Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना
"पण संकरज प्रजेची संख्या वाढून त्यांचे आपसातील मायेचे कौटुंबिक संबंध वाढता वाढता त्याची पित्याच्या वर्गात जाण्याची गती थांबली व संकर जाती स्वतःच्या संघटनेत, वृत्तीत व धंद्यात स्थिर झाल्या.
"ज्या समाजाची वृत्ती, फक्त बीजक्षेत्राचा व्यवहार त्या समाजातल्या समाजात होऊन जाते, अन्य कोणत्याही रीतीने होत नाही त्या समाजास जाती म्हणतात. जाती फक्त जन्माने प्राप्त होते. इतर कोणत्याही त-हेने प्राप्त होत नाही. जातिसंस्थेने एक कार्य अगदी बेमालूम होते ते हे की बीजक्षेत्राची शुद्धी परिपूर्ण राहते व जिवलगांची ताटातूट होत नाही. संकरांच्या वणन्नतीचा प्रश्न सोडविता सोडविता आर्यांना ही जातिसंस्था निर्माण करण्याची क्लुप्ती सुचलेली आहे. तीच क्लुप्ती एतद्देशज अनार्य समाजाची स्थापना ग्रामसंस्थांत करताना आर्यांनी अमलात आणली, त्या त्या अनार्य समाजांची आर्यांनी स्वतंत्र जात म्हणून गणना केली.
“संकरांची व्यवस्था करण्यात जातिसंस्थेची कल्पना सुचली आणि ती कल्पना आर्यांनी अनार्य समाजांना लावली. इतकेच नव्हे तर स्वतःच्या चातुर्वर्ण्य संस्थेलाही लाविली, संकरातून बीजक्षेत्र-शुद्धी झाल्यावर व्यक्तींना चातुर्वर्ण्यातील कोणत्याही मूळवर्णात परत जाता येत असे तसेच चातुर्वर्ण्यातील कोणत्याही खालच्या वर्णाच्या व्यक्तीला गुणकर्मांचा उत्कर्ष साधल्यास म्हणजे तपश्चर्या केल्यास ब्राह्मणवर्गात प्रविष्ट होता येत असे. जातिसंस्थेची कल्पना सुचल्यावर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चारी वर्णही जाती बनले. सध्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चार वर्ण असून शिवाय चार जातीही आहेत. खेरीज सुतार, चांभार, शूद्र, लोहार, सोनार वगैरे स्थिर झालेल्या संकर जातीही आहेत. शिवाय नाग, कोल, राक्षस वगैरे एतद्देशज अनार्यांच्या संस्कारापासून झालेल्या अंत्यज व बाह्य जाती झाल्या त्या वेगळ्याच.
"एतद्देशज अनार्य असोत की बहिर्देशज अनार्य असोत, हिंदुस्थानात त्यांना कायमचे रहायचे म्हणजे जात बनूनच हिंदुसमाज राहू देत असे. म्हणजे अनार्यबाह्य समाजाला जात बनवून त्याचा समावेश हिंदुसमाज आपल्यात करून घेत असे. जात बनल्याशिवाय नागरिकत्वाचे किंवा ग्रामस्थाचे हक्क मिळत नसत. म्हणजे स्थानिक स्वराज्याच्या व साम्राज्याच्या छत्राचा आश्रय मिळत नसे, हिंदुसमाजात बाह्यांचे राजकीय समावेशन जातीचे रूप घेतल्यानंतर होत असे. बाह्यजातिसंस्था झाले म्हणजे त्यांना त्यांच्या अनुरूप वृत्ती मिळून किंवा धंदा मिळून हिंदुसमाजात व हिंदुदेशात देशातील राज्यछत्राखाली सुखरूप राहता येत असे. अशी जाती देशात फार काल राहिली, येथील अभिजन बनली व हिंदुसमाजाचे सामान्य धर्म पाळू लागली म्हणजे त्या जातीला हिंदू हे अभिधान प्राप्त होई. नंतर त्या जातीचा जो देव असेल त्याची स्थापना हिंदूंच्या तेहतीस कोटी देवतामंडळात होऊन, पूर्ण हिंदुत्वाचा शिक्का त्या जातीवर कायमचा बसे.''