Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना
हा नवा वर्गबद्ध किंवा नवशूद्र नववैश्य यावर आधारित वर्गीय समाज निर्माण झाला, व प्रथम त्रैवर्णिक होता तो चातुर्वर्णिक झाला. वर्ण व जाति यांचा पूर्वीचा सामाजिक सरमिसळ संबंध बदलुन संकराची प्रक्रिया निषिद्ध मानली जाऊ लागली. एवढेच नव्हे तर पूर्वीचे जे समसमा शूद्र त्यामध्ये दोन भेद पडले. एकाचे नाव पडले अवसित शूद्र व दुस-याचे नाव पडले निरवसित शूद्र. अवसित तर अद्याप आर्यांच्या वर्णजातींच्या सत्तेमध्येच बसायला तयार नव्हता. तो समाजबाह्य ग्रामसंस्थाबाहय, होता; कारण त्याचा स्वतंत्र समाजच इतका शक्तिमान होता की तो आर्यांच्या चातुर्वर्ण्याच्या श्रमविभागणीत बसायला तयारच नव्हता.
त्याचबरोबर निरवसित शूद्र ही आपापल्या कर्मकौशल्याच्या बळावर ब्राह्मणाशी, क्षत्रियांशी लग्न लावून त्यांच्याच घरात मळ्यावर अथवा खळ्यावर काम करून ब्राह्मण-क्षत्रियांच्या संसारात व गोतवळ्यात राहून वरच्या वर्गामध्ये किंवा तत्समान स्थितीमधे उभा राहू लागला होता. एवढेच नव्हे तर संपत्तीच्या वाटणीमधे त्याचा हिस्साही ठेवला जात होता. ही हिस्सेवाटणी मनूला सुद्धा मानावी लागली हे त्याच्या स्मृतीमध्ये नमूद आहे.
पण हे थांबणार कुठे ? ही श्रमाची समाजविभागणी निरवसितांच्या आगमनाने व साहचर्याने बिघडू लागली. त्यात आणखी खाजगी मालमत्तेच्या वाढीने समाजामध्ये वर्णजाती व वर्गविग्रहाचे काहूर उत्पन्न झाले. ब्राह्मण-क्षत्रियांमध्ये कळपावरून, संपत्तीच्या वाटणीवरून युद्धे होऊ लागली. तेव्हा हे परस्थ “ अवसित ”, ज्यात नुसते शूद्रच नव्हते, त्यांची आर्य समाजात नव्या शास्त्रबंधनावर आधारलेली रचना करणे आवश्यक झाले. त्या प्रक्रियेमधूनच व संघर्षातून राज्यसंस्था निर्माण झाली व दंडधारी राज्ययंत्र अस्तित्वात आले. महाभारतातील उल्लेखिलेली " रक्तानुबंधी ” समाजरचना जाऊन राजदंडनियमनबद्ध प्रदेशानुबंधी समाज अथवा राज्य निर्माण झाले. या राज्यसंस्थेचे अनेक प्रकार होते; पण त्यामुळे संपत्तिसाधन, श्रमविभाजन व परस्पर-उत्पादन-संबंधांचे नियमन हे सोपे झाले. त्यामुळे प्रथम आर्य समाजाचा झपाट्याने विकास झाला. समाजविघातक संघर्षाला आळा बसला. ही प्रक्रिया ग्रीक समाजात कशी झाली व तिचे मूलभूत तत्त्व काय हे एंगल्सच्याच पुस्तकाने समजू लागते.
राजवाड्यांनी पुरुषसूक्ताची व निरनिराळ्या राज्यघटनांची जी फोड केली आहे तिला आपल्या देशातील इतिहासलेखनात जोड नाही. जायस्वाल यांनी आपल्या ग्रंथात हा विषय गणसंघरचना या सदरात घेतला आहे. पाणिनीकालींन राज्य-संस्थांच्या प्रकाराची वर्णनेही दिली आहेत. वार्तोपजीवीसंघ, आयुधोपजीवी संघ इत्यादी राज्यघटना यामध्ये प्राचीन हिंदुस्थानातील किंवा आर्यसमाजातील राज्यरचनेचा मोठा गंभीर व अर्थपूर्ण इतिहास आहे; परंतु आमच्या शिक्षणक्रमात किंवा ज्ञानार्जनात इंग्रज, फ्रेंच अमेरिकन व आता भारतीय घटनांची त्यांच्या उपसूचनांची चर्चाच काय ती केली जाते. एवढेच नव्हे तर खाजगी मालमत्तेची मालकी व वर्ण व जातिसंस्था प्राथमिक अवस्थांत असताना जेथे दमनधर्मी अथवा दंडधारी राज्ययंत्र नव्हते अशा समाजाची कल्पनाही आमच्या इतिहासाच्या शिकवणुकीत येत नाही. अर्थातच अशा शिक्षणावर राजवाडे किंवा कोसांबी किंवा जायस्वाल यांच्या व यांच्यावर शास्त्रशुद्ध कळस चढविणाच्या मार्क्स-एंगल्स यांच्या सिद्धान्ताचा काय प्रकाश पडणार ?