Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना

इतिहासदृष्टीची गरुडझेप

राजवाड्यांच्या इतिहासदृष्टीची गरुडझेप इतकी मोठी होती की पाणिनीच्या व्याकरणाचीही फोड अथवा विवरण करताना त्यांना विकासक्षम समाज व विकासबद्धतेच्या पाय-या- पाय-याने परिवर्तित होणारा माणूस दिसत असे. त्यांच्या सगळ्या कार्याचे ध्येय व केंद्रबिंदू माणूस हा असे. त्यांचे यमन, संवर्धन, धनसंपादन, समाजविभाजन, व्यक्ती, कुटुंब व समूहसंबंधांचे शास्त्रशुद्ध वाचन करणे त्याचेच त्यांना वेड असे. पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये अस्मद्-युष्मद् ची रूपे करताना सात विभक्त्यांची एकवीस रूपे साधण्यासाठी त्याला तेवीस सूत्रे रचावी लागली (' संस्कृत भाषेचा उलगडा' पान ६२); कारण पाणिनीला पूर्वसमाजाच्या मिश्रणाचे व समन्वयाच्या घटनेचे ज्ञान पाहिजे तितके नव्हते असे राजवाड्यांनी म्हटल्यामुळे अनेक व्याकरणशास्त्री त्यांच्यावर उखडले. अनेकांनी राजवाडे-खंडनाचे लेख लिहिले आणि प्रश्न विचारला की व्याकरणाचा आणि समाजशास्राचा संबंध काय ? एका विद्वानाने तर राजवाड्यांना पाणिनी कळला नाही; कारण अमेरिकन व जर्मन भाषाशास्त्रज्ञांनी व वैय्याकरणानी तयार केलेल्या नव्या शास्त्राची त्यांना माहिती नव्हती असे म्हटले ! अशा विद्वानांची ज्ञानसंपादनाची पिल्ले "अन्यैद्विजैः परभृताः खलु पोषयन्ति " असे म्हटल्यास कोणी राग मानू नये. येथे हे लक्षात ठेवायला पाहिजे की राजवाड्यांना पाणिनीबद्दल अत्यंत आदर होता व त्याला व्याकरणाचा "भगवान सूर्य" ही त्यांनी म्हटलेले आहे. एका व्याकरणसूर्याने दुस-या व्याकरणसूर्याशी भांडणे शोभते तरी. परंतु परभृत विद्यासंपन्न खद्योतानी या दोन सूर्यांच्या भांडणात पडून स्वतःला भस्मसात् करून का घ्यावे ?

"संस्कृत भाषेचा उलगडा" या ग्रंथातील अस्मद्-युष्मद्चा ऊहापोह, नपुसकलिंगी शब्दातील म् व इ प्रत्यय कुठून आले याची उपपत्ती सांगताना राजवाडे म्हणतातः रानटी आर्यांपैकी एक समाज एक ही संख्या स्वतः जो हृम् म्हणजे आपण त्याने दाखवी व दोन ही संख्या निराळा जो त्वि त्याने दाखवी. म् व हे प्रत्ययांची वचने दाखविणारा समाज कोकण्यांच्याप्रमाणे किंवा फ्रेंचांच्याप्रमाणे किंवा डोंगरी भिल्लांच्याप्रमाणे आपली सर्व बोली नाकातून अनुनासिक बोले. या अनुनासिकप्रधान समाजाचा निरनुनासिक समाजाशी जेव्हा मिलाफ झाला तेव्हा नाकातून अनुनासिक उच्चार करणाच्या समाजाचे उच्चार पेद्रू ठरून त्यांच्या शब्दांची व प्रत्ययाची नेमणूक नपुंसक खात्यात झाली व केवळ पुल्लिंगी बोलणा-या समाजाच्या बोलण्यात पुं व नपुं अशी द्विलिंगी भाषा येऊ लागली. संस्कृत पाणिनीय व वैदिक भाषेत नपुंसकलिंगाच्या प्रवेशाची ही अशी हकीकत आहे.''

(“ संस्कृत भाषेचा उलगडा ' पान ६१ )

महाराष्ट्रात आता यो घडीला कोकणी-मराठीचा जो वाद चालविला जात आहे तसाच पूर्वी वैदिक व पाणिनीय अशा दोन समाजांत होऊन त्यातून ही तडजोड निघाली असे राजवाड्यांनी म्हटले तर जर्मन-अमेरिकन पदवीधारक विद्वानांना राग कां यावा हे समजत नाही.

खरे म्हणजे व्याकरण हें मनुष्यप्राण्याच्या भाषेचे शास्त्र आहे. मनुष्य हा एक प्राणी आहे पण त्याला भाषा आली म्हणून तो इतरांहून निराळा झाला असे महाभारतातला एक शृगाल एका ब्राह्मणाला सांगतो. म्हणून व्याकरणाची फोड करताना समाजशास्त्राचा वापर राजवाडे शास्त्रशुद्ध रीतीने करून जे पाणिनीला उकलले नाही त्याची उकल करतात. याबाबत एके ठिकाणी ते जे लिहितात ते लक्षात ठेवणे अत्यंत जरूर आहे म्हणून त्याचा उतारा इथे देणे आवश्यक वाटते.