेले. असे असता स्वतःच्या एकटयाच्या मेहनतीवर मराठी धातुपाठ तयार करणारा हा प्रतिपाणिनी कोण अशीही मत्सरग्रस्त पृच्छा झाली. विशेष म्हणजे पाणिनीच्या धातुपाठांची संख्या दोन हजारापर्यंत आहे तर राजवाडे यांच्या मराठी धातुपाठांची संख्या जवळजवळ सोळा हजार भरली. कोणतीही कमिटी न करता किंवा सरकारदरबारीच्या लाखोंच्या देणग्या न मिळता या फाटक्या मनुष्याने एकटयाच्या विद्वत्तेवर एवढा मोठा मराठी धातुपाठ करणे शक्यच नाही व केलाच असला तर तो रद्दीमय असावा हे नक्कीच, तेव्हा तो टाकून द्यावा अशीही काही विद्वानात बोलवा झाली होती. पण शेवटी एक कमिटी नेमूने जांच-पडताळा होऊन हा खरोखरच धातुपाठ आहे असे सिद्ध झाले. शेवटी श्री. कृ. पां. कुलकर्णी या विद्वान गृहस्थांनी तो संपादन केला व धुळ्याच्या राजवाडे संशोधन मंडळाने छापून प्रसिद्ध केला ही एक ऐतिहासिक व अभिनंदनीय गोष्ट घडली.
पण हे काम अद्याप संपूर्ण झालेले नाही. धातु देताना पूर्ववैदिक, वैदिक, पाणिनीय संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश व चालू मराठी इतक्या भिन्नभिन्न स्वरूपात हे धातु कसे आढळतात व त्यांचा वाङ्मयीन वापर कसा झाला व स्थित्यंतरे कशी झाली एवढा मोठा प्रपंच दाखविण्याचा राजवाडे यांचा बेत होता; पण ते काम पूर्ण करण्यास आणि एकट्याच्याने करण्यास त्यांना वेळ मिळाला नाही. आता हे काम कोणते भाषाशास्त्रज्ञ अंगावर घेतील ते पाहायचे. फडतूस ग्रंथासाठी लाखोंची अनुदाने देणा-या आमच्या सरकारला या ग्रंथाची महती काय हे समजायला किती वर्षे जावी लागतील किंवा स्थित्यंतरे होतील कुणास ठाऊक ?
या विषयाचे सामाजिक महत्त्व समजावे म्हणून श्री. कुलकर्णी यांच्या प्रस्तावनेतील एक विधान येथे देत आहे. " एखादा समाज सुधारणेच्या कोणत्या अवस्थेत आहे. हे पहावयाचे झाले तर त्या समाजाची भाषा पहावी. त्यातही पुनः तिचा शब्दसमूह पहावा, त्यातही पुनः तिचा धातुपाठ पहावा. अशा रीतीने धातुपाठाचे मानवशास्त्रात किती महत्त्व आहे हे कळून येईल.” [" राजवाडे मराठी धातुकोश प्रस्तावना" पान ११ ].
अशा या मराठी धातुपाठाची रचना करणा-या आचार्याची महती वर्णन करावी तितकी थोडीच. राजवाडे यांचा स्वभाव, चरित्र, विद्वत्ता, विचारपद्धती यांचे वर्णन करायचे तर धातूंना जे सूत्र लावले आहे तेच त्यांना लावावे लागेल. सतत पुरोगामी गतिमानता हाच त्यात स्थायीभाव होता. "गत्यार्थास्तेज्ञानार्थाः"