Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

९२. ह्या माहाराष्ट्रिक लोकांना माहाराष्ट्रक ही म्हणत व असे दिसते की माहाराष्ट्रही म्हणत. राष्ट्रिक, वैराष्ट्रिक ह्या लोकांत वजनाने व कर्तबगारीने माहाराष्ट्र लोक प्रमुख असल्यामुळे, "न एषां ग्रामषो:" ह्या सूत्रात सांगितलेल्या रिवाजाप्रमाणे ह्या सा-यांना माहाराष्ट्रक अशी संज्ञा कालांतराने प्रचलित झाली. माहाराष्ट्रिकांना माहाराष्ट्रिन असेही नाव असे. माहाराष्ट्रिन् या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप माहाराष्ट्रिणी. माहाराष्ट्रिणी ह्या संस्कृत शब्दाचे प्राकृत रूप महारठिणी भाजे, बेडसे व कार्ले येथील काही शिलालेखात येते. तात्पर्य, माहाराष्ट्र, माहाराष्ट्रक, माहाराष्ट्रिक व महाराष्ट्रिन् अशा चार त-हांनी ह्या लोकांच्या नावाचा उच्चार होत असे. ह्यांच्या माहाराष्ट्रिन् या नावावरून ह्यांच्या स्त्रियांना जसे महाराष्ट्रिणी, महारठिणी हे नाव पडले, तसेच ह्यांच्या माहाराष्ट्र या नावावरून ह्यांच्या भाषेला माहाराष्ट्री असे प्रथम नाव पडले. माहाराष्ट्री ह्या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश मरहट्टी असा होऊन त्याचे पुन: संस्कृतीकरण महाराष्ट्री असे झाले. महाराष्ट्री असा उच्चार सर्व प्राकृत वैय्याकरण निरपवाद देतात. महाराष्ट्री भाषा बोलणारे हे माहाराष्ट्रिक लोक बौद्धक्रांतिकाली जेव्हा दक्षिणेत उतरले तेव्हा ह्यांची संस्कृती कोणत्या दर्जाची होती ते आता पाहू. ह्यांच्या संस्कृतीचे परीक्षण राजकीयदृष्ट्या, समाजदृष्ट्या व भाषादृष्ट्या अशा तीन दृष्ट्यांनी करता येण्यास साधने आहेत. महरट्ट ऊर्फ माहाराष्ट्रिक लोक चातुर्वर्ण्यबद्ध असून, पुरोहिताखेरीज त्यांचे एक पाऊलही पुढे पडत नसे. झल्ल, मल्ल, निच्छिवी, नट इत्यादीच्या सारखे ते सावित्रीपतीत व्रात्यही झालेले नव्हते व ओड्र, द्रविड, कांबोज इत्यादींच्याप्रमाणे ब्राह्मणादर्शनाने ते क्षुद्रही बनले नव्हते. उत्तर हिंदुस्थानातील व्रात्य व क्षुद्रप्राय अशा पाखंडमतानुयायी क्षत्रियांच्या जुलमाला कंटाळून ते दक्षिणेत आले होते. मातृसावर्ण्याचा कायदा पसार होण्याच्या पूर्वी त्यांच्यात क्षुद्रभार्योत्पन्न निकृष्ट क्षत्रियांची भरती इतर वर्णांच्या प्रमाणेच होऊन गेलेली होती; ती तो कायदा पसार झाल्यावर कायदेशीर रीतीने बंद झाली. परंतु बेकायदेशीर रीतीने चालू असली तत्रापि त्या बेकायदेशीर संबंधापासून होणा-या प्रजेच्या पृथक् जाति बनू लागल्यामुळे शुद्ध क्षत्रियत्वाला त्यापासून बट्टा लागण्याचा संभव नव्हता. माहाराष्ट्रिक आपली उपजीविका मगधात आयुधांवरती करीत म्हणजे ते आयुधोपजीवी ऊर्फ शस्रोपजीवी संघ होते. मगधातील महाराजांचे ते गण होते म्हणजे भाडोत्री सैनिक होते. ह्या शस्रोपजीवी संघात मूळ अशी चाल होती की गणांतील सर्व स्त्रिया गणांतील सर्व पुरुषांना सामान्य असत व ह्या गणांतील स्त्रियांना गणिका म्हणत. गणिका म्हणजे विश्वयोषिता, हा अर्वाचीन अर्थ इथे घ्यावयाचा नाही. गणिका म्हणजे गणांतील सर्वांना सामान्य असणा-या सर्व स्त्रिया एवढाच अर्थ येथे विवक्षित आहे. ह्या गणांतील गणांनी गणांतील स्त्रियांशी केलेल्या प्रणयविधीची वर्णने गाथासप्तशतींत आलेली आहेत. त्यावरून स्पष्ट दिसते की ह्या गणसंघात स्त्रियांचे दांपत्यनियमन विशेष दृढ नसून, बरेच सैल होते. ह्या स्त्रीपुरुषसंबंधांच्या बाबींत मगधातील जे महाराजशब्दधारी क्षत्रिय त्यांच्याहून हे माहाराष्ट्रिक गण बरेच प्राचीन म्हणजे मागासलेले होते. तथापि मगधातील शिष्य क्षत्रियांच्या व ब्राह्मणांच्या सान्निध्याने त्यांच्यातील स्त्रीपुरुषसंबंधांतील हे शैथिल्य आस्तेआस्ते क्षय पावून वैयक्तिक पतिपत्नीत्वाची चाल त्यांच्यात रुजत होती. माहाराष्ट्रिक लोक मूळचे इंद्र, अग्नि इत्यादींचे भक्त असून, बौद्धकाली जेव्हा शिव, विष्णु इत्यादी देवतांची स्थापना ब्राह्मणांनी केली तेव्हा ह्या नवीन देवांचेही ते भक्त बनले. माहाराष्ट्रिकांची सामाजिक, धार्मिक व कौटुंबिक स्थितीही अशी प्राथमावस्थिक होती. त्यांची राजकीय घटनाही ह्या प्राथमिक अवस्थेहून फारशी दूर नव्हती. मगधांत व मगधाच्या जवळील चेदि वगैरे प्रांतात असताना, झल्ल, मल्ल, निच्छिवी, शाक्य, नट इत्यादी व्रात्यांच्यातल्याप्रमाणेच ह्यांच्यातही गण म्हणून जी राजकीय संस्था ती प्रचलित होती. ह्या गणनामक राजकीय संस्थेत गणांतील सर्वच पुरुषव्यक्ती राजे असत व सर्व व्यक्ती आपणास राजा ह्या पदाने भूषवीत. सध्या शहाण्णव कुळातील सर्व मराठे आपणास व्यक्तिश: राजे म्हणवितात त्याचे कारण त्यांच्या प्राचीन पूर्वजांतील ही गणराज्याची संस्था होय. गणराज्य तीन प्रकारचे असे. एका प्रकारात गणातील सर्व व्यक्ती अधिकार चालवीत.