Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना

जातिसंस्थेच्या उत्पत्तीची, विकासाची व स्थैर्याची जी परंपरा राजवाडे यांनी वर्णन केली त्यामध्ये मुख्य बिंदू वृत्ती हा आहे. वृत्ती बांधून देणे म्हणजे काय हा खरा प्रश्न आहे. वृत्ति-सामर्थ्याच्या रचनेवर आधारलेला जो समाज तो जातिबद्ध समाज. जात आणि वृत्ती ही जोडी सा-या समाजरचनेची फ्रेम आहे. त्याचा मूळ पाया म्हणजे वृत्तिकाराला म्हणजे जाति कुटुंबाला गावाभोवती जमिनीचा एक भाग मिळे, शिवाय त्यांची समाजोपयोगी वस्तू उत्पन्न करण्याची हत्यारे असत. ती त्याच्याजवळ असत आणि त्यांच्या वापरातून म्हणजे त्याच्या श्रमातून त्याला इतर जातिवाचक समूहांच्या श्रमाचे फल गावांतर्गत देवघेवीत मिळे व त्यावर त्याचा संसार व त्या सर्व वर्णीयांचा व जातींचा समाज भ्रम किंवा कर्मविभागणीनुसार चाले. जमिनीचा हिस्सा व अवजारांचे अखंड सातत्य यानेच बांधलेल्या हिंदु-जाती हजारो वर्षे अभेद्य व इतिहासाच्या पुनरावृत्त्या करीत राहिल्या याचे मूलभूत विवरण मार्क्स-एंगल्सने केले आहे. याचीच वर्णनात्मक व समाजरचनावाचक मांडणी राजवाड्यांनी केली.

हे जरी खरे असले तरी समाजपरिवर्तनाचा हा अबाध्य व सनातन कायदा हाच हिंदू समाजाचा प्रेरक, पोषक व संरक्षक झाला आहे व तसाच तो राहावा व राहील अशी समजूत राजवाड्यांच्या मनात गम भरली होती. ही पद्धती आता नव्या उत्पादनतंत्रात बसत नाही, कारखानदारीत व त्यावर आधारलेल्या समाजात जातींना व जातिकर्माला जागा नाही एवढेच नव्हे तर त्या प्रगतीला मारक होतात व त्यांचे मरण समाजवादात संपूर्णपणे होणार हे त्यांच्या लक्षात येणे अशक्य झाले होते. म्हणून राजवाडे हे कर्मठ ब्राह्मण व इतर जातीद्वेषी अशी त्यांची ख्याती झाली. एवढ्या प्रचंड विचारशक्तीच्या व जुन्या सर्व शास्त्रांचा, रूढींचा, धर्मसमजुतींचा चेंदामेंदा करून त्याची ऐतिहासिक उत्पत्ती सांगणारा, परमेश्वरालाही न मानणारा, विचार आणि विकार प्रदर्शनाच्या साधनांची उत्क्रांती कशी झाली याचे क्रांतिगर्भ विवरण करणारा हा महान् शास्त्रज्ञ ऐतिहासिक भौतिकवादाचा मार्क्सवादी सिद्धान्तापर्यंत पोहोचू शकला नाही ही एक मोठी हिंदुस्थानच्या इतिहासाला हानिकारक अशी घटना घडली यात संशय नाही. हजारो जातींचे व धंद्यांचे श्रमजीवी लोक भांडवलदारी वर्गसमाजपरिवर्तनाच्या मुशीत जातिवृत्ती सोडून एकच वृत्तिबद्ध म्हणजे कामगारवर्ग कसे बनतात व वर्गयुद्ध करून समाजपरिवर्तन कसे करतात व समाजवादाचे नवे जग निर्माण करून शस्त्र, शास्त्र व वृत्ती यांचे नव्या पुरुषसूक्ताचे समाजवादी गणसंघ कसे रचतात याचा गंधही राजवाड्यांना लागला नाही. त्यामुळे त्यांच्या विवेचनामध्ये ते वर्णाभिमानी व जात्यभिमानी बनले. आदि व मध्ययुगीन समाजाचा भारतातील अखंडपणा, अलौकिकपणा, संततपणा पाहून त्यांचे लक्ष वर्णजातीपद्धतीवरेच खिळून बसले. इंग्रजानी आणलेल्या नव्या जातिविहीन कल्पना; समाजरचनेचा प्रचार व तसेच आपल्या देशातील जातिभेदाच्या व त्या नष्ट करण्याच्या चळवळीमध्ये स्वराज्यसाधन व राजकारण यांचा अभाव पाहून त्यांचे समाजशास्त्रीय सिद्धान्त कोंडीत सापडले; पण पूर्वीचा हिंदुसमाज हा एकवर्णी व जातिविहीन होता हेही त्यांना दिसत होते. त्याचे पुढे त्रैवर्णिक व नंतर शूद्रागमनाने, जातिरचनेने चातुर्वर्णिक व अनंत जातिबद्ध स्वरूप हे कसे झाले हेही त्यांनी पाहिले होते. तेव्हा हा जातीजातींच्या कलहात गुंतलेला समाज परत एकवर्णी होईल अशीही मांडणी करून त्यांनी वर्तमान कलहातून रस्ता काढण्याची कल्पना मांडली. पण ते कसे होणार हे त्यांना उमगेना. वर्ण व जातीच्या आवरणाखाली मूलभूत उत्पादन-वितरणक्रियेमध्ये मूलभूत ज्या शोषणकर्त्या वर्णजाति व शोषित वर्णजाति व त्यापासून निर्माण होणा-या राज्ययंत्र वगैरे सर्वांचे योग्य वर्णन व वाचन करूनही त्यांना उत्पादनाचे हत्यार व त्यातून निघणारे मनुष्यसमाजाचे विविध वर्गबंधनाचे ब्रह्मांड उमगण्याचा सिद्धान्त मिळाला नाही. हेगेलचा सिद्धान्त अपुरा पडतो म्हणून त्यानी रामदासांचा आधार घेतला. काही इंग्रज इतिहासशास्त्रज्ञांकडे जरा नजर टाकली पण मार्क्स-एंगल्स दिसला नाही.
म्हणून एकवर्णी समाज परत कसा होणार याचीही फोड जमली नाही. त्यांचे आयुष्य संपण्यापूर्वी समाजवादी रशियन क्रांती व सोविएट समाजाची आजची वर्गविहीन समाजवादी समाजाचे व नवमानवाचे दर्शन होण्याची संधी मिळाली नाही व त्यामुळे समाजकान्तीचे, विचारक्रान्तीचे व विचमिंथनाचे फळ त्यांना लाभले नाही.