Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

ह्या प्रकाराला बहुनायकी गणराज्य म्हटले असता चालेल. दुस-या प्रकारात काही प्रमुख व्यक्तींच्या हाती राज्याधिकार सोपविलेला असे. ह्याला महाजनकी गणराज्य हे नाव शोभण्यासारखे आहे आणि तिस-या प्रकारात एका सर्वश्रेष्ठ व्यक्तीला सर्वाधिकारी करीत. ह्याला एकराज्य म्हणणे रास्त आहे. हे तिन्ही प्रकार माहाराष्ट्रिक लोकांत प्रचलित होते आणि हे तिन्ही प्रकार घेऊन माहाराष्ट्रिक दक्षिणेत उतरले. आंध्रभृत्याच्या ही गणसंस्था माहाराष्ट्रिकांत होती. नाणेघाटातील आंध्रभृत्यकाली भित्तिचित्रातील एका चित्राखालील महारठिगनकयिरो ही अक्षरे सुप्रसिद्ध आहेत. माहाराष्ट्रिकगणकवीर: या सामासिक पदात एकनायकी गणराज्यापेक्षा बहुनायकी गणराज्याचा ध्वनी ऐकू येतो. समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील स्तंभावर व्याघ्रराज, नीलराज, कुबेर, मटराज इत्यादी राजांची नावे आली आहेत, ती जर माहाराष्ट्रिकांची असतील तर त्यावरून दिसते की शालिवाहनाच्या तिस-या चवथ्या शतकात दक्षिणेत एकनायकी गणराज्ये बनून गेली होती व बहुनायकी गणराज्ये अस्तास गेली होती. तात्पर्य, शकोत्तर चारशेपर्यंत माहाराष्ट्रिकांत गणराज्यसंस्था, एकनायकी किंवा बहुनायकी, प्रचलित होती. ही गणराज्य संस्था माहाराष्ट्रीकांनी नवीन शोधून काढून प्रचलित केली असा समज करून घेण्याचे कारण नाही ही संस्था माहाराष्ट्री जेव्हा महाराष्ट्रीक होते तेव्हा पासून त्याच्यात प्रचलित होती. देवयोनी व गणदेवता यांच्यात गणराज्यसंथा फार प्राचीन काळापासून विद्यमान होती. तसेच प्राचीन ऋषींमध्येही ही संस्था अस्तित्वात होती. ती गणराज्यसंस्था इतकी प्राचीन आहे की ऋग्वेदकालीन ऋषींनी हिचे हृदयंगम वर्णन केले आहे. ऋग्वेदाच्या दुस-या मंडळात ब्रह्मणस्पतींची सूक्ते ऊर्फ सुवर्णने दिली आहेत त्यात गणसंस्थेचा राजा जो गणराज ऊर्फ ब्रह्मणस्पती त्याच्या सामर्थ्याचे कीर्तन केलेले आहे. गणानां त्वा गणपतिं हा मंत्र विख्यात आहे. संस्कारादिकार्यात प्रथमत: गणपतीचे आवाहन या मंत्राने याज्ञिक करतात. परंतु, ह्या मंत्रात कोणाचे व कशाचे वर्णन आहे एतद्विषयी त्यांच्या कल्पना विचित्र आहेत. त्यांच्याच तेवढ्या कल्पना विचित्र आहेत असे नव्हे, तर सायणाच्याही कल्पना अशाच विचित्र आहेत. हे लोक ब्राह्मणस्पतीला देव समजतात. वस्तुत: ब्रह्मणस्पती म्हणजे ब्रह्मन् यांचा मुख्य पुढारी असा अर्थ ऋग्वेदकाली म्हणजे हे ब्राह्मणस्पत्य सूक्त मूळ रचिले गेले त्या काळी होता. अंत्योदात्त ब्रह्मन् (पु.) शब्दाचा अर्थ स्तुती करणारा, स्तावक असा आहे व आद्योदात्त ब्रह्मन् (नपुं.) शब्दाचा अर्थ स्तुती, स्तवन असा आहे. आद्योदात्त ब्रह्मन् शब्द घेतला, तर ब्रह्मणस्पती या शब्दाचा अर्थ स्तुतीचा पती असा होतो. ह्या अर्थापासून काही बोध होत नसल्यामुळे, सायणाने ब्रह्मन् (नपुं.) ह्या शब्दाचा अन्न असा अर्थ निघटू तून घेतला व ब्रह्मणस्पती म्हणजे अन्नाचा पालन करणारा असा अर्थ केला. असा काही तरी अर्थ केल्यावाचून त्याला गत्यंतर नव्हते असे मात्र म्हणता येत नाही. ब्रह्मणस्पते ह्या संबोधनात सर्व पदे अनुदात्त आहेत. तेव्हा ब्रह्मणस्पते या संबोधनात ब्रह्मण: हे पद अंत्योदात्त किंवा आद्योदात्त असे वाटेल तसे घेता आले असते.