Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
९१. उत्तरहिंदुस्थानातून बौद्धक्रांतिकाली माहाराष्ट्रिकादि लोकांबरोबर आणिकही काही लोक दक्षिणेत उतरले. त्यांची नावे अशोकाने आपल्या शिलालेखात दिली आहेत. ते लोक म्हणजे भोज, पेतेनिक, सतियपुत, केरलपुत, पांड्य व चोल हे होत. पैकी भोज म्हणजे ऐतरेयब्राह्मणाच्या अडतिसाव्या अध्यायात 'दक्षिणस्यां दिशि ये के च सत्वतां राजानो भौज्यायैव ते अभिषिच्यंते भोजेति एनान् अभिषिक्तान् आचक्षते' म्हणून ज्यांचे वर्णन केले आहे ते लोक होत. कुरुपांचालाच्या दक्षिणेस जो मथुरा प्रांत आहे तो ह्या सत्वत् लोकांच्या भोज नावाच्या राजांचा देश होय. हे भोज लोक दक्षिणापथातील विदर्भदेशात वसाहत करून राहिले. म्हणजे विदर्भातील भोज लोक मथुरावृंदावनाकडील उत्तरहिंदुस्थानातील लोक होत हे स्पष्ट झाले. ह्या संस्कृत भोज शब्दाला स्वार्थक ल प्रत्यय लागून मराठी भोजले - भोसले हा सुप्रसिद्ध शब्द झाला. पेतेनिक म्हणजे प्रतिष्ठानक लोक मूळचे प्रयोगाच्या समोरील जुनाट प्रतिष्ठान शहरचे व प्रांतातले रहाणारे लोक. प्रयागाजवळच्या प्रतिष्ठान प्रांतातील ह्या लोकांनी दक्षिणेत गोदावरी - तीरी येऊन प्रतिष्ठान ऊर्फ पैठाण हा प्रांत व शहर स्थापून ह्या शहरात व प्रांतात वसती केली. म्हणजे हे प्रतिष्ठानकही लोक उत्तरहिंदुस्थानातील होत. सतियपुत म्हणजे सत्वत्पुत्र. मथुरावृंदावनप्रांतील भोज हे ज्या सत्वत् लोकांचे राजे त्या सत्वत् लोकांपासून सत्वत्पुत्रांची ऊर्फ सतियपुतांची उत्पत्ति झाली. ह्या सतियपुतांची वसती सावंतवाडी म्हणजे सत्वद्वाटिका प्रांतात होती. एवंच, हे सतियपुतही उत्तरेकडीलच लोक होत, सतियपुतांप्रमाणेच केरलपुतही उत्तरेकडूनच मलबारात कोंकणातून उतरले. कुरुदेशाच्या उत्तरेस अतिनिकट कुलिंद देश होता त्याच्या शेजारी केरल देश प्राचीनकाळी होता. केरलदेशच्या सुधार्मिक राजाचा पुत्र जो चंद्रहास याची कथा आबालवृद्धांत महशूर आहे. ह्या उत्तरहिंदुस्थानातील केरलदेशातून निघून केरलपुत ह्या लोकांनी दक्षिणेत मलबारकिना-यावर वसाहत केली व त्या वसाहतीला केरल हे नाव दिले. केरलाप्रमाणेच चोल हे उत्तरेकडील लोक होते. पैशाची भाषेच्या एका पोटभेदाला चूलिकापैशाची असे नाव आहे. ह्या सामासिक शब्दांतील चूलिका हा शब्द नि:संशय देशवाचक आहे. ह्या उत्तरेकडील चूलिका देशातील चौल ऊर्फ प्राकृत चोल, चोळ लोकांनी दक्षिणेत वसती करून आपल्या वसाहतीला चोल हे अभिधान दिले. पांड्य हे उत्तरहिंदुस्थानातील कुरुदेशाशेजारील पांडुराष्ट्रातील पांडु लोकांचे वंशज होत. कात्यायन पांडो ड्यूम ह्या वार्तिकांत ह्या पांडुदेशाचा उद्धार करतो. पांडुराष्ट्रातील पांडुलोकांचे वंशज जे पांड्य त्यांनी दक्षिणेत येऊन वसाहत केली व त्या वसाहतीला पांड्य हे नाव दिले. पांड्य, चोल, केरल, सत्वपुत्र, भोज, देतो, निक वगैरे लोकांच्या हकिकतीशी सध्या आपणास काही कर्तव्य नाही. फक्तराष्ट्रिक हे पद ज्यांच्या नावात येते त्या राष्ट्रिक, वैराष्ट्रिक व विशेषत: माहाराष्ट्रिक लोकांसंबंधाने आपणास येथे विचार कर्तव्य आहे.