Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना

अशा परिस्थितीत "हिस्टोरियन्स हिस्टरी ऑफ दि वर्ल्ड" या ग्रंथातील राजवंशांच्या जनसमूहांच्या नामावळ्या घेऊन राजवाडे यांनी "आमची पुराणे व असीरियातील नवे शोध" या लेखाने युरोपियन इतिहासकारांचे अज्ञान खोडून काढले व हिंदुस्थानच्या अतिप्राचीन इतिहासाचा एक प्रचंड व नावीन्यपूर्ण खंड उघडून दाखविला. तरीपण विष्णुपुराण व इतर आधार दाखवूनही आमचे तज्ज्ञ शिक्षणखाते या इतिहासाला आमच्या शिक्षणक्रमात जागा देत नाही. याचे कारण ते स्वतः जरी अज्ञान नसले तरी शिक्षणाचे तंत्र ठरविणारी नोकरशाही अद्याप अंधारात व युरोपीय तज्ज्ञजन्य कुहरातच अडकलेली दिसते.

मनुष्यसमाज निर्माण झाला तेव्हा समाज या संस्थेची रचना करणे, तिचे नियमशास्त्र तयार करणे हे अपरिहार्यत्वाने येतेच व तिथूनच समाजरचनेचे, कुटुंबरचनेचे, परस्परसंबंधांचे व नंतर राज्यसंस्थेच्या स्वरूपाचे व घटनेचे तंत्र किंवा शास्त्र सुरू होते. मूर्धाभिषिक्त दंडधारी राजा ज्यात नाही अशी गणराज्ये, वैराज्ये, द्वैराज्ये इत्यादी अनेक घटनांचे प्रकार आपल्या देशात झाले. आजची आपली राज्यघटना ही जणू काय अत्यंत अननुभूत व अपूर्व संस्था आपण निर्माण केली आहे व त्यात अनेक दुरुस्त्या करून काय नवे ब्रह्मांड निर्माण केले आहे असे अनभिज्ञ तरुण व वृद्धांना सांगणा-या मंत्रिगणाला सुचना करावीशी वाटते की चालू वर्गकलहात, धर्म व जातिकलहात आपण जी कामगिरी केली ती स्वागतार्ह आहे हे खरे असले तरी हजारो वर्षांपूर्वी सुरू झालेल्या व अनेक शतके टिकलेल्या राजसंघटनांचा जो इतिहास राजवाडे, जायस्वाल यांनी मांडला आहे तो लक्षात घेऊनच चालू परिस्थितीच्या अभिमानाची व कामगिरीची चौकट त्यात बसवून मगच ऐतिहासिक दृष्टीने तसेच योग्य अभिमानदृष्टीने वागावे. आमच्या राज्यकर्त्यांना हे इतिहासवाचन सक्तीचे करावे व वर्गात बसवून ( अत्यंत गुप्त कॅबिनेट चेंबरमध्ये का होईना ) त्यांची परीक्षा घ्यावी असे राजवाडे यांनी नक्की सुचविले असते. घटनाशास्त्राला ऐतिहासिक, जानपदिक व वर्गीय दृष्टिकोण दिल्यावाचून जनतेची त्याबाबतची मान्यता अथवा अभिमान अथवा समज ही कृत्रिम व ढोलकबाजीला मान तुकविणा-यासारखी होण्याचा धोका असतो. म्हणूनच आम्ही म्हणतो की राजवाडे, कोसांबी, जायस्वाल यांचे ग्रंथ वाचणे हे सर्वमान्य करून घेतले पाहिजे. तसेच त्याला एंगल्सची अखेर जोड दिली पाहिजे. हे शेवटचे विधान सध्या मान्य नसले तर तात्पुरते बाजूला ठेवावे; पण प्रथम ऐतिहासिक दृष्टीचा विकास करून घ्यावा. मग एंगल्सवर पोचणे आपोआपच येईल असा शब्द किंवा वाक्यप्रक्रियेतून समाजाचा इतिहास दाखविण्याची राजवाड्यांची दृष्टि किती सखोल व विशाल आहे याचे आणखी उदाहरण म्हणजे अभिवादन व प्रत्यभिवादनाच्या प्रकारांचा जो विकास व -हास झाला त्याची राधामाधवमधील चर्चा पहावी ( पान १३६-३७). पाणिनीकालीन अभिवादनाचा प्रकार, त्याच्यानंतर पाच सहाशे वर्षांनी झालेल्या कात्यायनाच्या सूत्रांतील बदललेला प्रकार आणि कात्यायनानंतर दोनशे वर्षांनी झालेल्या पतंजलीच्या सूत्रातला प्रकार या तिहींची तुलना करून स्त्रियांचा दर्जा कसकसा उतरत गेला व तो आणि वैश्य व काही ब्राह्मण सुदा शुद्रत्वापर्यंत कसे पोचले याची फोड राजवाडे करतात. त्या व्याकरणशास्त्राची व इतिहासशास्त्राची जी फोड त्यांनी केली त्याची महती अद्याप आपल्या इतिहासकारांना, भाषाशास्त्रज्ञांना व समाजसुधारकांना अवगत झालेली दिसत नाही. व्याकरणातून समाजाचा विकास अथवा हास पहाणे हे मोठे अवघड काम आहे. त्यासाठी राजवाडे-दृष्टीच लागते आणि अशी त्यांची थोरवी पहाण्यात विद्वानाना मत्सर न वाटून त्यांनी त्या थोरवीचा उपयोग आपल्या देशाचा, समाजाचा व वर्गाचा इतिहास लिहिण्यास उद्युक्त व्हावे म्हणजे त्याचा लाभ प्रगत जगालाही मिळेल.